भरधाव वेगातील ट्रालाच्या धडकेने लांबोळा येथील श्री. विष्णू मंदिर उध्वस्त

दोन महिन्यांपुर्वीच मंदिराचा करण्यात आला होता जीर्णोद्धार
भरधाव वेगातील ट्रालाच्या धडकेने लांबोळा येथील श्री. विष्णू मंदिर उध्वस्त

शहादा । ता.प्र.- NANDURBAR

तालुक्यातील लांबोळा गावात रस्त्याच्या बाजूला असलेल्या व दोन महिन्यापूर्वीच जीर्णोद्धार झालेल्या भगवान श्री.विष्णू मंदिरात सुसाट वेगाने येणारा सोळा चाकी ट्रॉला घुसल्याने मंदिर पूर्णतः उध्वस्त झाले आहे.

हा अपघात काल दि.9 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झाला. यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहद्याकडून गुजरात राज्यात सोळा चाकी ट्रॉला लोखंड भरून जात होता जात होता. शहादा ते लांबोळादरम्यान तीन ठिकाणी ट्राला चालकाने शहादा शहराकडे जाणार्‍या वाहनचालकांना कट मारला होता.

त्यापैकी शहरातील गुजर गल्ली वाहनधारकांनी त्याचा पाठलाग केला परिणामी त्याने आपला ट्रॉला सुसाट वेगाने पळवला. लांबोळा गावाजवळ आल्याबरोबर समोरुन अवजड वाहन आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला व सरळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुंदर अशा भगवान श्री.विष्णू मंदिरात घुसला.

मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. तेव्हा मंदिर पुर्णतः उध्वस्त झालेले दिसले. दोन महिन्यांपुर्वीच जुने मंदिर पाडून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. रंगकामही करण्यात आले होते.

सदर मंदिर पंधरा फूट असून बाजूला स्वतंत्र मोठा सभागृह बांधण्यात आला आहे. सोळा चाकी ट्रक (क्रमांक जीजे 3- बीडब्ल्यू 2777) याचा पुढचा भाग पूर्णतः चक्काचूर झाला आहे. मंदिराच्या सभागृहाच्या मधल्या भागातील भिंतींचे मोठे नुकसान झाल्याने मंदिराचे बांधकाम नवीनच करावी लागणार आहे.

याबाबत शहादा पोलिसात उशिरा रात्री मोटार अपघात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी मंदिराच्या झालेले नुकसान बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वाहन चालक गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

विसरवाडी ते सेंधवा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र ठेकेदाराने ठिकाणी धोक्याचे इशारा देणारे फलक लावलेले नाहीत. कदाचित फलक राहिला असता तर मंदिराचे नुकसान टळले असते. आत्ताच बांधण्यात आलेल्या मंदिराचे बांधकाम उध्वस्त झाल्याने ग्रामस्थ भक्तगणांचा मनस्ताप झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com