नंदुरबार येथे शासकीय महाविद्यालयाला मंजुरी

0
नंदुरबार । राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) राज्यातील नंदुरबार आणि वाशिम या दोन आकांक्षित जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय मॉडेल पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची पटनोंदणी वाढविण्यासह मागास भागाच्या शैक्षणिक विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. याबाबत दैनिक देशदूतमध्ये दि.29 ऑक्टोबर 2018 रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

उच्च शिक्षणाची संधी सर्व घटकांना प्राप्त व्हावी, ते सर्वसमावेशक व्हावे, त्यात उच्च गुणवत्ता निर्माण व्हावी यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नीती आयोगाने घोषित केलेल्या देशभरातील 70 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार व वाशिम या दोन जिल्हयांचा समावेश आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये रुसा अंतर्गत नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय स्थापन करण्यास केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यासाठी प्रत्येकी 12 कोटी रुपयांचे अनुदानही मंजूर करण्यात आले आहे.

या अनुदानामध्ये केंद्राचा हिस्सा 60 टक्के तर राज्याचा हिस्सा 40 टक्के आहे. दोन्ही महाविद्यालये स्थापन करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळानेही आज मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयांसाठी राज्य शासनाने विनामूल्य जागादेखील उपलब्ध करुन दिली आहे. दोन्ही महाविद्यालयांसह वसतिगृहाच्या इमारती बांधण्यासाठी एकूण 43 कोटी 27 लाख 39 हजारांचा खर्च अपेक्षित आहे.

केंद्राकडून येणारे 14 कोटी 40 लाखांचे अनुदान वगळता उर्वरित 28 कोटी 87 लाख 39 हजार खर्चाचा अतिरिक्त भार राज्य शासनाकडून उचलण्यात येणार आहे. प्रत्येकी 44 शिक्षक, 12 प्रशासकीय कर्मचारी व बाह्य स्त्रोताद्वारे भरण्यासाठी गट ड वर्गातील 36 कर्मचारी अशा दोन्ही महाविद्यालयांसाठी मिळून 184 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्यासाठी वार्षिक खर्च सुमारे 8 कोटी 22 लाख इतका येणार आहे. सदर महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार आहे. याबाबत दैनिक देशदूतमध्ये दि.29 ऑक्टोबर 2002 रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*