Type to search

नंदुरबार

परिट धोबी समाजाचा राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा उत्साहात

Share

प्रकाशा | वार्ताहर- महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाजाचा राज्यस्तरीय गुणवंतांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

नाशिक येथे नुकतेच महाराष्ट्र राज्य धोबी अंतर्गत महाराष्ट्र राज्य कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ नाशिक जिल्हा यांच्या वतीने समाजातील गुणवंताच्या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकच्या कालिका देवी मंदिर संस्थानच्या सभागृहात हा राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील धोबी (परीट) समाज बांधव उपस्थित होते. समाजाच्या ज्या पाल्यांनी कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक अश्या विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळविले आहे, अश्या १६० पुरस्कारार्थीना यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष देवराज सोनटक्के, कार्याध्यक्ष अनिल शिंदे, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, राज्य मुख्य महासचिव जयराम वाघ, नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक शरद मोरे, परदेशी (धोबी) समाजाचे प्रदेशाध्यक्ष सुहास मोगरे, आरोग्य, कौशल्य विकास विभाग प्रमुख राजेश मुके, लॉड्री प्रमुख सुनील पवार, युवा प्रमुख सचिन कदम, नाशिकचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत राऊत, संत गाडगेबाबा सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष कैलास गवळी, महाराष्ट्र कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ प्रमुख मनोज म्हस्के आदी उपस्थित होते.

यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे यांनी सांगितले, विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविणार्‍या पाल्यांचा सन्मान करण्याचे काम करणार्‍या महाराष्ट्र धोबी -परीट समाज महासंघाचे हे कार्य हे फार प्रेरणादायी आहे. धोबी-परीट समाजाला आरक्षण मिळावे ही मागणीही खूप दिवसापासून सुरु आहे. यासाठी मी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन तसेच या गुणवंत मुला मुलींना त्यांच्या करियरसाठी संपूर्ण सहकार्य करेल असे आश्‍वासन दिले.

देवराज सोनटक्के यांनी सांगितले, गाडगे महाराजांचे विचार सर्वत्र रुजविण्यासाठी त्यांचे स्मारक व्हावे आणि गाडगे महाराजांचे कार्य बघता त्यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्य कार्याध्यक्ष अनिल शिंदे यांनी सांगितले, देशातील १३ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशात धोबी समाजाला अंतर्भाव शेड्युल कास्टमध्ये केला गेला आहे. तसेच आरक्षण महाराष्ट्रात मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली. या सोहळ्यात महाराष्ट्राच्या विविध जिल्हयंातील १६० पुरस्कारार्थींचा त्यांच्या पालकांसह सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यासाठी प्रसिद्ध व्यावसायिक राजूसेठ आहेर यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयराम वाघ, मनोज म्हस्के, जिल्हाध्यक्ष शेखर परदेशी, समिती सचिव कैलास देवरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!