Type to search

maharashtra नंदुरबार

एचआयव्हीग्रस्त जोडप्यांचे ‘शुभमंगल’

Share

नरेंद्र बागले , शहादा – 

जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभुमिवर 1 डिसेंबर रोजी शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात एड्सग्रस्तांच्या विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे सलग 12 वर्ष असून यंदा पाच जोडपी विवाहबध्द होणार आहे.

एचआयव्ही या आजाराबाबत समाजात जनजागृती व्हावी व या आजाराने बाधीत रूग्णांना समाजात सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने शहाद्यात सलग दुसर्‍यावर्षी या अनोख्या विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. या विवाह सोहळयाकरीता समाजातील दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य लाभणार आहे.

शहादा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी गेल्यावर्षी शहादा विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर विविध सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत आहे. गतवर्षीही त्यांनी एचआयव्हीग्रस्त त्यांनी पाच जोडप्यांच्या विवाहाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला होता.

यंदाही त्यांनी या अनोख्या विवाह सोहळयाचे आयोजन केले असून त्यात पाच जोडपी विवाहबध्द होणार आहेत. 1990 च्या दशकात एचआयव्ही अर्थात एड्स या महाभयानक आजाराने देशात पाय रूजवण्यास सुरूवात केली. हळुहळू त्याची व्याक्ती वाढत गेली. अनेक तरूण-तरूणी या आजाराच्या विळख्यात सापडत गेले. या आजाराने त्रस्त रूग्णांना समाजासह नातेवाईकांनीदेखील वाळीत टाकले.

त्यामुळे त्यांच्या जीवनात नैराश्य पसरून जीवन जगण्याची उमेद हरवून बसले. समाजातील जनजागृतीअभावी या आजाराने त्रस्त रूग्णांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याची गरज असतांना काही स्वयंसेवी संस्था पुढे येवू लागल्या. त्यातच सामाजिक उपक्रमाशी बांधिलकी जोपासणारे काही व्यक्तीही त्याकरीता पुढे येवू लागल्या.

या आजाराने त्रस्तांना रूग्णांना सर्वसामान्याप्रमाणे सामाजात जीवन जगता यावे. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे 11 वर्षापासून अशा बाधितांचा विवाह सोहळयाचे आयोजन करीत आहेत. यंदाचे हे 12 वे वर्ष आहे. 2008 पासून मुंबई येथून त्यांनी या उपक्रमास सुरूवात केली.

दरवर्षी राज्यातील या आजाराने ग्रस्त तरूण तरूणी, पुरूष अथवा महिला यांचा शोध घेवून त्यांचा एकमेकांशी परिचय करून देवून त्यांच्या संमतीने विवाह लावून देत आहेत. गत 11 वर्षात त्यांनी 22 जोडपी विवाहबध्द केली आहे. ही सर्व जोडपी आज सुखी संसाराचा गाडा हाकत आहेत. समाजातील आपण एक घटक असून आपल्यालाही समाजात जीवन जगण्याचा इतरांप्रमाणे अधिकार असल्याची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली आहे.

या अनोख्या उपक्रमाची जनजागृती सर्वस्तरावर होवू लागली आहे. शिवाय आधुनिक उपचार पध्दती आणि जीवन जगण्याची प्रेरणा यामुळे एचआयव्ही या दुर्धर आजारावर देखील मात करता येणे शक्य होत असल्याची भावना आता अशा बाधीत तरूण- तरूणीमध्ये निर्माण झाली आहे. श्री.सपकाळे यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने आरोग्य शिबीर घेणे, एड्स आजाराबाबत जनजागृती करणे आदी उपक्रम राबवित आहे.

यंदाही त्यांच्या कार्याची दखल घेवून दिल्ली येथील एका स्वयंसेवी संस्थेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेवा श्री पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. यंदाही 1 डिसेंबर रोजी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात या आगळयावेगळया विवाह सोहळयाचे आयोजन केले आहे.

या सोहळयाचे वैशिष्टय म्हणजे याच दिवशी यापुर्वी जी जोडपी विवाहबध्द झाली आहेत, त्यांचा लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला जातो. यावेळीही राज्यातील पाच जोडप्यांचा विवाह संपन्न होणार आहे. त्यासाठी तालुक्यातील काही स्वयंसेवी संस्था, सामाजिक दानशूर व्यक्ती, एचआयव्ही आजाराबाबत काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था यांचेही सहकार्य लाभणार आहे.

राज्यातून अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व एचआयव्ही आजाराबाबत जनजागृती करणार्‍या प्रतिनिधींची उपस्थितीदेखील या विवाह सोहळयास लाभणार असल्याची माहिती श्री.सपकाळे यांनी दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!