नवापुरातील नुकसानग्रस्तांना नवीन घरे देणार!

0
नंदुरबार । नवापूर शहरात गेल्या आठवडयात रंगावली नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील बर्‍याच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घरे देण्यात यावेत अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह नवापूर येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली काल तालुक्यातील रंगावली नदीच्या महापूरामुळे नुकसान झालेल्यांना मदत व पुनर्वसन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ.सुरुपसिंग नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील, शिरीष नाईक, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, प्रांताधिकारी अर्चना पठारे, कार्यकारी अभियंता अनिल पवार, नगरपालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, तहसिलदार सुनिता जर्‍हाड आदि उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी म्हणाले की, महापूरामुळे नुकसान झालेल्यांचे राहिलेले पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी कर्मचारी कमी पडत असतील तर महसूल व कृषि विभागाने तातडीने शहादा, तळोदा येथून मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे व एकही आपादग्रस्त व्यक्ती नुकसान भरपाई वाचुन राहणार नाही याची जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, नवापूर शहरातील रंगावली नदी काठावरील बाधीतांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. परंतु आता या आपादग्रस्तांना नगरपालिकेने व जिल्हा प्रशासनाने तात्पुरती सोय म्हणून शेड उभारुन यांची तातडीने व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. नवापूर शहरातील पुलांचे आठ दिवसांत तज्ज्ञांतर्फे ऑडिट करुन पुल वाहतुकीस लायक आहेत किंवा नाही नसतील तर सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. ना.रावल यांनी यावेळी नुकसानग्रस्तांना दिलेल्या तातडीच्या मदतीबरोबरच त्यांना पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सुविधा, वीज रस्ते, तात्पुरती राहण्याची व्यवस्था याबाबतही आढावा घेतला.

ना.रावल पुढे म्हणाले की, आपादग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा नियोजन व शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. आपादग्रस्तांना पुनर्वसन करतांना प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लागणारी जागा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन द्यावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

ना.रावल यांनी काल नवापूर शहरातील रंगावली नदीच्या काठावरील नुकसान झालेल्या कुटूंबांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन आपल्याला मिळालेल्या मदतीबाबत विचारपूस केली. शासन आपल्या पाठीशी असून आपल्याला झालेल्या नुकसानीचा पुरेपूर मोबदला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. रंगावली नदीत वाहून गेल्यामुळे मृत्यू पावलेल्या सईदा हसन काकद या महिलेच्या कुटूंबाची भेट घेवून त्यांची सांत्वन केले व त्यांना पुरेपुर मदत उपलब्ध करुन दिली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नवापूर येथून जाणारा एमएच-6 या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय धीम्यागतीने सुरु असून त्याचे कामे जलद गतीने करावे. या कामाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नवापूर शहरातून दोन राज्यात वाहतुक जात असल्यामुळे येथील रस्त्यांची नेहमी दुर्देशा होते. यासाठी भविष्यात नवापूर शहरातील रस्ते कॉक्रीटीकरण झाले पाहिजेत अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. रंगावली नदीच्या किनार्‍यावरील नुकसानग्रस्त झालेल्या घरांची पहाणी करुन कुटूंबांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच बोकळझर या गावाला भेट देवून तेथील पूरपरिस्थिची पहाणी करुन उपाय योजना करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणांना यावेळी दिल्या.

यावेळी नुकसानग्रस्त भागातील नागरिक तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ना.रावल यांनी सर्वांच्या अडचणी समजून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

*