अखेर फेस येथील जलकुंभ बांधकामप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

0
नंदुरबार । बारा वर्षापासून पाण्याचे टाकीचे काम पूर्ण होवूनही गावास पाणीपुरवठा न करता शासकीय रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष व सचिवाविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दै.देशदूतने दि. 11 ऑगस्ट 2018 रोजी ‘फेस येथील जलकुंभ ठरले शोभेचे बाहुले’ या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेवून सदर कारवाई करण्यात आली आहे.

फेस ता.शहादा येथे ग्रामस्थांच्या सोयीसाठी शासनाने वर्धित वेग कार्यक्रम योजनेतून सुमारे 10 लाख रुपये खर्च करून सन 2010-2011 मध्ये 35 हजार लिटर्स क्षमतेचा जलकुंभ उभारला आहे. हे जलकुंभ उभारल्यापासून अद्याप पाणी टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे यातील गौडबंगाल अधिक वाढले होते. अनेकांच्या मते जलकुंभाचे काम निकृष्ट झालेले असून पाणी टाकल्याबरोबरच जलकुंभ कोसळण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या जलंकुभांत पाणी टाकण्याचे धाडस कुणी करीत नव्हते. गावातील जलकुंभ तातडीने सुरू करण्यासाठी संबंधित विभागाने चाचणी करावी अशीही मागणी करण्यात येत होती. मात्र, संबंधीत उपअभियंत्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात होती. त्यामुळे अफरातफर करणार्‍यांना संबंधीत अधिकारी पाठीशी घालत असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात होते. या योजनेची लवकरात लवकर पारदर्शीपणे चौकशी करून संबंधितांवर 4 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती. याप्रकरणी दि.14 ऑगस्टपासून राहूल अरुण कोळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. या उपोषणादरम्यान फेस येथील जलकुंभ दुरुस्ती करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या.

दरम्यान, दैनिक देशदूतने प्रसिद्ध केलेल्या या वस्तुनिष्ठ वृत्ताची दखल घेवून सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहादा पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता गुलाब मराठे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, बारा वर्षापासून दि. 16 ऑगस्ट 2018 या कालावधीत ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष ओंकार जगन्नाथ पाटील व सचिव दिलीप रघुनाथ पाटील दोन्ही रा.शहादा यांनी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष व सचिव या पदावर कार्यरत असतांना संगनमताने शासनाची 4 लाख 29 हजार 931 रुपये प्रत्यक्ष पाण्याचे टाकीचे बांधकाम 4 लाख 27 हजार 872 रुपये अंतर्गत करुन उर्वरित 2 हजार 59 रुपये एवढी समितीचे बँक खात्यावर शिल्लक अपेक्षित होती. परंतू त्यांनी सदर पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण झालेले असतांना त्याचे कनेक्शन वितरण व्यवस्थेत मागील 12 वर्षापासून जोडून पाण्याच्या टाकीद्वारे गावास अद्याप पाणीपुरवठा सुरु न करता शासकीय रकमेचा विनीयोग योग्य पद्धतीने केला नाही. व शासकीय रकमेचा गैरवापर केला. सदर कामाचे कोणतेही दस्तावेज चौकशी समितीला उपलब्ध करुन दिले नाही. म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*