सलसाडी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

0

नंदुरबार/मोदलपाडा । प्रतिनिधी/वार्ताहर – सलसाडी ता.तळोदा येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी तळोदा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनय गौडा, तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस उपअधीक्षक प्रकाश मेढे यांच्यासह आठ जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात श्री.गौडा यांना गंभीर मार लागला असून दोन्ही अधिकार्‍यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, पंधरा दिवसाच्या कालावधीत जिल्हयातील नंदुरबार व तळोदा या दोन्ही प्रकल्प अधिकार्‍यांवर प्राणघातक हल्ला झाल्याने अधिकारीवर्गाचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आयएएस अधिकार्‍यावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या निषेधार्थ राजपत्रित अधिकारी संघटना तसेच मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने घटनेने निषेध व्यक्त करुन काम बंद आंदोलन केले. मयत मुलाच्या पालकांनी त्यांच्या तीन मागण्या मान्य झाल्याशिवाय मयतावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सलसाडी ता.तळोदा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता सहावीचा विद्यार्थी सचिन चंद्रसिंग मोरे (वय 12) याला काल सकाळी 6 वाजेच्या सुमारास शाळेत वीजेचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. आश्रमशाळेत कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला, अशी भावना होवून संतप्त ग्रामस्थांनी आश्रमशाळेत ठिय्या मांडला. जोपर्यंत प्रकल्प अधिकारी येत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्याचा मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे सकाळी 10 वाजेच्या सुमारास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा, तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस उपअधीक्षक प्रकाश मेढे, पोलीस उपनिरीक्षक यादव भदाणे, पोना युवराज चव्हाण, पोकॉ देवीदास विसपुते, हेकॉ दारासिग गावित, आश्रमशाळा अधीक्षक भुषण सैंदाणे हे घटनास्थळी पोहचले. सदर अधिकारी येताच संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यात श्री.गौडा व श्री.चंद्रे यांना जबर मारला लागला. तर अन्य पोलीस अधीक्षक व कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी श्री.गौडा व श्री.चंद्रे यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 15 अज्ञात आरोपींविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक प्रकाश मेढे, पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी भेट दिली.

याप्रकरणी चंद्रसिंत खातर्‍या मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सलसाडी येथील आश्रमशाळेतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे त्यांचा मुलगा सचिन याचा इलेक्ट्रीक मोटरचा शॉक लागून मृत्यूमुखी पडला आहे. याप्रकरणी आश्रमशाळेतील अधिकारी व कर्मचारी तसेच प्रकल्प कार्यालयातील संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, उपनिरीक्षक यादव भदाणे करीत आहेत.

दरम्यान या घटनेचा राजपत्रित अधिकारी संघटना तसेच मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने तीव्र निषेध केला असून संघटनेचे सर्व अधिकारी काळया फिती लावून काम केले. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी काल दुपारी श्री.गौडा व श्री.चंद्रे यांची जिल्हा रुग्णालयात जावून भेट घेतली. तसेच त्यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली तसेच तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, काल सकाळी 6 वाजेच्या सुमारास सलसाडी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यामुळे प्रकल्प अधिकारी विनय गौडा, तहसिलदार योगेश चंद्रे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी गेले असता त्यांच्यावर संतप्त ग्रामस्थांनी हल्ला केला. यात दोन्ही अधिकार्‍यांना तसेच पोलीस अधिकार्‍यांनादेखील मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून या घटनेच्या चौकशीचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

याप्रकरणी मयत विद्यार्थ्याचे गडीकोठडा येथील रहिवासी पालक चंद्रसिंग खात्र्या मोरे व आई कौशल्य चंद्रसिंग मोरे यांनी तळोदा पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या एकुलता एक मुलाचा आश्रमशाळेत शॉक लागून मृत्यू झाला. त्यामुळे आमच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच आमच्या कुटूंबाला 25 लाखांची मदत मिळावी.आश्रमशाळेत अशा घटना वारंवार होत असल्याने घटनास्थळी आलेल्या प्रकल्प अधिकारी व इतर अधिकार्‍यांना नातेवाईकांकडून मारहाण झाली. त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. या तीनही मागण्या मान्य झाल्याशिवाय मयत मुलावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

पालकमंत्र्यांची भेट
दरम्यान, काल सायंकाळी उशिरा जिल्हयाचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देवून सलसाडी येथील हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विनय गौडा व तहसिलदार योगेश चंद्रे यांची विचारपूस केली. तसेच घटनेची माहिती जाणून घेतली. पालकमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून यात दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पाच जणांना अटक
याप्रकरणी घटनेच्या दिवसाच्या व्हीडीओ क्लिपच्या आधारे पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात अनिल रायसिंग पाडवी (पाडरखे), दिलीप शामा पाडवी (पाडरखे), शिवाजी पान्या वळवी (प्रतापपूर), पाल्या तेजला पाडवी (प्रतापपूर), जान्या ठाकरे (पाडरखे) यांना समावेश आहे.

महसूल विभागाचे काम बंद आंदोलन
तळोदा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांना मारहाण झाल्याप्रकरणी निषेध म्हणून जिल्हयातील सर्व तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. तळोदा तालुका महसूल कर्मचारी संघटना, तळोदा तालुका तलाठी संघटना तसेच धुळे व नंदुरबार महसूल कर्मचारी संघटनेतर्फे काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला व आज दिवसभर कामकाज बंद ठेवले. त्यामुळे जिल्हाभरात तहसिल कार्यालयात आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.

अतिरिक्त पोलीस बंदोबस्त
घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातुन अतिरिक्त पोलीस फोर्स मागविण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश मेढे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, तळोद्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, धडगावचे पोलीस निरीक्षक संजय भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या प्रमुख उपस्थितीत 48 पोलीस कर्मचारी इतर ठिकाणावरुन मागविण्यात आले होते.

पंधरा दिवसात दोघा प्रकल्प अधिकार्‍यांवर हल्ला
नंदुरबार जिल्हयात नंदुरबार व तळोदा येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहेत. या दोन्ही प्रकल्प कार्यालयांवर प्रकल्पअधिकारी म्हणून आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. 6 ऑगस्ट रोजी डीबीटी पद्धत रद्द करण्यात यावी याबाबत आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी नंदुरबार प्रकल्प कार्यालयावर ठिय्या मांडला होता. त्यावेळी प्रकल्प अधिकारी श्रीमती वान्मती सी या आपल्या वाहनात बसून जात असतांना संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाहनाच्या काचा फोडून त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेला पंधरा दिवसही लोटत नाही तोच काल दि. 27 रोजी तळोदा प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांच्यासह तहसिलदारांवर हल्ला झाला. या घटनेमुळे अधिकार्‍यांवर असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रकल्प कार्यालयात काम करणे अत्यंत जिकीरीचे झाले आहे.

LEAVE A REPLY

*