परिवर्धेकरांनी भरपावसाळ्यात घेतला नदीनांगरटीचा उपक्रम

0

शहादा । ता.प्र.- संघशक्तीच्या जोरावर वाहत्या पाण्याच्या प्रवाहाला रोखू शकतो याचे ज्वलंत उदाहरण परीवर्धा (ता.शहादा) गावात लोकसहभागाच्या माध्यमातून घडले. येथील नागरिकांनी पाणी आडवा पाणी जिरवा या मोहिमेद्वारे भर पावसाळ्यात नदी नांगरटीच्या उपक्रम हाती घेतला आणि पहिल्या दिवशी तब्बल साडेतीन किलोमीटर अंतरावरील नदीपात्रात नांगरटी करण्यात शेतकर्‍यांना यश आले.

परीवर्धा (ता.शहादा) गावालगत वाकी नदी वाहते. नदीमध्ये नांगरणी केल्याने नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत जिरते व निचराही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍याला याचा मोठा फायदा दरवर्षी होतो. येथील गुलाल नरसई पाटील, भगवान मुरार चौधरी, मनोहर पुरुषोत्तम पाटील, निलेश पाटील, भगवान नथू पाटील, भरत लक्ष्मण पाटील, शशिकांत पाटील, शशिकांत अंबालाल पाटील, कांतीलाल पाटील, रघुनाथ पाटील, अंबालाल नगीन पाटील, गिरीश पाटील, मनीलाल पाटील, कैलास सुदाम पाटील,

माधव भीमजी पाटील आदींनी 14 ट्रॅक्टरच्या माध्यमातून नदी नांगरणी केली. सकाळी 11 वाजेपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. वाकी नदीत परिवर्धा ते कोठली या साडेतीन किलोमीटर अंतरावर नांगरटी करण्यात आली.गेल्या चार वर्षापासून परिवर्धे ग्रामस्थ हा उपक्रम राबवत आहेत. यामुळे परिसरातील शेती सिंचनासह परिवर्धे, तर्‍हाडी, कोठली, कलमाडी, वाघोदा या गावातील पाणी प्रश्न मार्गी लागला होता. जमिनीत भूजल पातळी वाढल्याने वर्षभर शेतकर्‍यांच्या कुपनलिका सुरू राहिल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

चार वर्षांपासून उपक्रमात सातत्य
येथील ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी चार वर्षापासून हा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाच्या कुठल्याही मदतीची अपेक्षा न ठेवता हा उपक्रम सुरू आहे. गेल्यावर्षीही शेतकर्‍यांनी लोकवर्गणी करत नदी नांगरटीचा उपक्रम राबवला होता. यासाठी जे.सी.बी आणि पोकलेन मशीनद्वारे खोदकाम करण्यात आले होते. यातून भूजलपातळीत वाढ झाली होती. शासनाने परिवर्धा गावाच्या जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करून घेतल्यास वाकी नदीवर केटीवेअर बंधारा बांधून पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

*