अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत व्याख्यान

0
नंदुरबार । येथील महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती शाखेतर्फे अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत व्याख्यान संपन्न झाले. समाजात वाढत्या अंधश्रध्दा व त्यातून होणारे मनाचे आजार दूर होण्यासाठी महाराष्ट्र अंनिसचा व्याख्यानातून प्रबोधन असा हा उपक्रम होता.

अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत ‘मन आणि मनाचे आजार’ विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटनही अनोख्या पध्दतीने शाखेच्या महिला कार्यकर्त्या डॉ.आरुषी सुरैया यांच्या हस्ते पाण्यावर दिवा पेटवून करण्यात आले. पाण्यावर दिवा कसा पेटवला गेला? त्या मागील वैज्ञानिक कारण शाखेचे किर्तीवर्धन तायडे यांनी स्पष्ट केले.

मनाचे आजार कशामुळे होतात या विषयावर अंनिस नंदुरबार शाखेचे अध्यक्ष डॉ.सी.डी.महाजन यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मागील आठवडयात दिल्ली येथे मनाच्या आजारामुळेच एका कुटुंबातील अकरा लोकांनी आत्महत्या करुन घेतल्याची घटना घडली. मनाचे आजार हे जास्तीत जास्त अंधश्रध्देमुळेच घडत असतात हे डॉ.महाजन यांनी आपल्या विविध मुद्यातून स्पष्ट केले.

शाखेचे प्रधान सचिव किर्तीवर्धन तायडे यांनी अश्या उपक्रमातून समाजातील सर्वसामान्य मानसाच्या मनातून भूत, आत्मा, प्लॅन्चेट, अमावस्याची रात्र, ग्रहांची दिशा, दशा यांच्याविषयी असलेल्या अंधश्रध्दा, गैरसमज दूर होतील या हेतूनेच हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. उपस्थितांमधून आपल्या आयुष्यात भ्रम व भ्रमामुळे घडलेल्या विशेष घटनांचा उलगडा करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी पुढील आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प घेतला.

कार्यक्रमासाठी डॉ.सी.डी.महाजन, डॉ.आरुषी सुरैया, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन पाटील महाराष्ट्र अंनिसचे फिरोज खान, दीपक चौधरी, सुर्यकांत आगळे, चंद्रमणी बरडे, जितेंद्र गोसावी, वसंत वळवी, रणवीर पेंढारकर, सोहम टिळंगे, ऋषिकेश पाटिल, प्रथमेश वसावे, वैभव राजपूत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*