तळोदा तहसील व प्रांत कार्यालयाकडून नागरिकांची पिळवणूक

0
मोदलपाडा ता.तळोदा । वार्ताहर- तळोदा येथील प्रशासकीय इमारतीमधील उपविभागीय व तहसील कार्यालयातील पुरवठा विभागासह इतर विभागांमध्ये विविध कामांसाठी दररोज विद्यार्थ्यांना व नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. यात ग्रामीण भागातील गोरगरिबांची कामे रोखून ठेवत अडवणूक केली जात आहे

. त्यातच काही दलाल पैसे घेऊन लागलीच कामे करून देेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. काही विभागांच्या कार्यालयांमध्ये तोंड बघून कामे केली जात आहेत. म्हणून संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन ग्रामीण भागातील कामानिमित्त येणार्‍या विद्यार्थ्यांची व नागरिकांची अडवणुकीसह पिळवणूक थांबवावी अशी मागणी तळोदा शहरासह ग्रामीण भागातील जनतेकडून केली जात आहे.

तळोदा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व कार्यालये आहेत. यात तहसील कार्यालयांमध्ये पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार, वनजमीन विभाग अशी अनेक प्रशासकीय कार्यालये आहेत. तळोदा तालुका हा सातपुडा पर्वतांच्या रांगेत वसलेला आहे. तळोदा शहरात शिक्षणाची अनेक दालने असून ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. यात अनेक दाखल्यासह विविध योजनांच्या लाभासाठी कागदपत्रांची आवश्यकता असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिक दररोज तळोदा तहसील कार्यालयांमध्ये येवून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करत असतात. मात्र, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागासह इतर विभागांमध्ये नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. तसेच काही विभागांमध्ये तर चक्क दलालांचा सुळसुळाट असून कामे करण्यासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. बहुतांश नागरिक दररोज आपल्या कामासाठी खेड्यावरून येऊन चकरा मारत असून त्यांची कामे रेंगाळल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतांना या योजनांच्या लाभासाठी व विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी लागणार्‍या कागदपत्रांसाठी तहसीलमधील संबंधित विभागांमध्ये विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहे. पुरवठा विभागामध्ये रेशनकार्ड तयार करणे, नाव कमी करणे, नावात दुरुस्ती करणे, नाव समाविष्ट करणे, अशी विविध प्रकारची कामे केली जातात. यासाठी विभागात नागरिकांनी कागदपत्रे सादर करून अर्ज केल्यावरही अनेक दिवसापर्यंत या कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. तसेच उपविभागीय कार्यालयातील विभाग सुवर्ण जयंती राजस्व अभियान तळोदा तालुक्यातील जात दाखले मिळण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना चकरा माराव्या लागत आहे. संजय गांधी विभागातही निराधार योजना, निवृत्ती वेतन योजना, विधवा, परीतक्त्या, अपंग निवृत्ती वेतन, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, या योजनांच्या लाभासाठी लाभार्थ्यांची एकप्रकारे पिळवणूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन विद्यार्थ्यांची व नागरिकांची पिळवणूक थांबवावी व लवकरात लवकर कामे करून द्यावी अशी मागणी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

विद्यार्थ्यालाही फिरवा-फिरव
मला जातीचा दाखला काढण्यासाठी 3 महिन्यांपासून फिरवण्यात येत आहे. प्रांताधिकार्‍यांच्या टेबलावर कागदपत्र ठेवले आहेत. सही होईल तेव्हा जात पडताळणीची दाखला मिळेल अशी उत्तरे संबंधित कर्मचार्‍याकडून मिळत आहे. मी रोज चकरा मारून थकलो आहे.
– सचिन राजपूत
विद्यार्थी, तळोदा

LEAVE A REPLY

*