तळोद्यातील डी.बी.हट्टीच्या पुढे ‘खर्डी’नदीचे पात्र गायब

0
मोदलपाडा ता.तळोदा । वार्ताहर- तळोदा येथील खर्डी नदीला दक्षिणेकडे पात्रच नसल्याने दरवर्षी पुराचे पाणी परिसरातील वसाहतींमध्ये शिरते. नदीपात्रात अनेकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे आधी नदीचे पात्र शोधून त्याचे खोलीकरण व नंतर तापी पात्रात विलीनीकरण करावे लागणार आहे. तेव्हाच नदीची स्वच्छता व खोलीकरणाच्या कामाचा उद्देश सफल होणार आहे.

तळोदा शहराच्या पश्चिमेला असलेली खर्डी नदीची स्वच्छता व खोलीकरणाचा शुभारंभ ‘स्वच्छ सुरक्षित आमची खर्डी सरिता’ या अभियानांतर्गत नुकताच लोकसहभागातून करण्यात आला. या अभियानामुळे संपूर्ण शहरभर न.पा.चे कौतुक करण्यात आले. परंतु खर्डी नदीच्या दक्षिणेकडे पात्रच शिल्लक नाही. शहरातील डी.बी. हट्टीच्या पुढे नदीपात्रात काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे तर काही ठिकाणी प्रमाणावर गाळ साचलेला आहे.

खर्डी नदीतील पाणी पुढे जाण्यासाठी पात्रच नसल्यामुळे पावसाळयात येणार्‍या पुराचे पाणी डीबीहट्टी तसेच विद्यानगरी आदी भागांमध्ये शिरत असते. म्हणून नगर पालिकेने खर्डी नदीतील दक्षिणेकडील पात्र आधी शोधले पाहिजे. त्या पात्रातील गाळ काढून खोलीकरणही करण्याची गरज आहे. हा गाळ जेव्हा काढण्यात येईल तेव्हाच पावसाचे पाणी हे पुढे जाण्यास मदत होणार आहे. अन्यथा हे पावसाचे पाणी येथून पास न होता, तेथेच साचेल व पुन्हा शहरातील वसाहतींमध्ये पाणी शिरून दरवर्षाप्रमाणे हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तळोदा शहरातील खर्डी नदीला दरवर्षी पूर येऊन या पुराचे पाणी शहरातील पाडवी हट्टी, कॉलेज रोड व विद्यानगरी, उपजिल्हा रुग्णालय, न्यायालय या आवारामध्ये शिरत असते. त्यामुळे जिवीत व वित्त हानी होत असते. याचा विचार करून तळोदा पालिकेने ही ‘स्वच्छ सुरक्षित आमची खर्डी सरिता’ हे अभियान लोकसहभागातून राबवून येथील आसपासच्या परिसरातील लोकांना एक प्रकारे दिलासाच दिला आहे.

परंतु जोपर्यंत खर्डी नदीतील पुढच्या पात्रातील गाळ काढण्यात येत नाही तोपर्यंत हे पाणी आसपासच्या घरामध्ये शिरेल. तसेच काही शेतकर्‍यांनी या नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे पालिकेने वेगळे अभियान लोकसहभागातून व श्रमदानाने खर्डी नदीचा गाळ काढण्याची गरज आहे.

मागील 3 वर्षांपूर्वी या खर्डी नदीला मोठा पूर येत आहे. या पुरात या काठाजवळ राहणार्‍या पाडवीहट्टी, डीबी हट्टी, येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी व जिवीतहानी झाली आहे. अनेकांचे संसार, पाळीव जनावरे वाहून गेले आहेत. अशी परिस्थिती पुन्हा उदभवू नये म्हणून पालिकेने जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले होते. आता पुन्हा नदीचे पात्र शोधून खोलीकरणासाठी अभियान राबविण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*