पोलीस कर्मचार्‍यांसाठी वैद्यकीय सुविधा

0
नंदुरबार । जिल्हा पोलीस दल व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांकरीता संजिवनी हॉस्पीटल येथे वैद्यकिय सेवेचा शुभारंभ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आला.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे हे नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आले होते. आज दि.13 जून रोजी सकाळी 9 वाजता श्री.चौबे यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दल व इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस व त्यांचे कुटुंबियांकरीता संजिवनी हॉस्पीटल येथे वैद्यकिय सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश वळवी, डॉ.राजेश कोळी, डॉ.राजकुमार पाटील, डॉ.योगेश देसाई, डॉ.अर्जुन लालचंदाणी आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी वैद्यकिय सेवेचा जास्तीत जास्त पोलीसांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

यानंतर पोलीसांच्या पाल्यांमधील गुणवत्ता वाढीस लागण्याकरीता ईयत्ता 10 वी व 12 वी परीक्षांतील गुणवंत पोलीस पाल्यांचा विनयकुमार चौबे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व बक्षीस देवून गौरव करण्यात आला. याकरीता सुझलॉन पवन उर्जा कंपनीचे मॅनेजर अरविंद चौधरी यांनी पोलीस कल्याणाकरीता दिलेला निधी वापरण्यात आला. यावेळी विनयकुमार चौबे यांनी उपस्थित सर्व पोलीस व त्यांचे कुटुंबियांना संबोधीत केले.

नंदुरबार जिल्ह्यातील आयपीएस दत्तक गांव शिरवाडे ता.जि.नंदुरबार येथील पाच हजार लिटर क्षमतेच्या जलशुध्दीकरण केंद्राचे श्री.चौबे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच आयपीएस दत्तक गांव योजने अंतर्गत झालेल्या विविध कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत वाघुडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक श्री. रणदिवे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*