30 वर्षात प्रथमच वरूळ-कानडीपर्यंत कवळीथ कालव्याचे पाणी पोहोचले

0
शहादा । दि.31 । ता.प्र.-तालुक्यातील कवळीथ येथील कालव्यात पाणी आले असून 30 वर्षात प्रथमच वरुळ-कानडीपर्यंत कालव्याचे पाणी पोहचले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
कवळीथ बंधार्‍यातून निघणार्‍या कालव्यातील पाणी गेल्या 30 वर्षात सोनवद ता.श., वरुळ-कानडी या गावांपर्यंत पोहोचलेले नव्हते.
अनेक वर्षांपासून रखडलेले, अपूर्णावस्थेतील या कालव्याचे काम महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार अभियान, जेएनपीटी व आर्ट ऑफ लिव्हिंग शहादा यांच्या सहकार्याने फक्त 35 दिवसांत उत्कृष्टरित्या पुर्ण झाल्याने फक्त दोन दिवसात सोनवद ता.श., वरुळ-कानडी या गावांपर्यंत पोहोचले.

त्यामुळे या परिसरातील शेतकरी व गांवकर्‍यांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संपूर्ण कामाची पाहणी केली व वरुळ-कानडी येथे जलपूजन केले.

याप्रसंगी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, नायब तहसिलदार देवरे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे किशोर पाटील, हरीश पाटील, आय.जे. पाटील, सुधाकर सेंदाणे, देवेंद्र पाटील, भगवान पाटील, रोहिदास पाटील, तसेच वरुळ-कानडी, सोनवद ता.श., मोहिदा ता.श. येथील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, गावकरी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले की, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमार्फत श्रीश्री रविशंकरजी हे भारतभर जलजागृती अभियान राबवित आहे.

संस्थेमार्फत नदी, कालवे, नाले, तलाव, धरण यामधील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत असून पाणी साठविण्यासाठी, जास्तीत जास्त जमीनीत पाणी जिरविणेसाठी कार्य सुरु आहे.

आपल्या परिसरातही गेल्या वर्षी कवळीथ बंधारा व 5.5 एकर तलावाचे गाळ काढण्याचे काम झाले. तसेच पुढील वर्षीही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गावकर्‍यांनी, शेतकर्‍यांनी सहकार्य देऊन आपला परिसर जलयुक्त करण्यासाठी अजून भरपुर काम करता येईल असा मानस व्यक्त केला.

सदर कालव्यातील गाळ काढण्याचे काम झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह चार पटीने वाढल्यामुळे लोणखेडा, पुरुषोत्तमनगर, डोंगरगांव, सोनवद त.श., कौठळ त.श., मोहिदा ता.श., वरुळ-कानडी या गावातील पाझर तलाव, केटीवेअर या 8 दिवसात 50 टक्क्यांपेक्षा जास्तीचे भरलेले आहेत.

यापुर्वी बर्‍याच वर्षांपासून या कालव्यात पाणी येत नव्हते व परिसरातील पावसाळा कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी खूपच खालावली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न कमी झाले होते, परिसरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, शेती सिंचनाचा प्रश्नही गंभीर झालेला होता.

आता आलेल्या कालव्यातील पाण्यामुळे परिसरातील 5600 हेक्टर पेक्षा जास्तीचे क्षेत्र सिंचनाखाली येईल व शेतकर्‍यांच्या उत्पन्नात हमखास वाढ होईल व पाण्याची पातळीही वाढेल.

गांवकर्‍यांचे व शेतकर्‍यांचे म्हणणे होते की, हा कालवा 15-20 दिवस जरी असाच चालला तर या खरीप हंगामात पिकांना पाणी पुरेल. तसेच गावकर्‍यांनी व शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी व आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानुन सत्कार केला व यांच्या मेहनतीमुळेच आज आमच्या गावापर्यंत पाणी पोहोचल्याचे समाधान व्यक्त केले.

आर्ट ऑफ लिव्हिंगने सुसरी वळण बंधार्‍याचा कालव्याची दोन ठिकाणी दुरुस्ती केली. जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दुरुस्ती केलेल्या कामाची पाहणी करुन सुसरी बंधार्‍यावर भेट देवून पाहणी केली.

याप्रसंगी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, नायब तहसिलदार देवरे व आर्ट ऑफ लिव्हिगचे किशोर पाटील, हरीश पाटील, आय. जे. पाटील, भगवान पाटील, सुधाकर सेंदाणे, देवेंद्र पाटील, रोहिदास पाटील उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*