प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सर्वच शेतकर्‍यांना लाभ देणार: ना.मोदी

0
नंदुरबार । देशात पुन्हा मोदी सरकार आले तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची पाच एकरची अट रद्द करुन सर्वच शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांनी दिले.

नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या भाजपाच्या उमेदवार डॉ.हीना गावित यांच्या प्रचारासाठी आज ना.मोदी यांची जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ना.मोदी म्हणाले, सरकार लाचार, मरतुकडी आणि भ्रष्ट असेल तर सर्वांचे नुकसान अटळ आहे. खान्देशात ऊस जास्त पिकतो. ऊसापासून इथॅनॉल बनविता येते, त्याचे तंत्र सोपे आहे. मात्र, आतापर्यंत महाराष्ट्रात मोठेमोठे नेते होवून गेलेत पण त्यांनी ऊसापासून इथॅनॉल बनवण्यासाठी कधी प्रयत्न केला नाही. पाच वर्षापुर्वी भारतात फक्त 40 कोटी लिटर इथॅनॉल तयार होत होते आता 140 कोटी लिटर इथॅनॉल भारतातून निर्यात होत आहे. देशभरात यासाठी प्लांट तयार होत आहेत. नंदुरबारातदेखील त्याचे एक युनीट आहे. त्याचा लाभ ऊसाच्या शेतकर्‍यांना होणार आहे.

केंद्राने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरु केली. यासाठी महाराष्ट्रातील सव्वा कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षात तीन वेळा पैसे जमा होत आहेत. 23 मे रोजी पुन्हा मोदी सरकार बनल्यास पाच एकरचा नियम हटवून सर्व शेतकर्‍याना त्याचा लाभ दिला जाईल असेही ते म्हणाले. आदिवासी शेतकरी आता आपल्या शेतात बांबू उगवू त्याची विक्री करु शकणार आहे. कारण बांबुला यापुर्वी झाड संबोधण्यात येत होते आता नाही. त्याचा लाभ आदिवासींना होणार आहे. शेतकर्‍यांसाठीदेखील पेन्शन योजना सुरु केली जाणार आहे. काँग्रेसने आधार प्रकल्प सुरु केला मात्र आम्ही जनधन खाते, आधार आणि मोबाईलला लिंक केले. त्यामुळे अनेक सरकारी लाभ दिल्लीतून सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात येत आहेत. त्यामुळे काँग्रेस आता आधार योजना बंद करणसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोकत आहेत. जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही, असेही ते म्हणाले.

भारतीय सैन्य दलात उपाशी, ज्याला काम मिळत नाही तो भरती होतो, असे विधान कर्नाटकच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याने केला आहे. पण देशाच्या सेनेत दाखल झालेला जवान आपल्या भारत मातेची सेवा करण्यासाठी जात असतो. सैनिकांचा अशाप्रकारे अपमान सहन करु नका. जिल्हयात उद्योगांना चालना देण्यासाठी रेल्वे दुहेरीकरण, विद्युतीकरणचे काम झाले आहे. उधना-नंदुरबार, नंदुरबार-पाळधी रेल्वे सुरु झाली. पुढे मनमाड -जळगाव रेल्वेचे काम झाले तर अजून चालना मिळणार आहे. देशाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपाला मतदान करा, असे आवाहन ना.मोदी यांनी केले. यावेळी व्यासपिठावर मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.सुभाष भामरे, पालकमंत्री ना.जयकुमार रावल, खा.डॉ.हीना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.उदेसिंग पाडवी, आ.शिरीष चौधरी, डॉ.रविंद्र चौधरी, जि.प.सदस्य जयपालसिंह रावल, डॉ.कांतीलाल टाटीया, अभिजीत पाटील, नागेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, नयनकुवर रावल, बबन थोरात आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले.

LEAVE A REPLY

*