Type to search

नंदुरबार

परसबागेद्वारे पोषण स्थिती सुधारण्याचा संकल्प

Share

नंदुरबार । जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आश्रमशाळेत परसबाग तयार करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय तळोदा आणि युनिसेफ मुंबई यांनी संयुक्तपणे हाती घेतला आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारण्याचा संकल्प भांग्रापाणी आश्रमशाळेत आयोजित कार्यशाळेत करण्यात आला.

युनिसेफद्वारा दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी 17 आश्रमशाळेतील अधीक्षक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणात तज्ज्ञांनी पोषण परस बागेचे महत्व सांगितले. यावेळी परसबाग तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यात 4 बाय 20 जागेत 9 इंच उंचीचा मातीचा बेड तयार करून घेण्यात आला.या परसबागेला कमी पाणी लागते आणि त्यात बेडवर फळभाज्या, वेलवर्गीय व पालेभाज्या तर बेडभोवती शेवगा, हादगा, पपई, आवळा, लिंबू आदी झाडे लावता येतात. युनिसेफतर्फे 12 प्रकारच्या भाज्या व शेवग्याची रोपे पुरविण्यात आली आहेत. नंतरच्या टप्प्यात स्थानिक पातळीवर बियाणे बँक तयार करून स्वावलंबी करण्यात येणार आहे.

जुलै अखेरपर्यंत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सर्व आश्रमशाळेत परसबाग तयार करण्यात येणार आहे. यासाठी युनिसेफद्वारे सनियंत्रण करण्यात येणार असून प्रकल्प अधिकारी तळोदा आढावा घेणार आहेत.

प्रशिक्षण कार्यशाळेसाठी युनिसेफ राज्य सल्लागार डॉ.गोपाळ लांडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प अधिकारी रमेश डुडी, अतिरिक्त प्रकल्प अधिकारी एस.आर.सोलंकी यांचे मार्गदर्शन लाभले. रक्तक्षय आणि कुपोषणापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांच्या दैनंदिन जेवणात हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या आवश्यक आहेत. त्याचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि स्थानिक स्तरावर भाज्यांची उपलब्धता करून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!