Type to search

maharashtra आवर्जून वाचाच नंदुरबार मुख्य बातम्या राजकीय

मोदी फॅक्टरमुळे डॉ.हीना गावित विजयी

Share

राकेश कलाल | नंदुरबार, दि.२३  :  मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यासह सार्‍या नकारात्मक बाबींचे दिव्य पार करुन नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजपाच्या डॉ.हीना गावित या सलग दुसर्‍यांदा विजयी झाल्या आहेत. तर गेल्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीत नंदुरबार व शिरपूर या दोन्ही विधानसभा मतदार संघांनी १ लाख १० हजार ९८८ एवढे मताधिक्य डॉ.गावितांच्या पारडयात टाकले आहे. डॉ.हीना गावित यांचा हा विजय फक्त आणि फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फॅक्टरमुळे मिळाला आहे.

नंदुरबार लोकसभा मतदार संघ हा सुरुवातीपासून चर्चेत होता. भाजपाच्या डॉ.हिना गावित यांनी गेल्या सहा महिन्यांपासूनच निवडणुकीची तयारी सुरु केली होती. केंद्र शासनाच्या गॅस वाटप योजनेचा लाभ संपुर्ण लोकसभा मतदार संघात त्यांनी त्यांच्या हाताने लाभार्थ्यांना दिला. तसेच ठिकठिकाणी छोटयामोठया कार्यक्रमांना भेटीगाठी, योजनेच्या लाभ वाटप कार्यक्रमाप्रसंगी मतदारांशी संवाद साधत डॉ.हीना गावित यांनी प्रचारात आघाडी घेतली होती.

परंतू जसजशी निवडणूक जवळ येत गेली तसतशा या मतदार संघात नाटयमयरित्या घडामोडी होत गेल्या. ऐनवेळी भाजपाचे डॉ.सुहास नटावदकर, त्यांच्या कन्या डॉ.समिधा नटावदकर यांनी लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे डॉ.गावितांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान, गेल्यावर्षी धुळे येथे मराठा समाजातर्फे सुरु असलेल्या आंदोलनाप्रसंगी आंदोलकांनी डॉ.हीना गावित या त्यांच्या वाहनात असतांना वाहनावर चढून हल्ला केला.

त्यावेळी डॉ.हीना गावित यांनी मराठा आंदोलकांवर ऍट्रासिटीचे गुन्हे दाखल केले होते. तसेच संसदेतही याबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यामुळे मराठा समाज कमालिचा नाराज झाला होता. त्यामुळे दोन लाखावर असलेले मराठा समाजातील मतदार निवडणूकीत डॉ.गावित यांना अडचणीत आणेल, असे चित्र होते. मात्र तसे झाले नाही. काही महिन्यांपुर्वी धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले हेाते. त्यावेळी आदिवासी समाजाने मोर्चा काढून याबाबतचा निषेध केला होता. त्यावेळी गावित परिवाराने एकाही सदस्याने धनगर आरक्षणाला विरोध केला नव्हता. मात्र, मोर्चाप्रसंगी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड.के.सी.पाडवी यांनी धनगर आरक्षणाला विरोध दर्शवत समाजासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे समाजासाठी ते हिरो ठरले होते. ६५ टक्के आदिवासी समाजाची मते असल्याने राजीनाम्याचा आ.पाडवी यांना निश्‍चितच फायदा होईल, असे वाटप होते. परंतू तसे झाले नाही. तसेच या सार्‍या बाबींमुळे डॉ.हीना गावित यांची उमेदवारी कायम राहील की नाही याबाबत खलबते सुरु होती. ऐनवेळी नंदुरबारात जळगाव पॅटर्न राबवून उमेदवारी डॉ.नटावदकर यांच्या कुटूंबातील सदस्याला किंवा अन्य उमेदवाराला मिळेल असे वातावरण तयार झाले होेते.

परंतू तरीही डॉ.हीना गावित यांची उमेदवारी निश्‍चित झाली. डॉ.गावित यांनी मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि इतर सर्व नकारात्मक बाबींचे दिव्य पार करुन आज पुन्हा ९५ हजार ६२९ एवढया मताधिक्याने विजय मिळविला आहे. हा विजय फक्त आणि फक्त मोदी फॅक्टरमुळेच मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नंदुरबारात झालेल्या सभेत लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. त्यावेळी ना.मोदी यांनी मतदारांना फक्त मला मतदान करा, आपण दिलेले प्रत्येक मत हे माझ्या खात्यात येणार आहे, असे भावनिक आवाहन केले होते. त्या आवाहनाला मतदार संघातील भरघोस प्रतिसाद देत डॉ.हिना गावित यांना विजयी केले आहे.

दुसरीकडे कॉंग्रेसचे आ.ऍड.के.सी.पाडवी यांच्या प्रचार यंत्रणेत नियोजन दिसून आले नाही. त्यांनी मतदार संघात एकही मोठया नेत्याची सभा घेतली नाही. राहूल गांधी यांची सभा होणार होती, परंतू तीदेखील रद्द करण्यात आली होती. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.चंद्रकांत रघुवंशी हेदेखील गेल्या सहा महिन्यांपासून वैद्यकीय उपचारासाठी राज्याबाहेर होते. ते निवडणूकीच्या चार दिवस आधी नंदुरबारात आले होते. त्यामुळे त्यांची कमतरता या निवडणुकीत चांगली भासली. सहाही मतदार संघातील कॉंग्रेस नेते एकदिलाने काम करत असतांनाही फक्त आणि फक्त मोदी फॅक्टरमुळे कॉंग्रेसचा पराभव झाला आहे.

आ.पाडवी यांच्या अक्कलकुवा मतदार संघात त्यांना केवळ १५९ चे मताधिक्य मिळाले. शहादा मतदार संघात १ हजार ६७७, नवापूर मतदार संघात ७ हजार ३३३ तर साक्री मतदार संघात ९ हजार ८७७ एवढे मताधिक्य आ.पाडवी यांना मिळाले आहे. सहापैकी चार मतदार संघात त्यांना भाजपापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले परंतू नंदुरबार आणि शिरपूर विधानसभा मतदार संघात भाजपाच्या डॉ.हीना गावित यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. नंदुरबारात ७० हजार २८२ तर शिरपूर विधानसभा मतदार संघात ४० हजार ७०६ एवढे मताधिक्य मिळाले आहे. या दोनच विधानसभा मतदार संघातून भाजपाला १ लाख १० हजार ९८८ एवढे मताधिक्य मिळाल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!