नांदगाव : बांधून आभाळगाठी.. धान्याच्या शोधासाठी ‘तांडा’ चालला…

नांदगाव :  बांधून आभाळगाठी..  धान्याच्या शोधासाठी ‘तांडा’ चालला…

नांदगांव। संजय मोरे
नांदगाव तालुक्यातील ऊसतोड कामगार आपल्या परिवारासह बैलगाड्या ,टँक्टर ,ट्रकमध्ये आपल्याला लागेल संसारबांधून कारखान्याच्या दिशेने निघालेल्या चित्र सध्या खेड्यात दिसत आहे.ऊसतोड कामगारांना जगण्यासाठी ऊसतोडीच्या आधाराने मजुरांना कारखान्याकडे धावाधाव सुरु केली आहे. त्यामुळे अनेक खेडी ओसाड पडू लागल्याने विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

यंदा पावसाने तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. पावसाने भिजल्याने चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. नांदगाव तालुक्यात मका, कांदा, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील खेड्यामध्ये दमणगंगा व नारपार प्रकल्पाचे पाणी आले तर तालुक्यात सिंचनाचा प्रश्न सुटल्यावर ऊसतोडी कामगारांना कारखान्याचा आधार घेण्याची गरज भसणार नाही.

ऊसतोडीचा हंगाम सुरु झाल्याची संधी साधुन आपल्या कुटुंबासह जनावरांचाही व रोजीरोटीसाठीचा प्रश्न सुटणार आहे. म्हणून ऊसतोड कामगार कारखान्याकडे सर्वांची धावधाव सुरु झाली आहे. आपल्या परिवारासह बैलगाड्या, टँक्टर व ट्रकमध्ये संसारबांधून कारखान्याच्या दिशेने निघालेल्या तांड्याचे चित्र सध्या खेड्यात दिसत आहे. घरातील वयोवृद्ध व शाळेत जाणारी मुले घर सांभाळण्यासाठी गावात दिसत आहेत.

नगर, पुणे, सोलापूर, बारामती, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासह थेट गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यात टँक्टर, ट्रकने गावागावातील आपल्या परिवारासह व बैलगाड्यासह जथ्येच्या जथ्ये निघाले आहेत. बैलगांड्याच्या रांगाच रांगा रस्त्याने जातांना दिसत आहे. जवळपास ४० ते ५० टक्के लोक तालुक्यातील ग्रामीण भागातुन निघाल्याचा अंदाज नागरिकांच्या चर्चातुन समजते.

कांंदा व कापूस उत्पादकांची होणार कोंंडी
तालुक्यातील बहुतांश शेतमजूर ऊसतोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात जात आहे. रोजगारासाठी स्थलांतर असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी कोंंडी होत असते. सध्या कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच कापूस वेचणीचे काम सुरू आहे. मात्र तालुक्यातील कामगार मोठ्या प्रमाणात बाहेर जात असल्याने शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. ऊसतोड कामगारांच्या स्थलांतमुळे नांदगाव बाजारपेठेवर मोठा परिणाम जाणवणार आहे.

ऊसतोड कामगार ४ते ५ महिने पोटाची खळगी भरण्यासाठीआपल्या कुटुंबसह जातात. ऊसतोड मजुरांचे या गावाहून त्या गावाला मजुरांचे आठ ते पंधरा दिवसांत स्थलांतर होत असते. अनेक ठिकाणी शाळांची सोय नसल्याने ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असते. ट्रक, टँक्टरने तालुक्यातील वाड्यावस्ती व रस्त्यावर हजर होतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com