Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : ग्राऊंड रिपोर्ट : …सांगा आता कसे जगायचेे?; दिंडोरी तालुक्यातील शेतकर्‍यांची व्यथा

Share

नाशिक । भारत पगारे, दिनेश सोनवणे

द्राक्षपंढरी असलेल्या नाशिकमध्ये लांबलेल्या परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी, वरखेडा, तिसगाव, खेडगाव, बोपेगावसह अन्य गावांतील ९० टक्के द्राक्षक्षेत्र धोक्यात आले आहे.

दैनिक ‘देशदूत’च्या चमुने शुक्रवारी (दि. १) प्रत्यक्ष तालुक्यातील बाधित गावांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली. द्राक्षाबागांसह घड कुजत असून घडाच्या काडीला वरतून मूळ फुटत असल्याने यंदाचा द्राक्षहंगाम नाशिककरांसाठी ‘आंबट’ होण्याची चिंता वाढू लागली आहे.

तालुक्यात बागायतदारांनी कर्ज उचलून द्राक्षबागा लावल्या असून त्या जिवंत ठेवण्यासाठी पै अन पै खर्च करून औषध फवारणी केली जात आहे. द्राक्षांना परतीच्या पावसाने गेल्या सात-आठ दिवसांपासून जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष, टोमॅटो आणि सोयाबीनच्या क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.

या भागात घेतले जाणारे एकूणच पीक धोक्यात आले असून द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पीक चांगले बहरले. यामुळे दिवाळी उत्साहात साजरी होईल, अशी स्थिती असताना परतीच्या पावसाने सारे काही उद्ध्वस्त केल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.

दिंडोरी तालुक्यात सर्वात जास्त द्राक्षाचे क्षेत्र हे वरखेडा आणि तिसगाव तसेच सोनजांब येथे आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसाने शेती उद्ध्वस्त झाली असून फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

द्राक्ष बागांसह काही प्रमाणात मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कडधान्य, कांदा आदी पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अर्ली द्राक्षांचा हंगाम वाया गेला असून हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाने हिरावून नेल्याने ‘आम्ही आता खायचे काय?’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.

ऐन दिवाळीत कोसळलेल्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, आंबेवणी आणि वरखेडा येथे खासदार डॉ. भारती पवार यांनी नुकसानग्रस्त भागास नुकतीच भेट देऊन शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. येथे कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामेही केले असून या चार ते पाच गावात द्राक्षबागा पूर्णत: मान टाकण्याच्या अवस्थेत आहेत.

तरीही, बागायतदारांनी आशा सोडली नसून औषध फवारणी करून द्राक्ष जगविण्यासाठी खटाटोप केला जात आहे. विविध भागात तयार होण्याच्या मार्गावर असलेले भात पीकदेखील आडवे झाले आहे. बाजारात विकायला आणलेला व शेतात काढून ठेवलेला सोयाबीन पावसाच्या तडाख्यात सापडल्याने कोट्यधी रुपयांचे नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागले.

द्राक्षाची जी स्थिती आहे तशीच टोमॅटोची असून ही शेतीही जमीनदोस्त झाली आहे. काही शेतकर्‍यांनी टॉमेटोच्या भरोशावर न राहता आंतरपीक घेतले आहे. टोमॅटो जरी नाही आला, तरी किमान खर्च निघण्यासाठी भेंडी लावण्यात आली आहे. दरम्यान, लष्करी अळीमुळे आधी पेरणी केलेला मका खराब झाल्यावर अनेक शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केली होती.

मात्र, पावसाने मका पिकाची कणसे काळी पडून त्यांना कोंब फुटले. द्राक्षावर ओढावलेल्या या अस्मानी संकटाने कोणताही द्राक्ष उत्पादक सध्या आपली द्राक्ष निर्यात होतील, याची शाश्‍वती देऊ शकत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

निसर्गाच्या प्रकोपाने क्षतिग्रस्त झालेल्या द्राक्षांच्या निर्यातीची शक्यता धूसर झाली आहे. या संकटाने द्राक्ष उत्पादक मानसिकदृष्ट्या खचला असून त्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सरकारने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केले आहे.

तसेच वेगवेगळ्या अवस्थेतील द्राक्षपीक मोठ्या संकटात सापडल्याने आंबेवणी, वरखेडा, बोपेगाव, तिसगाव, परमोरी आणि खेडगाव येथे असलेल्या द्राक्ष बागांमध्ये आजही तळे साचल्याची स्थिती आहे.

ट्रॅक्टर 3 फूट चिखलात
हाहाकार माजविलेल्या पावसाने येथील सर्वच शेत आणि बागांत पाण्याचे तळे साचले आहे. द्राक्षाच्या घडांवर औषध फवारणी करण्यासाठी बागाईतदार कुबोटा ट्रॅक्टरच्या मदतीने फवारणी करतात. सध्याच्या वातावरण आणि पावसामुळे दिवसातून अनेक वेळा फवारणी करावी लागते आहे. त्यातून हे ट्रॅक्टर मार्गावरून जाताना चिखलात रुतले जात आहे.

तेच ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढण्यासाठी अन्य सहकार्‍यांच्या दुसर्‍या ट्रॅक्टरने ‘टोचन’करून ते बाहेर काढले जात आहे. अनेकदा 3 ट्रॅक्टर जोडूनही ट्रॅक्टर बाहेर निघत नाही. चिखलात ट्रॅक्टर चालत नसल्याने नाईलाजास्तव पायीच पाईपाने फवारणी करण्याची वेळ आली आहे.

छाटणीपासून पाऊस सुरू
द्राक्षाची छाटणी सुरू झाली तेव्हापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाऊस ‘उघडला’ असे कधी झाले नाही. द्राक्ष मालाची यंदा शाश्‍वती नसून आता पुढे पाऊस आणि वातावरणावर द्राक्षाचा हंगाम अवलंबून आहे.

एकरी  ९० हजारांचा खर्च पाण्यात
द्राक्षाला एकरी १ लाख ८० हजार रुपयांचा खर्च येतो. त्यातील जवळपास ८० ते ९० हजार रुपयांचा खर्च झाला आहे. तोही वाया गेला आहे. तरी बागा वाचविण्यासाठी शेतकरी रात्री-बेरात्री फवारणी करीत आहेेत.

बागा कुजल्या, मणी गळाले
द्राक्ष उत्पादन क्षेत्रातील जवळपास ९० टक्के प्लॉटमध्ये लागवडीचे फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागा पावसामुळे कुजून गेल्या आहेत. पावसामुळे घडाच्या जवळील काडील मोड फुटले असून तरी बाग वाचविण्यासाठी घडाजवळील पाने तोडून टाकली जात आहे. यासह खोडावर आणि घडांवर साचलेले पाणी निथरून टाकले जात आहे.

नुकसान भरपाई द्या
नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, संपूर्ण पीक कर्ज, त्यावरील व्याज माफ करून परत पीक कर्ज देण्याची व्यवस्था करावी, मध्य मुदत कर्जावरील व्याजास तीन वर्षे माफी, परतफेड, पुनर्गठन करून मिळावे, द्राक्ष उत्पादकांना भरावा लागणारा शासकीय शेतसारा, शिक्षण कर, वीज देयक माफ करावे अशी मागणी द्राक्ष उत्पादकांनी केली आहे.

दररोज रात्री पाऊस
वरखेडा आंणि आंबेवणी येथे राहणार्‍या वयोवृद्धांनी यंदाच्या दिवाळीत पडणारा पाऊस कधीच पाहिला नसल्याचे सांगितले. या दिवसात जोरदार पाऊस नसतोच, असे त्यांनी ठामपणे सांगितले, मात्र गेल्या आठ दिवसांपासून दररोज रात्री पाऊस सुरू आहे. हे नुकसान भरून निघण्याजोगे नसल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या द्राक्षाला फॉस्फरसची गरज
सध्याच्या घडीला द्राक्षाला फॉस्फरस आणि पोटॅशची गरज आहे. मात्र पाऊस आणि वातावरणामुळे द्राक्षाला अनाहूत नायट्रोजन मिळत आहे. त्यामुळे मुळ्या येऊन घड पडून जात आहेत. द्राक्षाच्या पानांवर पावसाचे पाणी साचल्याने घड बारीक पडत आहे, तसेच ते कुजत आहेत.

पंचनामे सुरू…
तालुक्यातील आंबेवणी, सोनजांब, वरखेडा, तिसगाव व खेडगाव परीसरातील ८०० ते १००० हेक्टर परिसर परतीच्या पावसाने बाधित झाला आहे. तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून सध्या पंचनामे सुरू आहेत. आत्तापर्यंत 1200 ते 1500 शेतकर्‍यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
– पी. एस. देशमुख व एन. एम. पवार, सहाय्यक कृषी आधिकारी, दिंडोरी.

खूप खर्च झाला आहे. मानसाला जसा विमा असतो, तसाच पूर्ण पिकविमा मिळायला हवा. शेतकरी संपत चालला आहे.
– विशाल वसंत नवले, वरखेडा.

टोमॅटोची लागवड केली, मात्र पावसामुळे वाचू शकली नाही. त्यामुळे भेेंडीचे आंतरपीक घेतले आहे.
– मंगेश उफाडे, वरखेडा.

आम्ही ‘आयसीयू’त राहणार्‍या पेशंटप्रमाणे द्राक्षाच्या घडांना वाचवित आहोत. २ दिवसापासून पाऊस थांबला आहे.
– अमोल भालेराव, तिसगाव.

द्राक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे. छाटणीसाठी दहा रुपये मोजावे लागले आहे. ट्रॅक्टर नादुरुस्त होत आहेत.
– भानुदास भावले

आधी द्राक्षावर अळीचा प्रादुर्भाव झाला होता. आम्ही त्यातूनही मार्ग काढला. अळी द्राक्षाच्यावर जाऊ नये, म्हणून चिकटटेप लावून संरक्षण केले. आता पावसामुळे हाती नुकसान सहन करावे लागत आहे.
– वसंत उफाडे, वरखेडा.

द्राक्षांवर वातावरणामुळे डावण्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. थंडीमुळे पुढे द्राक्षमणी तडकणार आहे. २०० लिटर औषधाचा मोठ्या अश्‍वशक्तीचा ट्रॅक्टर चार वेळेस चिखलात फसत आहे.
– आप्पासाहेब भालेराव, तिसगाव.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!