नागवडे कारखान्याच्या 11 हजार सभासदांना डच्चू

jalgaon-digital
3 Min Read

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – 2015 मध्ये झालेल्या श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 20 हजार 615 मतदार मतदानासाठी पात्र ठरले होते. एप्रिल 2020 मध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी प्रारूप यादीत नऊ हजार 589 सभासद मतदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. याचाच अर्थ गत निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत 11 हजार 26 मतदारांची नावे छाटण्यात आली आहेत. नागवडे साखर कारखान्यामध्ये 43 सोसायट्या सभासद आहेत. पाच वर्षात किमान एका वार्षिक सभेला प्रतिनिधी हजर नाही, या सबबीखाली 33 सोसायट्या मतदानासाठी अपात्र ठरवून फक्त 10 सोसायट्या मतदानासाठी पात्र ठरविल्या असल्याची माहिती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी दिली.

नागवडे साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रा. दरेकर यांनी गत वर्षीच्या आणि यंदाच्या मतदारांची आकडेवारी सांगितली आहे. यात कंसात मागील वेळचे तर कंसाबाहेर यंदाच्या मतदारांचे आकडे दिले आहेत. यात श्रीगोंदा गट (3324) 1184, काष्टी गट (3749) 2111, कोळगाव गट (3061) 1399, बेलवंडी गट (3713) 1253, टाकळी कडेवळीत गट (3201) 1676, लिंपणगाव गट (3564) 1966, एकूण मतदार (20615) 9589 आहेत. एप्रिल 2015 च्या निवडणुकीत असलेल्या श्रीगोंदा, काष्टी, कोळगाव, बेलवंडी, टाकळी कडे व लिंपणगाव या सहा गटातील 11 हजार 26 मतदार वगळण्यात आले आहेत. वगळण्यात आलेले मतदार हे थकबाकीदार, शेअर्स अपूर्ण असलेले आणि ज्यांनी पाच वर्षात किमान एका वेळी कारखान्यास उस घातलेला नाही, अशा मतदारांचा समावेश आहे. पाच वर्षातून किमान एका वार्षिक सभेला हजर राहण्याची अट मात्र कारखान्याने क्षमापित केली आहे. 33 सोसायट्यांच्या प्रतीनिधींची उपस्थिती मात्र क्षमापित केलेली नाही.

दरम्यान, कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी 7 डिसेंबर 2019 रोजी पत्रकार परिषद घेऊन एकही सभासद मतदानापासून वंचित राहणार नाही व सर्वच्या सर्व म्हणजे 43 सोसायट्यांना मतदानासाठी पात्र ठरविले जाईल, असे आश्‍वासन दिले होते. परंतु 22 हजार 735 सभासदांपैकी 11 हजार 26 सभासद अपात्र ठरविले आहेत. हे सभासद मतदानापासून वंचित राहिले आहेत. नागवडे यांच्या त्यावेळच्या आश्‍वासनाची आठवण प्रा. दरेकर यांनी यावेळी करून दिली आहे.

कारखान्याने प्रारूप मतदार यादीसाठी प्रत्येक गटाला गावनिहाय समरी जोडलेली आहे. त्यामध्ये देखील चुका केलेल्या आहेत. बेलवंडी गटातील एरंडोली गावातील सभासद संख्या प्रत्यक्ष 17 असताना समरीमध्ये 7 दाखविली आहे. त्यामुळे त्या गटातील सभासद संख्या 1243 येते. मात्र, ती संख्या 1253 दाखविली आहे. टाकळी कडे गटाची समरी 1679 येते ती 1676 दाखविली आहे. कोकणगावची सभासद संख्या 72 असतांना ती 75 दाखविलेली आहे. म्हणजे कारखान्याला समरी देखील बिनचूक देता आलेली नाही. 27 जानेवारी पर्यंत प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे हरकती दाखल करण्याची मुदत आहे.

पोटनियमाप्रमाणे पाच वर्षांतून एकदा ऊस कारखान्यात गाळप करणारा क्रियाशील सभासद ठरतो. परंतु गेल्या पाच वर्षात 2015-16 आणि 2018-19 या दोन वर्षी श्रीगोंदे तालुक्यात दुष्काळ पडलेला असल्याने राहिलेल्या तीन वर्षात एक वर्षाचा ऊस घालणे क्रियाशील ठरविण्यासाठी अन्यायकारक आहे. 2010 मध्ये उच्च न्यायालयाने याचिकामध्ये दिलेल्या निकालात नैसर्गिक आपत्तीच्या काळात सभासदांवर उस घालण्याचे बंधन योग्य नाही. यामुळे उस न घालणार्‍या सर्व सभासदांना मतदारयादीत समाविष्ट करावे, अशी मागणीही प्रा. दरेकर यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *