Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगअपेक्षांच्या ओझ्याखाली...

अपेक्षांच्या ओझ्याखाली…

शिष्यवृत्तीच्या परीक्षेला वर्गातील मुलांना न्यायचे म्हणून सकाळीच त्यांना शाळेत बोलवले, रिक्षेत बसवले अन मी ही त्यांच्यातच बसले. शुभा डोकं पुस्तकात घालून वाचत होती, कौतुक वाटलं तिचं! एवढ्याशा वयात किती समंजसपणा! तिच्या हातातलं पुस्तक घेऊन तिला म्हणाले, अगं बस आता, खूप अभ्यास केलाय आपण! टेन्शन घेऊ नको. छान मार्क्स मिळवणार आहेस तू! सौम्य हसत तिनं माझ्या हातातून पुस्तक घेतलं आणि स्वतःच्या मांडीवर ठेवलं. गप्पा मारत मारत, अभ्यासाला आनंददायी उजळणी देत परीक्षा सेंटरवर रिक्षा येऊन थांबली. मुले उतरली. एकदाच सगळ्या सूचना दिल्या आणि मुलांना रांगेत नेऊन त्यांना आप आपल्या जागेवर बसवून बाहेर झाडाखाली येऊन बसले. तेवढ्यात एक मैत्रीण दिसली, तिच्या एका हाताला मुलगा अन दुसर्‍या हातात डब्याची पिशवी, पॅड! मुलगा कंटाळवाणा चेहर्‍याने, जड पावलाने चालत होता, मी दृष्टीस पडताच म्हणाली, बरं झालं तू आहे, चल! याला परीक्षेला बसवून येऊ .

मुलाकडे पाण्याची बाटली देत त्याला म्हणाली, धर पाणी पिऊन घे, पेपर मधेच पीत बसशील आणि पाच मिनिटे वाया घालवशील पाणी पाजून बाटली डब्याच्या पिशवीत ठेवत सूचनांचा पाढा सुरू करत ती निघाली. नीट पेपर दे, घाई करू नकोस, खुणा करून आण. नंदी बैलाप्रमाणे मान हलवत मुलगा पाऊल पुढे टाकत होता, तिचं सूचनांचं गाणंही चालूच होतं .परीक्षा हॉल आला तरी! त्याला परीक्षेला बसवून आम्ही दोघी निघालो, आणि एका झाडाखाली येऊन बसलो. ती चिंतातूर चेहरा करून म्हणाली, खूप त्रास घेतला आम्ही शिष्यवृत्ती परीक्षेसाठी! मी रोज सकाळी क्लासला सोडवायला, आणायला जायचे, हे संध्याकाळच्या!

- Advertisement -

बर्‍याच वेळाने तिचा मुलगा वर्गाच्या बाहेर आलेला पाहून तिला धक्काच बसला, तो बाथरूमच्या दिशेने धावत गेला, ही चिडून म्हणाली, मूर्ख कार्ट आहे, पेपर चालू असताना असं उठून येतात का! वेळ पुरेल का याला आता? तिच्या देहबोलीतून पराकोटीची अस्वस्थता जाणवत होती, आता त्याचं खूपच अवघड झालं… त्याच्याकडून फार मोठी चूक झाली अशा चुकीच्या जाणिवेनं डोक्याला हात लावून ती बसली.

तेवढ्यात बेल झाली आणि मुले बाहेर आली. मी आमच्या मुलांना गोल करून बसवले, त्यांच्या प्रश्नपत्रिका जमा केल्या आणि फ्रेश होऊन जेवायला सांगितले, ती मात्र त्याच्यावर ओरडली. ‘काय रे! असे मध्येच पेपर सोडून कशाला बाहेर आला होता? तुला सांगितले होते ना, एक- एक मिनिट किती महत्वाचा आहे. शेवटी ऐकलंच नाही आमचं! तुझ्या मनाप्रमाणे वागलास! कर, अशाच चुका कर. आता पुढच्या पेपरला तरी ऐक आमचं.’ तो शांतपणे म्हणाला, अगं आई पेपर झाला होता माझा. हो का!, मग रीचेक करायचं. एवढे कळत नाही. एवढे अर्जंट होते का बाहेर येणे?. असं म्हणून तिने प्रश्नपत्रिका हातात घेऊन तपासणी सुरू केली. केविलवाणा चेहरा करत मुलगा तिच्याजवळ बसला,मला वाईट वाटलं. तिच्या हातातला पेपर घेत मी रागाने म्हणाले, अगं जेऊ दे त्याला. नंतर बघ पेपर.

थोड्या वेळाने शुभा माझ्या हातात पेपर देत म्हणाली, मॅडम माझा पेपर तपासा ना. ते ऐकून नारूने लगेच भाकरी फडक्यात गुंडाळली आणि स्वतःची प्रश्नपत्रिका माझ्याकडे देत म्हणाला, माझाबी तपासा.

नाही! आता नाही तपासणार मी! आधी सगळ्यांनी बाथरूमला जाऊन या. नंतर पुढच्या पेपरला जाऊन बसा. ओके म्हणत सगळे रांगेत बाथरूमला जाऊन आले.

मुलांना पुढच्या पेपरला बसवून मी पुन्हा मैत्रिणीजवळ आले. ती मुलाला सांगत होती, गेल्या गेल्या मूळ संख्या म्हणजे दोन… तीन,,, पुढच्या माहीत आहे ना? त्याने पुनः नंदीबैलाप्रमाण मान हलविली. मग त्या लिहून काढ आणि दिशाचक्र पण काढून ठेव, मला प्रश्नपत्रिकेवर जर दिसले नाही तर बघ! तिची घालमेल अन तणाव चेहर्‍यावर जाणवत होता.

ते पाहून तिला काय बोलावे हेच मला कळेना. न राहून तिला शेवटी म्हणाले, अगं पेपरची वेळ झाली. त्याला बसवून येऊ चल. आणि तो करेल. हुशार आहे तो. ऐनवेळी तू त्याला भरमसाठ सूचना देऊन गोंधळात टाकू नकोस! बघा ना काकू, ही खूप सांगत रहाते, कंटाळा येतो कधी कधी! वैतागलेल्या चेहर्‍याने तो म्हणाला. अरे तुझ्या भल्यासाठी सांगते ना. चल आता वर्गात सोडवून येते तुला. आणि आता बाहेर नको येऊ असं म्हणत ती उठली. दोघी जणी त्याला वर्गात बसवून पुन्हा झाडाखाली येऊन टेकलो. तिने लगेच त्याची पहिल्या पेपरची तपासणी सुरू केली, मी पण शुभाचा पेपर घेतला, थोड्या वेळात तिनं पेपर मांडीवर आपटवला आणि डोक्याला हात लावून माझ्या हातातील शुभाचा पेपर पहात बसली, गंभीर स्वरात म्हणाली, बघ ना! आम्ही एवढे मुलांकडे लक्ष देतो, त्यांचा अभ्यास घेतो, काळजी करतो, त्यांच्यासाठी जे नाही ते आणून देतो. तरी असे निष्पन्न होते, तुझ्या विद्यार्थ्यांने बघ, किती चांगला सोडवला पेपर! आणि याने बघ किती चुका केल्यात , वर्षभराच्या आमच्या मेहनतीवर पाणी फिरवले. तिचा हात हातात घेत मी म्हणाले, आपण अति शिकलेले पालकच ‘मुलांचा अभ्यास’ यावर अतिचिंता करतो, काळजी करतो, खाजगी शिकवण्या लावतो, घरी तेच तेच गिरवतो, पण अभ्यास हा आपण घ्यायचा नसतोच! तो त्यांनी त्यांचाच करायचा असतो. आपण फक्त वाटाड्या… मार्गदर्शक व्हायचं! दिशा द्यायचं काम करायचं.त्यांना अभ्यासासाठी प्रेरित करायचं… अभ्यासाची आवड निर्माण करायची! सतत त्यांच्याशेजारी बसून, त्यांच्या इच्छेविरुद्ध अभ्यासाला बसवून अभ्यास घेतला तर त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग अशा चुका त्यांच्याकडून आपसूक होतात…

मग काय करायचं? नुसतं लांबून पहायचं बसून कोरड्या चेहर्‍याने ती म्हणाली.

नाही! नुसतं पहायचं नाही, योग्य वेळी गरज असेल तेथे मार्गदर्शन करायचं. प्रसंगी अडचणी आल्याच तर, त्यांना दिशा दाखवून त्यांच्याकडूनच सोडवून घ्यायच्या. आपणच लगेच अडचण सोडवून दिली तर ते स्वतः प्रयत्न करणार नाहीत, बुद्धीला चालना मिळणार नाही , उत्तर शोधण्यासाठी धडपडणार नाही, आता आमच्या वर्गातील मुले बघ ना! घरून फार थोडं मार्गदर्शन! तरीही स्वतः प्रयत्न करतात, अडले तर विचारतात आम्हाला. त्यामुळे बुद्धी प्रवाही रहाते, समस्या निर्माण होते आणि मग ती सोडवायला फक्त चालना देण्याचं काम आम्ही करतो. त्यांच्या पालकांना एवढा वेळही नसतो देण्यासाठी…! तुझे आजचे वागणे पाहून मला तुला एकच गोष्ट सांगायची, तू समजूतदार आहेस लगेच समजून घेशील. तू काय करते त्याच्या अभ्यासात सहभाग घेते. आणि त्यामुळे त्याला अडचणी येण्या अगोदरच त्याला त्यापासून दूर करतेस. त्याला त्याचा अभ्यास करताना अडचणी येऊ दे…त्याचा सामना करू दे.त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न स्वतःला करू दे..आणि नाहीच जमलं त्याला तर मग तुम्हालाच करायचे मार्गदर्शन! पण तेही वेगळ्या पद्धतीने! त्याचा मार्ग त्यालाच काढायला लावायचा. ‘असे करून बघ’ ..‘ही पद्धत वापर बरं’ असे म्हणून! या ज्ञानसागरात त्याचा त्याला विहार करू दे, तू फक्त सोबतीला रहा….कायम! त्याच्या अभ्यासात तुमचा सहवास असू द्या, सहभाग नको! त्याला तुमच्या प्रेमाची गरज असते. अतिरेकी काळजी आणि सूचनांची नव्हे! आपल्या पापण्या तिनं हळुवारपणे मिटून घेतल्या. कदाचित तिची चूक तिच्या लक्षात आली असावी..

– मनीषा दहातोंडे-लबडे, 9422858514

- Advertisment -

ताज्या बातम्या