नगरपरिषद प्रशासनाला दिव्यांगांकडून काळे झेंडे
Share

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – दिव्यांगांच्या मूलभूत मागण्यांसाठी अपंग सामाजिक कल्याण व पुनवर्सन संस्था, श्रीरामपूर व आधार दिव्यांग संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पालिका प्रशासनाला काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले. नगरपरिषदेकडे आजपर्यंतच्या एकूण 3 टक्के राखीव निधीसह विविध मागण्यांसंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे. मात्र प्रशासनाने याबाबत कुठलीही कार्यवाही केलेली नाही. अखेर दिव्यांगांनी हक्क व अधिकारासाठी आधार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य व अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था, श्रीरामपूर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरावे लागले. 29 ऑक्टोबर 2018 रोजी नगरपालिकेवर दिव्यांगांनी अभिनव प्रकारे अर्धनग्न आंदोलन केले. या आंदोलनाने नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले.
तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड यांनी आधार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकार्यांसमवेत तत्काळ बैठक घेऊन आजपर्यंतच्या दिव्यांग राखीव निधीचा हिशोब तसेच शहरात दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन, सुविधा युक्त शौचालये- मुतारी, उदरनिर्वांहासाठी गाळे आदी मागण्यांबाबत येत्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, एक वर्षाचा कालावधी उलटूनही दिव्यांगांच्या मागण्यांबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.
उलट दिव्यांग निधी वाटपाचा कार्यक्रम 11 सप्टेबर रोजी घाईने ठरविण्यात आल्याचा आरोप दिव्यांगांनी केला. या कार्यक्रमात दिव्यांगांनी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात आला.