Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर झेडपी अध्यक्षपद महिलांसाठी राखीव

Share

राज्याच्या समीकरणाचा प्रभाव की विद्यमान अध्यक्षा विखेंची पुन्हा लॉटरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असणार्‍या जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी पुन्हा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण निघाले आहे. यामुळे जिल्हा परिषदेत पुन्हा महिला अध्यक्ष होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात निर्माण झालेला राजकीय तिढा आणि नव्याने निर्माण होणार्‍या राजकीय समीकरणांचा प्रभाव नगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवर पडणार की पुन्हा विद्यमान अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांची लॉटरी लागणार यासाठी 21 जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे.

मंगळवारी राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सोडती काढण्यात आल्या. यात नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुन्हा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आरक्षण निघाले आहे. गेल्या 20 वर्षांपासून नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा विचार केल्यास 2002 ते 2005 या काळात अनुसूचित जाती या पदाला आरक्षण निघाले होते. त्यावेळी मिस्टर शेलार यांना संधी मिळाली. त्यानंतर 2005 ते 2007 या काळात ओबीसीसाठी आरक्षण निघाले. यात बाबासाहेब भिटे यांना संधी मिळाली.

त्यानंतर 2007 ते 2009 या काळात सर्वसाधारण पदासाठी आरक्षण निघाल्याने शालीनीताई विखे पाटील यांनी अध्यक्षपद भूषवले. त्यानंतरच्या अडीच वर्षासाठी पुन्हा विखे याच अध्यक्ष राहिल्या. त्यानंतर पुन्हा 2012 ते 2014 या काळात अध्यक्षपद पुन्हा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत निघाले. त्यावेळी विठ्ठलराव लंघे हे अध्यक्ष झाले. त्यानंतर 2014 ते 2017 या काळात ओबीसी महिला हे आरक्षण मिळाल्याने मंजूषा गुंड या अध्यक्षा बनल्या. 2017 ते आतापर्यंत अध्यक्षपद सर्वसाधारण (खुल्या) वर्गासाठी आल्याने पुन्हा शाालीनीताई विखे पाटील अध्यक्ष बनल्या. आता पुन्हा पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षीत असल्याने जिल्हा परिषदेचा पुढील अध्यक्ष कोण याकडे राज्याच्या नजरा राहणार आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीत मोठा बदल झालेला आहे. एकाच कुटूंबातील व्यक्ती कागदावर एका पक्षात असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दुसर्‍या पक्षातून लढवून विजयी झालेले आहेत. यामुळे राजकीय गुंतागूंत वाढलेली असून अशा परिस्थिती ऐनवेळी अध्यक्ष निवडीच्या वेळी पक्षाचा आदेश (व्हिप) कोण आणि कसा बजावणार असा प्रश्‍न आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते असणार्‍या सदस्यांचे नेते भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे हे गट नेते पक्षाच्या बाजूने की नेत्यांच्या बाजूने व्हीप काढणार हा प्रश्‍न राहणार आहे. विद्यमान परिस्थिती कागदावर जिल्हा परिषद सदस्यांचे कोणत्या गटात अथवा पक्षात वर्गीकरण कराचे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

21 जानेवारीला नवीन अध्यक्ष
राज्य सरकारने जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांना 120 दिवसांची मुदत वाढ दिली होती. ही मुदत येत्या 20 जानेवारीला संपणार असून त्यानंतर 21 जानेवारीला नूतन अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. यासह पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत 5 ते 20 डिसेंबर दरम्यान नगरला होणार असल्याची माहिती यावेळी मिळाली.

महाशिवआघाडीनंतरचे चित्र
राज्यात उदयास येवू पाहणार्‍या महाशिवआघाडीचा विचार केल्यास जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे 19, थोरात गटाचे 9, सेनेचे 6, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे 5 आणि अपक्ष आणि जनशक्तीचे प्रत्येकी 1 असे 41 सदस्य संख्या होईल. जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी 37 हे संख्याबळ आवश्यक आहे. मात्र, यावेळी राष्ट्रवादी पक्षाचा पक्षादेश कोण बजावणार हा देखील तांत्रिक प्रश्‍न आहे. तसेच अपक्ष आणि जनशक्ती ऐनवेळी काय निर्णय घेणार यावर बरेच राजकीय समिकरण अवलंबून राहणार आहे.

विखेंशी पंगा कोण घेणार
राज्यात महाशिवआघाडी न झाल्यास राष्ट्रवादी अथवा काँग्रेसमधून अध्यक्षपदासाठी उमदेवार देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात विखे विरोधात राजकीय पंगा कोण घेणार हा देखील प्रश्‍न आहे. 2009 नंतर अडीच वर्षासाठी अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीमधील पिचड गटासह सेना-भाजपचे 13 सदस्यांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले होते. यंदा देखील विखे पाटील हे अध्यक्षपदासाठी कोणालाही सोबत घेऊ शकतात. यासह गेल्या अडीच वर्षात शालीनीताई विखे पाटील यांनी केलेल्या पक्षीय जोडे बाजूला ठेवून केलेल्या कामाचा फायदा त्यांना होऊ शकतो.

सध्याचे बलाबल
राष्ट्रवादी 19, काँग्रेस 23, सेना 7, भाजप 13, शेतकरी क्रांतीकारी पक्ष 5, महाआघाडी 2, भाकप 1, जनशक्ती 1, अपक्ष 1 असे 72 सदस्य आहेत.

सध्या 72 सदस्य
जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाले. त्यांचे पद संपुष्टात आले असून त्यांच्या गटात पोटनिवडणूक होणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेत विद्यमान परिस्थितीत 72 सदस्यपद अस्तित्वात आहेत. यातून बहूमाताचा आकडा पार करणार्‍या सदस्यांची अध्यक्षपदावर निवड होणार आहे.

तो पर्यंत प्रतोदांचे अधिकार कायम
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अन्य पक्षांनी गट नोेंदणी करत पक्षाचे प्रतोद यांची निवड केलेली आहे. या प्रतोद यांना अध्यक्षपदाच्या मतदानाच्यावेळी पक्षाचा आदेश (व्हीप) बजावाण्याचे अधिकार असतात. जोपर्यंत पक्ष विरोधी कारवाईनुसार या प्रतोद यांच्यावर कारवाई होत नाहीत, तोपर्यंत या गट नेत्यांना त्यांच्या अधिकारांपासून कोणीच रोखू शकत नाहीत, असे कायदेतज्ज्ञांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!