अहमदनगर : रिटायर शिक्षक, डॉक्टरकडून विवाहितेचा छळ

सारसनगर येथील घटना, रिटायर पोलिसाची मध्यस्थीही फेल

0

अहमदनगर : सासरी होणार्‍या छळास कंटाळून विवाहितेने नांदण्यास नकार दिला. सेवानिवृत्त (रिटायर) पोलिसाने मध्यस्थी करत समेट घडविला, त्यानंतरही तिचा छळ सुरूच होता. अखेर तिने डॉक्टर पती व रिटायर शिक्षक सासरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

डॉ. संदीप प्रभू गायकवाड (पती), प्रभू संतू गायकवाड (सासरे) व सुशीला प्रभू गायकवाड (सासू, तिघेही रा. संदीपनगर, सारसनगर, फुलसौंदर मळा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शारदा संदीप गायकवाड या विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली आहे.
2009 मध्ये शारदा हिचे डॉ. संदीप यांच्याशी लग्न झाले. डॉ. संदीप गायकवाड हे पशुधन विकास अधिकारी असून ते सध्या बीड येथे नोकरीस आहेत. त्यांना दोन मुले आहेत. शारदा हिचे सासरी नेहमीच छळ सुरू होता. त्याला कंटाळून तिने माहेर गाठले. रिटायर पोलीस पोटघन यांनी मध्यस्थी करत तिला समजावले. त्यानंतर ती सासरी आली. त्यानंतरही सासरी सुरू असलेला छळ काही थांबला नाही. पती डॉ. संदीप यांनी तिच्याकडे सोडचिठ्ठी मागत तिचा छळ सुरू केला. ही बाब मध्यस्थी करणारे पोटघन यांना कळविल्यानंतर त्यांनी पुन्हा समेट घडवून आणला. मुलगा व पत्नी शारदा यांना घरखर्चासाठी दरमहा 15 हजार रुपये देण्याचा तोडगा काढण्यात आला. मात्र डॉ. संदीप यांनी दिलेल्या पैशातूनच काही पैसे परत नेले. त्याचा जाब विचारल्याने शारदा यांचा गळा दाबून त्यांना मारहाण करण्यात आली. सासरी होणारा छळ सहन करण्यापलिकडे गेल्याने अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
विवाहिता शारदा यांना पती व सासर्‍यांकडून वारंवार मारहाण केली जात होती. अनेकदा त्यांच्यात समेट घडविण्यात आला. मात्र, त्यांचा छळ थांबला नाही. रिटायर झालेल्या पोलिसाची मध्यस्थीही कामी आली नाही.

LEAVE A REPLY

*