अहमदनगर : ‘श्रीनाथ’ पतसंस्थेकडून फसवणूक

5 लाखांची फसवणूक महिला ठेवीदाराचा आरोप

0

अहमदनगर :अहमदनगरमध्ये अवसायनात निघणार्‍या पतसंस्थेच्या यादीत आणखी एकीची भर पडण्याच्या मार्गावर आहे. वडगाव गुप्ता येथील श्रीनाथ मल्टीस्टेट पतसंस्थेने पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची पहिली तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष पोपटराव शेवाळे, मॅनेजर अशोक मेघडंबर यांच्यासह संचालक मंडळाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अरुणा सुनील पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पाटील या विळद येथे राहणार्‍या असून शेती हा त्यांचा व्यावसाय आहे. आठ वर्षापूर्वी पाटील यांनी मुलगी रिचा हिच्या नावे श्रीनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीत 5 लाख 65 हजार रुपयांची ठेवपावती केली. मुलांच्या शिक्षण, विवाहकार्यासाठी त्यांनी जमा केलेली पुंजी ठेव म्हणून ठेवली. त्याचे व्याज त्यांना दरमहा मिळत असे. पाटील यांनी ठेव ठेवतेवेळी वडगाव गुप्ता शाखेत मनोहर शेवाळे मॅनेजर होते. पाटील यांनी त्यांच्याकडे ठेव पैशाची मागणी केली असता त्यांनी आता पतसंस्थेते पैसे नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी पतसंस्थेचे चेअरमन पोपटराव एकनाथ शेवाळे, मॅनेजर अशोक कान्हुजीराव मेघडंबर यांच्याकडे पैशाची मागणी केली पण त्यांनी ते देण्यास टाळाटाळ केली. पाटील यांनी सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील मुख्य शाखेत हेलपाटे मारले. तेथेही त्यांना ‘उडवाउडवी’च्या उत्तराशिवाय काही मिळाले नाही. पतसंस्थेचे सर्व ऑफिस बंद झाले असल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिला.
पाटील व इतर ठेवीदारांनी ठेवीचे पैसे मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 नोव्हेंबरला तीन दिवसांचे उपोषण केले. पैसे देण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर पाटील व इतर ठेवीदारांचे उपोषण मागे घेतले. त्यानंतरही पतसंस्थेने पैसे देण्यास नकार दर्शविला. ठेवीची रक्कम मिळत नसल्याने अखेर पाटील यांनी पोलिसांकडे धाव घेत आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार अर्ज दिला. त्या तक्रार अर्जाची शहनिशा झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अध्यक्ष पोपटराव शेवाळे आणि मॅनेजर अशोक मेघडंबर व इतर संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पहिलाच गुन्हा
    पतसंस्थेच्या 30 शाखा असून सुमारे 45 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तीन महिन्यापासून पतसंस्था आर्थिक दिवाळखोरीत निघाल्याने जवळपास सर्वच शाखा बंद आहेत. पोलिसांत पतसंस्थेविरोधात पहिल्यादांच ठेवीदाराने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
  • पतसंस्थेत विश्‍वासाने ठेवी ठेवल्या. मुदतीनंतर त्या परत न देता संचालक मंडळाने त्या स्वत:च्या फायद्याकरीता वापरून माझी फसवणूक केली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
    – अरुणा पाटील, तक्रारदार.

LEAVE A REPLY

*