अहमदनगर : साईबनला सुरक्षेचे वावडे!

0

अहमदनगर : साईबन या खासगी कृषी पर्यटन केंद्रात बोटींगवेळी कोणत्याही सुरक्षा उपाययोजना न केल्याने संचालकांसह बोट मालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रविवारी बोट उलटून बुडणार्‍या आठ जणांना अन्य पर्यटकांनी वाचविले. त्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

संदीप बाळकृष्ण सप्रे (रा. आगरकर मळा, नगर) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. संदीप सप्रे व त्यांचे साडू नरेंद्र प्रताप शिकरे (रा. दाळमंडई) हे पर्यटनासाठी कुटुंबियांसमवेत साईबन येथे रविवारी गेले होते. सहा व चार सीटाची क्षमता असलेल्या बोटी तेथे आहेत. बोटींगसाठी असलेल्या सहा सीट क्षमतेच्या बोटीत दोन्ही कुटुंबातील आठ जण बसले. बोटीचा एक पॅडल निकामी होता. नावाडीसह 9 जण त्यात बसविण्यात आले.

बोटींग करून बोट किनार्‍याकडे येत असताना उलटली. संदीप सप्रे त्यांची पत्नी सारीका, मुलगा सार्थक, शुभम तसेच नरेंद्र शिकरे त्यांची पत्नी शुभांगी, मुलगी शिफाली, मुलगा गौरव हे पाण्यात पडले. बोटचालकाने पाण्यात पडलेल्या पर्यटकांना न वाचविता पोहत किनार्‍याकडे धाव घेतली. नावाडी प्रशिक्षित नसल्याचे सप्रे यांचे म्हणणे आहे. संदीप यांना पोहता येत असल्याने त्यांनी पत्नी सारीका, मुलगा सार्थक यांना पाण्याबाहेर काढले. पर्यटक पाण्यात बुडाल्याचे पाहून पर्यटनासाठी तेथे आलेले देवेंद्र लांडे, संतोष लोंढे, विलास माने, मनोज गाडळकर यांनी कपड्यानिशी पाण्यात उड्या टाकत बुडणार्‍यांना पाण्याबाहेर काढले. काळे व खराब झालेले पाणी पोटात गेल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

सप्रे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साईबन येथे बोटींग करतेवेळी सुरक्षा जाकीट, सुरक्षा रक्षक/लाईफ गार्ड, सुरक्षा ट्यूब, दोरी, धोकादर्शक सायरन अशी कोणतीच सुविधा नाही. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसवून बोटींग केली. तशी कोणतीही सूचना, कल्पना दिली गेली नाही. बोट उलटल्यानंतर जीव वाचविण्यात हलगर्जीपणा केल्याचे सप्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

60 हजार पाण्यात
दुर्घटना घडली त्यावेळी सप्रे यांच्याजवळ असलेले दोन मोबाईल तसेच शुभांगी शिकरे यांच्या गळ्यातील 4 तोळ्याचे गंठण पाण्यात पडून गहाळ झाले. बुडणार्‍यांना वाचविण्यासाठी मदतीसाठी धावलेले संतोष लोंढे यांच्या हातातील अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठीही पाण्यात पडली. सोने व मोबाईल असा सुमारे 60 हजार रुपयांचा ऐवज तेथील काळ्याकुट्ट पाण्यात बुडाला आहे.

LEAVE A REPLY

*