राज्य नाट्य स्पर्धा समीक्षण : द स्प्लिट – फसलेली नाट्यकृती

0

राज्य नाट्य स्पर्धा समीक्षण : 

प्रत्येक माणसात दोन मनं किंवा दोन माणसं असतात. ती वेळप्रसंगी बाहेर पडतात. नेमका कोणता माणूस खरा आणि कोणता खोट हे ठरवणं मुश्कील होतं. खरे तर समाजही दुटप्पीच असतो. हे दाखवण्याचा प्रयत्न रंगोदय प्रतिष्ठानने द स्लिट या नाटकाच्या माध्यमातून केला खरा पण तो सपशेल फसला. अडखळत म्हटले जाणारे संवाद, लांबलेले प्रसंग, सदोष संहिता आणि कलाकारांचा सुमार अभिनय, नेपथ्याच्या अभावामुळे त्यांनी नाट्यरसिकांची फसगत केली. एक मात्र झाले. कलाकारांंची राज्य नाट्य स्पर्धेत नाटक करण्याची हौस पुरी झाली. तिसर्‍या दिवशी सादर झालेले स्पिट अशा अनेक कारणांनी रसिकांच्या लक्षात राहील.
एखाद दुसर्‍या कलावंताचा अभिनय सोडला तर दिग्दर्शक आणि लेखकाला काय संदेश द्यायचा होता हेही या नाटकाला स्पष्ट करता आले नाही. खरे तर ते संहितेवरून गंभीर नाट्यकृती होती. परंतु तिचे हसे झाले. छोट्या छोट्या गोष्टीही त्यांच्या निदर्शनास येत नव्हत्या. रसिकच त्यांना ते खालून सूचवित होते. पार्श्‍वसंगीत तर द्यायचे म्हणून दिले होते. एका गंभीर प्रसंगात चक्क गिटारीचे रोमांटिक ध्वनी आहेत. प्रकाश योजनेचाही ताळमेळ दिसला नाही.
रंगोदय प्रतिष्ठानसाठी ज्योती खिस्ती यांनी ही नाट्यसंहिता लिहिली होती. प्रसाद बनसोडे यांनी दिग्दर्शन केले. सागर खिस्ती यांनी तेजस आणि माधवची भूमिका केली. वरद व हवालदार विशाल जोशी, श्याम व हवालदार प्रदीप वाळके, बाबा- अशोक औटी, मुलगी -समृध्दी खिस्ती, विश्‍वास घातके – इरफान कुरेशी, इन्सपेक्टर मोकाशी – संतोष शिंदे, नमिता- दीक्षा कुलकर्णी यांनी केली.
माधव हा लेखक आहे. नमिता त्याची प्रेयशी आहे. माधवचे लिखाण आपल्या नावावर करण्यासाठी विश्‍वास घातके अनेक लटपटी करतो. नमिताला वेठीस धरून तिच्यावर अत्याचार करतो आणि शेवटी खून करतो. माधवच्या मित्रांनाही तो संपवतो. मग नमिता त्याच्या स्वप्नात येते आणि घातकेचा बदला घ्यायला लावते. तेव्हा सरळ,साध्या माधवच्या मनात घृणा निर्माण होते आणि त्याच्यात तेजस जागा होतो. तो घातकेचा खून करतो. पोलीस त्याला पकडतात. तो आपले नाव तेजस असल्याचे सांगतो. आणि गुन्हाही कबूल करतो. मात्र, तो माधव असतो. नंतर पोलिसांना तो मनोरूग्ण असल्याचे जाणवते. शेवटी कोर्ट त्याला रूग्णालयात पाठवून उपचार करायला लावते. अशी या नाटकाची थिम आहे.
कोर्ट शिक्षा देईपर्यंत जे घडते ते नाट्य रंगोदयच्या कलाकारांना रंगवता आले नाही. सागर खिस्ती यांनी माधव आणि तेजसच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ते पेलवले नाही. काही प्रसंगात त्यांचा अभिनय खुलला हेही नाकारता येत नाही. नमिताच्या बाबाशी झालेले त्यांचे संवाद अगदीच बाळबोध वाटले. औटी यांनी वठवलेले बाबा जेमतेम. माधवच्या मित्रांची एंट्री हास्य निर्माण करून गेली. त्यांनी नगरी स्टाईल म्हणलेले संवाद लक्षात राहिले. विश्‍वास घातकेची भूमिका इरफान कुरेशी यांनी सुंदर वठवली. त्यांचा अभिनयही छान जमलाय. मात्र, त्यांचा मध्येच खून झाल्याने नाटकाची गतीच हरवली.
मध्यंतरानंतर तर नाटकातील जानच निघून गेली. संवाद पहिल्या रांगेत बसलेल्या रसिकांनाही ऐकू येत नव्हते. मध्येच संगीत वाजवून आहे त्या प्रसंगाचा विचका केला जात होता. तेही मोठ्या आवाजात होते. त्यामुळे संवादच ऐकू येत नव्हते. प्रसंग संपल्यानंतर तेच पात्र पुन्हा येत होते. मग नेमका प्रसंग संपवण्याचा अर्थ उलगडत नव्हता. शेवटचा पोलीस ठाण्यातील प्रसंग अगदीच रटाळ झाला आहे. दोघे चर्चासत्राला बसल्यासारखे संवाद म्हणत होते. कोणाचाच कोणाला पायपोस नसल्यासारखे झाले. आरोपीच्या अंगावरील रक्ताचे कपडे मुद्देमाल म्हणून जप्त करायचे असतात. पण तसे झाले नाही. मनोरूग्णांचे डॉक्टर पोलिसांनाच वकिलासारखे प्रश्‍न विचारतात, हेही खटकते.
हौशी कलावंत म्हणून या सार्‍या त्रुटींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शासन प्रत्येक नाटकावर खर्च करीत असते. किमान त्यासाठी चांगला सराव करून सादरीकरण करणे गरजेचे आहे. एका आठवड्यात प्रयोग बसवून हौस भागविण्याचा कलाकारांचा उद्देश असेल तर त्याला काय म्हणायचे. रंगोदय ही संस्था जुनी आहे. त्यांनी आपल्या लौकिकाला साजेसा असा प्रयोग करणे नगरकरांना अपेक्षित आहे. पुढील वर्षी ते ही अपेक्षा नक्की पूर्ण करतील.

LEAVE A REPLY

*