राज्य नाट्य स्पर्धा समीक्षण : लास्ट स्टॉप : एक घायाळ थांबा

0

रानावनातले, गावकुसाबाहेरचे भटके शहरात स्थिरावलेत. पाण्याच्या टाकीखाली, पुलाखाली, बसस्थानकावर असे मिळेल त्या जागी त्यांची पथारी पडलीय. पण त्यांची पोटासाठीची लढाई अजूनही संपलेली नाही. बंगल्यातलाही प्रत्येकजण आपापल्या पोटासाठी धाव धावतोय. फरक इतकात भटके आपली भाकरी उंकांड्या शोधताहेत तर चाकरमाने कंपन्यात, ऑफिसातील फायलीत. बाजूला काय चाललंय हे डोकावून पाहायलाही त्याला वेळ नाही. जमलंच तर त्याला समोरच्याचा कान, खिसा कापायचाय… सामाजिक उत्थानाच्या गप्पा मारणार्‍यांना, आत्मा-परमात्म्याची भेट घडवायला निघालेल्या संत, महाराजांना इंडियात राहणारा भारत दिसत नाही. उंकांडे फुंकणार्‍या लोकांच्या दुःखाकडं त्याच्याच बिरादरीतील वरच्या थरातील लोक आंधळी कोशिंबीर खेळताहेत. कारण त्याला आपल्याच माणसांची मुंडी पिरगाळून चिल्लर-नोटा-डॉलर, एरियाचं अध्यक्षपद असं काहीबाही पदरात पाडून घ्यायचेय… लास्ट स्टॉप नाटक समाजाचा असा विरोधाभासी नजारा दाखवते.

राज्य नाट्य स्पर्धेत नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील ग्रामीण कला क्रीडा अकादमीच्या लास्ट स्टॉप नाटकाने समाजातील दुखरी नस दाबत रसिकांच्या हदयात कळ उठवली. लेखक बाळासाहेब चव्हाण यांनी समर्पकपणे भटक्याचं जिणं या संहितेत उतरवलं आहे. काशिनाथ सुलाखे पाटील या दिग्दर्शकाने या नाटकाच्या रूपाने अक्षरशः समर्थपणे जिवंत केले. गावाकडच्या कलाकारांचा कलाविष्कार रसिकांना खूपच भावला.
हे समस्याप्रधान नाटक आहे. ते समाजातील गरीब-श्रीमंतीवर लक्ष केंद्रीत करतानाच माणसाच्या विकृतीवर बोट ठेवते. गरिबांसाठी लढणार्‍या सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचा ढोंगीपणाचा भुरकाही फाडते. उच्चभ्रू समजल्या जाणार्‍यांचा लोटचपणाही दाखवते. समाजाने वेडे

ठरवलेलेही कसे शहाण्यासारखे बोलतात. पण त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, हाच समाजाचा वेडेपणा असतो. हे दाखवून लास्ट स्टॉप अंतर्मुख करायला लावते.
एक भटके कुटुंब बसस्थानकावरच पथारी मारते. त्या एरियातील दादाचा त्यांना आसरा आहे. मात्र, तो त्यांच्याकडून हप्ते घेतो. त्या कुटंबातील स्त्री नानी ही भंगार, कागद वेचायला जाते. तर तिचा अधू नवरा नाना भिग मागून कुटुंब चालवतो. त्यांची मुलगी फुलीचा नवरा चोर आहे. तो बहुतांशी वेळ तुरूंगातच असतो. त्यामुळे नानी आपल्या मुलीचा त्याच्यापासून काडीमोड करते. तिच्या पोटातील बाळ तपासायला आलेल्या जावयाला आणि डॉक्टरला ती पिटाळून लावते. मंत्र्याच्या दौर्‍यासाठी त्यांना हिरामण स्थानकावरील पथारी हलवण्यास भाग पाडतो. पण गर्भवती मुलीला घेऊन दुसर्‍या ठिकाणी कसं जायचं हा नानीचा सवाल त्याच्या काळजाला पाझर फोडीत नाही. सरकारी अधिकारी येतात आणि तिचा संसार उधळून टाकतात. तशातच फुली बाळंतीण होते असे नाटकाचे कथानक आहे.
रंगा अभय गोले यांनी वेडा असा रंगवला आहे की त्याचे नाव ते. नानाची भूमिका खुद्द दिग्दर्शक सुलाखे पाटील यांनी साकारलीय. नानी शोभा नांगरे-चांदणे आहेत. फुली गौतमी आव्हाड, बाशा – राहुर जरे, हिरामण – राम पाटोळे, डॉक्टर व विंचूरकर- प्रा. सचिन मोरे, अधिकारी अक्षय सुलाखे पाटील, हवालदार अनिल गलांडे, इन्सपेक्टर-नीलेश चांदणे, साथीदार सुदीप नेटके, बबन झोंड, बाबूराव काळे यांच्या भूमिका आहेत.
नानीच्या भूमिकेला चांदणे यांनी न्याय दिलाय. तिच्या भूमिकेने नाटकाला जान आलीय. भटक्या समाजातील स्त्री हुबेहुब नानीच्या रूपात त्यांनी उतरवलीय. त्या नाटक नव्हे नैसर्गिक अभिनय करतात की काय असंच वाटत होतं. पूर्वी पैलवान असलेला आणि परिस्थतीने गलित गात्र झालेला कुटुंबप्रमुख नानाचाही (काशिनाथ) यांचा अभिनय त्याच तोडीचा. बहुतांशी दिग्दर्शकाला स्वतः भूमिका करण्याचा मोह आवरत नाही. परंतु त्यामुळे फसगत होते. मात्र, सुलाखे पाटलांनी नानाची भूमिका करून नाटकाची उंची वाढवली. गौतमीने वठवलेली फुली अप्रतिमच. तिच्या तोंडची भाषा, हावभाव सर्वकाही नैसर्गिक. अभय गोले यांनी रंगवलेला रंगा कमालीचा वास्तववादी आहे. मध्येच संवाद म्हणण्याची कला वाखाणण्यासारखी. तो अगम्य बडबड करीत असल्याचे वाटते. मात्र, तो समाजातील विकृती, वैगण्यावर बोट ठेवतो. जेवायला बसल्यावर लोक कसे ताटात वाढले की खायला सुटतात. इतरांना पुढे जायला सांगून मागे पळून जातात. नवरा इकडे, बायको तिकडे राहते, ज्यांच्याकडे वस्त्र नाही ते उघडे आणि वस्त्र असणारीही उघडेच फिरतात. हे त्याचे संवाद नाटकाला पुढे घेऊन जाणारे आहेत. उगाच त्याची बडबड नाही. तो खरोखरोच वेडा आहे की काय असा संशय येण्याइतपत तो नैसर्गिक झालाय. नानीचे कुटुंबीय दोन वेळच्या जेवणाला मोताद असले तरी ते वेड्याला सांभाळते. यातून त्यांच्या माणुसकीचे दर्शन होते.
मुलगा की मुलगी हे तपासण्यासाठी फुलीचा नवरा येतो. त्याला नानी सुनावते. मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही सारखेच. पोरीची कूस उजवण्याशी मतलब. साधू संतांच्या संगतीत रमणारा म्हातारा फुलीला आंघोळ घालताना चोरून पाहतो. ही घटना उच्चभ्रू वर्गातील चहाटळ म्हातार्‍यांचे दर्शन घडवते. नाना-नानी गरीब आहेत. पण त्यांना कुणाचा हरामाचा पैसा नको आहे. फुलीही तशीच. ती गरज असतानाही नवर्‍याने चोरून आणलेली रक्कम नाकारते. या कुटुंबाला छळणारा दलित समाजातील कार्यकर्ता कसा आप्पलपोटा आहे. तो आपल्या फायद्यासाठी पक्ष, जात कसा वेठीस धरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला संघर्षाचा अर्थ कसा सोईस्कर घेतो, त्याची पक्षनिष्ठाही कशी निसटती आहे. तो कसा पद, पैशासाठी लाचार होतोय, याच्यावरही हे नाटक भाष्ट करते.
सर्वकाही चांगले होऊनही नाटकाचा शेवट आणि परिमाणकारक दाखवता आला नाही. यासाठी संहिता थोडी जबाबदार म्हणावी लागेल. स्त्री जन्माचे स्वागत हा सुखांत दाखवण्याचा प्रयत्न असला तो अगोदरच्या मेहनतीवर पाणी फिरवणारा आहे. एक-दोन प्रसंगात पात्र लाईट बंद होण्याअगोदरच विंगेत जाते. एक-दोन ठिकाणी संवाद अडखळले आहेत.
नेपथ्य नीलेश चांदणे, सचिन घोडके, प्रकाशयोजना डॉ. किरण गणबोटे, संगीत प्रवीण तांबे, रंगभूषा अवंती गोले, वेशभूषा हनुमंत वाबळे, रंगमंच व्यवस्था प्रा. डॉ. राजेंद्र परदेशी, प्रा. विजय साबळे यांची आहे. अभिमान गायकवाड नाटकाचे निर्माते आहेत.
सकस कथानक आणि दमदार नैसर्गिक अभिनयाने लास्ट स्टॉप थांबले नाही तर तुफान दौडले. गावाकडचे कलाकारांच्या अभिनयाला रसिकांनी चांगली दाद दिली. नाटकात शिव्या आहेत. पण त्या अश्‍लिलतेकडे झुकणार्‍या नाहीत. बसस्थानकात लावणालेल्या जाहिराती, कडेला दोरी बांधून टाकलेले पाल, चूल, काळा झालेला डबा, गाडगे, सरपण सारे वास्तव वाटते. प्रकाश योजनेचाही चांगला वापर झाला. रंगभूषा आणि वेशभूषाही उत्तम. संगीतही छान. पण त्यात आणखी वाव होता. लास्ट स्टॉप समाजातील अनेक प्रश्‍नांपुढे लागलेला फुलस्टॉप काढून प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात कमालीचे यशस्वी ठरले.

 

LEAVE A REPLY

*