अहमदनगर : राज्य नाट्य स्पर्धा समीक्षण : हाटेल : गावगाड्याचा देखणा आरसा

0

गावात आलेले नवीन बदल गावपण बदलून टाकतात. नव्या बदलांसोबत स्वार्थीपणाही गावात घुसतो. मतांचे राजकारणाने गावाचे विभाजन करते. माणसामाणसांत-जातीजातीत फूट पाडते. एकमेकांची काळजी घेणारा गावकरी एकमेकांच्या जीवाववर उठतो. जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावरील खेडेगावातील स्थित्यंतराचे हुबेहुब चित्रण हाटेल या नाट्यकृतीत आहे. गावातील लोकांचे बेरकीपण, कुरघोडी, बिलंदरपणा, कलंदरवृत्ती अन गावगुंडीतही जापोसली जाणारी माणुसकी असं सारी काही हाटेलात दिसलं. त्यामुळेच ही कलाकृती रसिकांना भावली.

राज्य नाट्य स्पर्धेत प्रगत कला महाविद्यालयाने हाटेल हे नाटक सादर केलं. गणेश गाडेकर हे या नाटकाचे लेखकआणि दिग्दर्शक आहेत. जागतिकीकरणामुळे बदलणारी गावं, तेथील गावगुंडी आणि गावच्या माणसांतील साधेपण, त्यांचे दारिद्र, तरीही मनात असलेला ओलावा दाखविण्यात गाडेकर यशस्वी झालेत. चार-दोन कलाकारांना घेऊन नाटक बसवणं जिकीरीचं पण गाडेकर यांनी तब्बल 28 कलाकारांना घेऊन हा प्रयोग केला. आणि कुठेही त्याला तोल ढळू दिला नाही. याबद्दल त्यांचे कौतुकच. एकही पात्र अनावश्यक असल्याचे जाणवले नाही. प्रत्येक गावकर्‍याने केलेली भूमिका उत्तमच. वेशभूषा, संगीत समर्पकच होती. नेपथ्याने तर नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेलं.
विठ्ठलवाडीत एका तरूणाचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या साक्षीनेच सारे नाट्य घडते. म्हणून त्याचे शीर्षकही समर्पकच. गावातील लोक एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यात पटाईत आहेत. गावातील एका गरीब मुलीचे लग्न ते प्रत्येकजण वर्गणी करून लावून देतात. लोकांमध्ये वाद आहेत. मात्र, ते आपसात मिटवतातही. एक दिवस गावात पंतप्रधान कार्यालयाचे पत्र येते. त्या पत्रातूनच पुढे नाट्य घडत राहते. आमदार, खासदार त्या गावात येतात. विकासनिधी देतात. गावातील लोकांना हाताशी धरून आपापले गट तयार करतात. त्यांनी केलेला तोंडदेखला विकासही लोकांसाठी गैरसोयीचा ठरतो. नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरूणांना कह्यात ओढले जाते. मग राजकारण घुसलेल्या गावातील लोक एकमेकांचे शत्रू होतात. खून पाडायलाही कमी करीत नाहीत. त्यामुळे गावातील माणुसकी मरून जाते. पंतप्रधानांचा दौरा रद्द होतो. आमदार-खासदारांनाही वाटते उगाच आपला निधी गेला. गावकर्‍यांत तोपर्यंत उभी फूट पडलेली असते. असे नाटकाचे कथानक आहे. गाडेकर यांचे लेखन आणि दिग्दर्शन असल्याने त्यांनी हा गावगाडा अप्रतिम साकारला.
अनुराग चितळे, आशिष तेलंगुर, दर्शन लोखंडे, ओम बांदल, कल्पेश शिंदे, गणेश शेंबडे, सुमित मरकड, ऋषिकेश यमजाल, राहुल कांबळे, अभिजीत डमाळे, ललिम काळे, नीलेश बुरा, अक्षय कुसमुडे, दिग्विजय बसापुरे, सूरज कुरमुडे, अभिजीत शेजवळ, तन्मय बनकर, शिवाजी हाळनोर, विशाखा पोखरकर, पूजा मुळे, ललिता उबाळे, आयुषा जाधव, ऐश्‍वर्या कुलकर्णी, पार्वती भोंग, शर्वरी अवचट, प्रणव भांड, साहील महाजन, गणेश गाडेकर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
दर्शनने साकारलेला शेषनाग, गणेश शेंबडेचा विष्णू, सुमित मरकडचा पाटील, ऐश्‍वर्याची आजी या व्यक्तिरेखा उठून दिसल्या. प्रणव आणि साहीलने या शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिका चांगल्या झाल्यात. नेपथ्यातील विहीर, वडाचे झाड, विठ्ठलाचे मंदिर, पार, घरे सारेच सुंदर चित्रण झालेय.
नेपथ्य- नीलेश बुरा, प्रकाश योजना- श्रेयस बल्लाळ, बुध्दभूषण पटेकर, संगीत – सचिन कुसळकर, रंगमंच – ऋग्देव फाकटकर, रंगभूषा – सुप्रिया मैड, वेशभूषा – पूजा मुळे, तंत्रज्ञ – निसर्ग मेहता.
गणेश गाडेकर हे चांगले कलावंत आहेत. त्यांनी प्रतिकात्मक म्हातारा बनून अवघे नाटकभर ते मूक बसून राहिले. ते नाटकात असते तर आणखी मजा आली असती. ही कलाकृती साकारताना काही गफलतीही झाल्या. आजीबाईचे सगळे केस पांढरे दाखवले. गावातील चित्रण असताना एका महिलेचा बॉयकट होता. हे पदर पडल्याने ररिसकांना दिसले. काही संवाद नको होते. त्यामुळे काही काळ नाटकात रटाळपणा आला. गणपती, पंढरीची वारी, दसर्‍याचे सोन असे प्रसंग नाटकातून वगळले असते तरी फारसा फरक पडला नसता. मात्र, गावात टीव्ही आल्याचा प्रसंग समर्पकच होता. कथानकात गावात पंतप्रधान येतात असा प्रसंग आहे. मात्र, ते विठ्ठलवाडीत कशासाठी येतात. त्याचे कारण स्पष्ट होत नाही. आणि दौरा रद्द होण्याचेही. मंदिरात प्रतिकात्मक म्हातारा दाखवला आहे. तो माणुसकी म्हणून ग्राह्य धरला जाईल. शेवटी गावातील गावपण हरवल्याने तो मरतो. त्यावेळी हाटेलवाला, पाटील त्याकडे धावतात. हे उमगत नाही.
मात्र, प्रगतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली ही कलाकृती शंभरपैकी शंभर मार्क देण्यासारखी.

 

 

LEAVE A REPLY

*