अहमदनगर : ‘मर्डरवाले कुलकर्णी’वर आळ

नावाचे ‘नाटक’ नागपूरकरांनी नगरकरांवर साधला निशाणा!

0

अशोक निंबाळकर @ अहमदनगर : प्रसिद्ध नाट्य लेखक शेक्सपिअर नावात काय आहे, असं म्हणत असला तरी महाराष्ट्राच्या नाट्य वर्तुळात नावावरूनच गदारोळ सुरू झाला आहे.

राज्य नाट्य स्पर्धेत नगर केंद्रावर सादर झालेल्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’वर नाव चोरीचा आळ आलाय. त्याबाबत सांस्कृतिक संचालनालयाकडे नागपूरच्या लेखकाने तक्रार अर्जही केलाय. नाटकात मर्डर करायला निघालेले ‘कुलकर्णी’ सहीसलामत सुटतात. मात्र, या तक्रारीमुळे त्यांच्याकडे संशयाने पाहिले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून या नावाच्या ‘नाटका’चा सोशल गोंधळ सुरू आहे. राज्य नाट्य स्पर्धेचा गेल्या आठवड्यात पडदा पडला. आता सर्व रंगकर्मी निकालाची वाट पाहत असताना हा नवाच वाद उदभवला आहे. व्यावसायिक की हौशी असा वाद स्पर्धा सुरू असताना रंगला होता. निकालाची उत्सुकता असताना मर्डरवालेबाबत तक्रार गेली. तशी तक्रार आल्याचे संचालनालयाच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

नगरचे युवा रंगकर्मी अमित खताळ यांनी मर्डरवाले कुलकर्णी हे नाटक सादर केले होते. त्यांनी स्वतःच या नाटकाची संहिता लिहिली होती. दिग्दर्शकही तेच होते. गेल्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नागपूर केंद्रावर जयंत उपाध्ये लिखित मर्डरवाले कुळकर्णी या नाटकाचा प्रयोग झाला होता. त्या लेखकानेच संचालनालयाकडे नगरच्या कुलकर्णीवर आक्षेप घेतला आहे. कुळकर्णी विरूद्ध कुलकर्णी असे वादाचे नाट्य रंगल्याने नाट्यकर्मींमध्ये चवीने चर्चा केली जात आहे.

नगरमध्ये सादर झालेल्या नाटकाची संहिता वेगळी आहे. केवळ नावात साधर्म्य वाटते. संचालनालयाची परवानगी घेऊनच हे नाटक सादर केलं. उपाध्ये यांची आणि माझी संहिता समोरासमोर ठेवून तपासून पाहा. त्यात कुठेच साम्य आढळणार नाही. त्यांनी नाटक पाहिले नसल्याने तक्रार केली असावी, असे नगरच्या कुलकर्णीचे लेखक खताळ यांनी नगर टाइम्सशी बोलताना सांगतिले.

मी नगरचे कुलकर्णी पाहिलेले नाही. माझा आक्षेप नावाला आहे. केवळ कुळकर्णीचे कुलकर्णी केलेय. या नाटकाला परवानगी कशी दिली, अशी नागपूरचे लेखक उपाध्ये यांची तक्रार आहे. संहिता वेगळी असेल तर नाटक करता येते. अपघाताने दोन्ही नाटकाचे नाव एक नाव असू शकते. त्यात काहीही वावगे नाही, असे मत एका ज्येष्ठ रंगकर्मीने व्यक्त केले.

  • कुळकर्णी विरूद्ध कुलकर्णी
    नागपूर केंद्रावरील कुळकर्णी विरूद्ध नगरचे कुलकर्णी या नाटकाबाबत यंदा वाद उदभवला आहे. परंतु गेल्या वर्षीही नागपूर केंद्रावरील एक नाटक जसेच्या तसे सादर झाले होते. त्याबाबतही तक्रारी गेल्या होत्या. संचालनालयाने गंभीर दखल घेत ते नाटक बाजूला केलं. परिणामी कोणतेच नाटक अंतिम फेरीसाठी पाठवता आलं नाही. यंदाही नागपूरच्याच नाटकाचा संदर्भ आलाय. हा योगायोग की आणखी काही याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे.
  • नेमका कशाला आक्षेप
    या नाटकात ज्येष्ठ रंगकर्मी यांनी पी. डी. कुलकर्णी यांनी भूमिका केली आहे. ते गेल्या वर्षी नागपूरच्या केंद्रावर परीक्षक असताना त्यांनी ते नाटक पाहिले होतं. ते रंगभूमी परीनिरीक्षण मंडळावर आहेत. त्या पदावर असलेल्या रंगकर्मीने नाटकात सहभागी होऊ नये, असा नियम नाही. परंतु एवढ्या मोठ्या रंगकर्मीने हौशीत भूमिका करणे योग्य नाही. त्यांच्या ज्येष्ठतेचा परीक्षकांवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून दूर राहणे योग्य होतं, असा रंगकर्मींचा सूर आहे.
  • हा तर अभिव्यक्तीचा मर्डर
    माझे नाटक रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. सभागृहात बसायला जागा नसतानाही लोक पायर्‍यांवर बसून होते. ते बक्षिसाच्या स्पर्धेत आहे. त्यामुळेच या नाटकाबाबत उगाचच वाद निर्माण करून मर्डर करण्याचे काम सुरू आहे. ही येथील रंगकर्मींची जुनीच खोड आहे. रडीचा डाव खेळून आपले नाटक वरच्या क्रमांकावर कसे जाईल, यासाठी त्यांची ही धडपड चाललेली असते. उपाध्ये यांनाही याच लोकांनी भरीस घातले आहे. मी प्रतिक्रिया द्यायच्या मूडमध्ये नाही. कारण निरपराध असताना उगाच संशय नको म्हणून व्यक्त व्हावे लागले. – अमित खताळ, दिग्दर्शक, नगर.

LEAVE A REPLY

*