अहमदनगर : लग्न घटिका घटली

0

अहमदनगर : डिसेंबर महिन्यांतील 16 तारखेपासून सुरू होणारा गुरू-शुक्राचा अस्त, त्यानंतर चतुर्मास आणि अधिक ज्येष्ठ मास, यामुळे येत्या वर्षभरात अवघे 64 विवाह मुहूर्त असल्याने मंगल कार्यालये, लॉन्ससह केटरिंग व्यवसाय अडचणीत सापडणार आहे. विवाह सोहळ्याशी संबंधित व्यवसायातील नगर शहरातील लाखो रुपयांची उलाढाल यंदा मंदावणार असून, कमी लग्नतिथीमुळे सर्व योग जुळवून आणताना वधू- वर पालकांची दमछाक होणार आहे. घटलेल्या घटीकांचा फटका नगर शहरातील 16 मंगल कार्यालय आणि 50 ते 55 केटरींग व्यवसाय करणार्‍यांना बसण्याची शक्यता आहे. तुळशीचे लग्न आटोपल्यानंतर 21 नोव्हेंबरपासून लग्नाचे बार उडण्यास सुरुवात होणार आहे. 16 डिसेंबर 2017 नंतर पौष महिन्यांत विवाहाचे मुहूर्त नाहीत. त्यामुळे थेट 5 फेबु्रवारी 2018 ला विवाह मुहूर्त आहे. 14 मार्चनंतर पुन्हा चैत्र महिन्यांत मुहूर्त नाहीत. 16 डिसेंबर 2017 ते 5 फेबु्रवारी 2018 दरम्यान शुक्राचा अस्त, 16 मे ते 13 जून 2018 या कालावधीत ज्येष्ठ अधिक मास, 23 जुलै ते 20 नोव्हेंबर 2018 या कालावधीत चतुर्मास आणि 15 नोव्हेंबर 6 डिसेंबर 2018 या दरम्यान, गुरूचा अस्त असल्यामुळे विवाह मुहूर्त नाहीत. त्यामुळे वर्षभरात केवळ 64 विवाह मुहूर्त असणार असून, या मुहूर्तावर लग्नाचा बार उडवताना वधू-वर पित्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.

कमी विवाह मुहूर्त असल्यामुळे विवाह सोहळ्याशी संबंधित मंगल कार्यालये, लॉन्सचालक, केटरिंग व्यावसायिक, स्टेज सजावटकार यापासून ते पुरोहितापर्यंत सारेच आर्थिक अडचणीत सापडणार आहेत. आधीच नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीतून अद्यापही मंगल कार्यालयासह केटरिंग व्यावसायिक मंदीच्या परिस्थितीतून बाहेर आलेले नाही. त्यात घटत्या विवाह मुहूर्तांमुळे व्यावसायिकांच्या आणखी चिंता वाढणार आहेत. विवाह सोहळ्याशी निगडित छायाचित्रकार, सजावटकार, फुलविक्रेते, पुरोहित आदी छोटे व्यावसायिकही अडचणीत येणार आहेत. दाट लग्नतिथीच्या दिवशी संबंधित व्यावसायिकांची सुविधा पुरविताना दमछाक होणार आहे. विवाह मुहूर्तांची संख्या कमी असल्यामुळे आतापासूनच पुढील वर्षाच्या तारखांना मंगल कार्यालयांसह केटरिंग व्यावसायिकांचे बुकिंग सुरू झाले असून, अपेक्षित मंगल कार्यालय मिळविताना वधूपित्यांची दमछाक होताना दिसून येत आहे.

नगर शहरात 16 मंगल कार्यालय असून 50 ते 55 केटरींगाचा व्यवसाय करणारे आहेत. यासह लग्नसाठी आवश्यक असणारे बॅण्ड पथकांची संख्या मोठी आहे. दरवर्षी नगर शहरात लग्न समारंभाची उलाढाल 50 ते 60 लाख असते. यंदा कमी मुहूर्तामुळे यात निम्म्याने घट येणार आहे. 

गुरू-शुक्राचा अस्त काळ आणि अधिक मासात विवाह केले जात नाहीत. सन 2018 मध्ये विवाह मुहूर्त कमी आहेत. त्यामुळे प्रत्येक मुहूर्तावर विवाहांची संख्या जास्त राहील. विवाह मुहूर्त कमी असल्यामुळे एकाच तारखांना मंगल कार्यालय, केटरिंग, गुरुजी आदी सुविधा उपलब्ध होण्यास अडचणी येतील. याचा फटका वधू-वर पित्यांना बसणार आहे.गुरू-शुक्राचा अस्त काळ आणि अधिक मासात विवाह केले जात नाहीत. सन 2018 मध्ये विवाह मुहूर्त कमी आहेत. त्यामुळे प्रत्येक मुहूर्तावर विवाहांची संख्या जास्त राहील. विवाह मुहूर्त कमी असल्यामुळे एकाच तारखांना मंगल कार्यालय, केटरिंग, गुरुजी आदी सुविधा उपलब्ध होण्यास अडचणी येतील. याचा फटका वधू-वर पित्यांना बसणार आहे.    – संदीप घोडके, ज्योतिष अभ्यासक, सावेडी

आर्थिक फटका बसेल
सर्वसाधारणपणे वर्षभरात 100 मुहूर्त असले की, 50 ते 60 तारखांना बुकिंग होते. यंदा मात्र, मुहूर्तांची संख्या निम्म्यावर आल्याने बुकिंग आणखी घटणार आहे. त्यामुळे साहजिकच मंगल कार्यालयांना आर्थिक फटका बसणार आहे. मंगल कार्यालय अधिक दिवस रिकामे राहिले तर देखभालीचा जास्त खर्च येतो. याशिवाय वीज, पाणी यांचाही खर्च असतोच. मजुरांचेही वेतन द्यावे लागते. आधीच नोटा बंदी आणि जीएसटीमुळे अडचणीत असणारे मंगल कार्यालय चालकांची अडचण यंदाही वाढणार आहे.
– ज्ञा. रा उर्फ बाळासाहेब पवार, संचालक, ओम मंगल कार्यालय, नगर

 

LEAVE A REPLY

*