अहमदनगर : 15 वर्षांनंतर डांबराचा थर;बाजारपेठ, चितळेरोड, डाळमंडई परिसरातील रस्त्याचे भाग्य उजाळणार

0

10 कोटींचे विशेष अनुदान, उपमहापौर छिंदम यांची माहिती

बाजारपेठ, चितळेरोड, डाळमंडई परिसरातील रस्त्याचे भाग्य उजाळणार

अहमदनगर :  राज्य शासनाने अहमदनगर महापालिकेला दहा कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहे. त्यातून मध्यनगर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. कोणताही हिस्सा न भरता महापालिकेला अनुदान आणणारे भाजप एकमेव असल्याचा दावा उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केला आहे.
छिंदम यांनी पत्रकारांशी संवाद साधून ही माहिती दिली. गटनेते सुवेंद्र गांधी हेही यावेळी उपस्थित होते. खासदार दिलीप गांधी यांच्या पाठपुराव्यामुळे अहमदनगर महापालिकेने वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी 17 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. राज्य शासनाने दहा कोटी रुपये मंजूर केल्याचे पत्र अवर सचिव विवेक कुमार यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. शहरातील 11 प्रभागांत या निधीतून रस्ते, उद्यान व ड्रेनेजची कामे केली जाणार आहेत. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचे डांबरीकरण या निधीतून केले जाणार आहे. याशिवाय सावेडीत स्मशान भूमीसाठी 50 लाख रुपयांची तरतूद यातून करण्यात अली आहे. नगरमध्ये शहरातील जवळपास सगळे रस्ते डांबरीकरण केले जाणार आहेत.
तेलीखुंट ते चौपाटी कारंजा मोठी ड्रेनेज लाईन टाकली जाणार आहे. निलक्रांती चौक ते कॉलेज रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जुन्या महापालिकेतील ऐतिहासीक काउन्सिल हॉल नूतनीकरणासाठी 50 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. खासदार दिलीप गांधी यांच्या निधीतून शहरात 12 अत्याधुनिक हायमास्ट मंजूर करण्यात आले आहेत. कोणताही हिस्सा न भरता दहा कोटी रुपयांचे अनुदान दिल्याबद्दल छिंदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. खासदार दिलीप गांधी यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाल्याचे ते म्हणाले. दहा कोटी रुपयांचा निधी दत्ता कावरे यांचा प्रभाग सोडला तर सगळ्या भाजप नगरसेवकांच्या प्रभागात वितरीत होणार आहे. त्यामुळे कावरे आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

शहर विाकासासाठी निधी मिळावा, याकरिता शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. दहा कोटीच्या निधीत कुठलाही हिस्सा भरावा लागणार नाही. अशा प्रकारचा निधी महापालिकेला मिळवून देणारा भाजप एकमेव पक्ष आहे.  शहर विकासासाठी आणखी निधी आणणार आहे. त्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहे. खा. गांधी यांच्या नेतृत्तवाखाली पाठपुरावा सुरू आहे.- श्रीपाद छिंदम, उपमहापौर

साडेसहाशे कोटींची मागणी साडेसहाशे कोटींची मागणी नगर शहरातील रस्त्यांची दुरवस्था खासदार दिलीप गांधी यांच्या माध्यमातून राज्यशासनासमोर मांडली आहे. रस्ते विकासासाठी 550 व 100 कोटी रुपयांचे दोन वेगवेगळे प्रस्ताव राज्य शासनाला सादर केले आहेत. त्यातून मॉडेल रस्ते करण्याचा मानस असल्याचे छिंदम यांनी सांगितले.

महापालिकेत युतीच्या सत्तेत सेनेचा महापौर आहे. भाजपचे उपमहापौर छिंदम यांच्याशी त्यांचे फारसे पटत नाही. या निधीतून होणार्‍या कामांचे प्रस्ताव तयार करण्यास अडथळे येतील का? या प्रश्नावर उत्तर देताना छिंदम यांनी तो त्यांचा प्रश्न राहिला असे सांगून आम्ही निधी आणण्याचे काम केले असे उत्तर दिले.

LEAVE A REPLY

*