विभागीय साहित्य संमेलन विशेष : संमेलनाचा समारोप

0

साहित्य गौरव पुरस्काराने गडाख सन्मानित | परदेशी, गोविलकर, दौंड यांना साहित्यरत्न

अहमदनगर : विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला भावनिक, मानसिक आणि सांस्कृतिक ऊर्जा मिळाली.ही ऊर्जा आम्हाला अनेक दिवस पुरेल आणि जगण्याचे नवे बळ देईल असे प्रतिपादन पहिल्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी केले.
मसाप पुणे व सावेडी उपनगर शाखेच्या वतीने आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. उदघाटक जेष्ठ कवी रामदास फुटाणे, जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया,मसाप पुणे चे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, निमंत्रक विनोद कुलकर्णी, सह निमंत्रक राजन लाखे, संयोजक जयंत येलूलकर, मसाप सावेडी शाखेचे उपाध्यक्ष सदानंद भणगे, जेष्ठ साहित्यिक विलास गीते, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या वेळी फुटाणे म्हणाले की, काल आमच्या उदघाटनाच्या भाषणावर काही विरोधी प्रतिक्रिया उमटल्या. काहींना आमचा विचार रुचला नाही. आमचं हिंदुत्व हे सर्व अठरा पगड जातींना एकत्र करणारे व बरोबर घेऊन जाणारे आहे.
गडाख म्हणाले की, फक्त राजकीय व्यक्ती मुळे नाही तर साहित्यिक, लेखक, कवी यांच्यामुळे समाज पुढे जात असतो त्यामुळे समाज पुढे जायचा असेल तर साहित्याचीच कास धरली पाहिजे. सध्या समाज अस्वस्थ आहे, समाजामध्ये शहाणे गोंधळलेल्या स्थितीत आहेत तर मूर्ख त्यांच्या मतावर ठाम आहेत. शहाण्यांना रस्ताही सापडत नाही आणी त्यांची एकजुट ही होत नाही अशा परिस्थितीत साहित्य आणि विचाराने शहाणपण येऊ शकते.
मसाप सावेडी शाखेने साहित्य गौरव पुरस्कार दिल्याबद्दल त्यानी आभार मानले व नगरला पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची संधी द्या अशी मागणी त्यांनी मसाप पुणे च्या पदाधिकार्‍यांकडे केली.
स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, कार्यध्यक्ष मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, निमंत्रक विनोद कुलकर्णी यांचीही भाषणेही झाली. या दिवाळी अंकाचे संपादक प्रा. शशिकांत शिंदे व माईक एकांकिकेचे दिग्दर्शक संदीप दंडवते यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. जयंत येलूलकर यांनी प्रास्ताविक केले.

 

LEAVE A REPLY

*