अहमदनगर : बोल्हेगाव, एमआयडीसीत हॉस्पिटल, मैदान, उद्यानासाठी शिवसेनेचा प्रयत्न

0

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे प्रतिपादन

अहमदनगर : शिवसेनेचा आदर्श छत्रपती शिवाजीमहाराज आहेत. इतर पक्षांचे आदर्श कोण आहेत हे आपणा सर्वांना माहित आहे. छत्रपतींच्या विचाराने आमचा पक्ष समाजाची सेवा करीत आहे. शिवसेनेचा झेंडाही भगवा आहे. जनतेला संरक्षण देण्याचे काम शिवसेना करीत आहे. बोल्हेगाव परिसरात शिवसेनेने मोठी कामे करून विकास साधला आहे. मनपाच्या माध्यमातून बोल्हेगाव, एमआयडीसी परिसरात सुसज्ज हॉस्पिटल, उद्यान व खेळाचे सुसज्ज मैदान होण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे. नगरसेवक डॉ. सागर बोरुडे तरुण असून, समाजामध्ये राहून ते काम करतात. प्रभागातील नागरिकांशी त्यांची चांगली नाळ जुळलेली असून, विकासकामांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास ते साधत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
प्रभाग 4चे नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांच्या प्रयत्नातून बोरुडे फॅब्रिकेशन ते बोल्हेगाव रस्त्यादरम्यान काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ श्री. राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बारस्कर, दरेकर, गोसावी, ढगे, शिंदे, गायकवाड, भडाळे, हिरभगत, आभाळे, बोरुडे, तवले, माने आदींसह नागरिक व महिला उपस्थित होत्या.
महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, शिवसेनेने शहराचे नेहमीच विकासाचे राजकारण केले. या परिसरातील अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न महापौर निधीतून मार्गी लावला. गरज असेल तेथे महापौर निधीच्या माध्यमातून प्रश्न सोडवित आहोत. नागापूरमध्ये पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत जलवाहिनी टाकून झाल्या आहेत. लवकरच निविदा काढून नळ कनेक्शन दिले जातील. त्यानंतर सर्वांना पूर्ण दाबाने व मुबलक पाणी मिळेल. अमृत व भुयारी योजना शासनाने मंजूर केली असून, त्याचे कामही लवकरच सुरू होईल. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात विनाशुल्क प्रसुती व आरोग्य सेवा मनपा करीत आहे. 5 कोटी रुपये खर्चून मनपा देशपांडे रुग्णालयाची नवीन इमारत उभारण्याचे काम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक दरम्यान ड्रेनेज व पावसाच्या पाणी जाण्यास जागा नव्हती. त्यासाठी महापौरांकडे पाठपुरावा करून मोठ्या बंद पाईप गटारीचे काम पूर्ण केले. अनेक दिवसांपासूनच हा प्रलंबित प्रश्न शिवसेनेने मार्गी लावला. मनपात युतीची सत्ता असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सांगितले. यावेळी श्री. कदम, सातपुते, शिंदे, फुलसौंदर यांची भाषणे झाली.

LEAVE A REPLY

*