अहमदनगर : नागरिकांच्या मदतीने नगरसेवक करणार स्वच्छता!

स्वच्छता न करण्याच्या कर्मचार्‍यांच्या पवित्र्याने नगरसेवक नज्जू पहिलवान यांचा निर्णय

0

अहमदनगर : प्रभाग 19 मधील परिसराची साफसफाई करण्यात मनपा कर्मचारी दिरंगाई करतात. कामाच्या वेळेला हजेरी लावून मोबाईल बंद करून कर्मचारी काम न करता गायब होतात. त्यामुळे प्रभागात सगळीकडे अस्वच्छता पसरली आहे. कुठलेही काम पैसे घेतल्याशिवाय न करणार्‍या कर्मचार्‍यांना चांगली सवय लावण्याचे काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला. त्याचा त्यांना त्रास झाला. त्यामुळे त्यांनी प्रभागात स्वच्छता न करण्याचा निर्णय घेतला. एकाजणाबरोबर भांडण झाले. तर त्याचा त्रास सर्व नागरिकांना देणे कितपत योग्य आहे. काम ही करायचे नाही व कोणी जाब विचारला तर त्याला उलट उत्तर देण्याचे प्रकार प्रभागात वाढले होते. आता या सर्वांवर एकच रामबाण उपाय म्हणजे प्रभागात स्वखर्चाने व स्वयंप्रेरणेने स्वच्छता करणे आहे. त्यासाठीच प्रभागात नागरिकांच्या पुढाकाराने स्वच्छता करण्याचे काम सुरू केल्याचे नगरसेवक नज्जू पहिलवान यांनी सांगितले.
प्रभाग 19मध्ये मनपा कर्मचार्‍यांनी स्वच्छता करण्यास नकार दिल्यानंतर अखेर नगरसेवक नज्जू पहिलवान यांनी स्वतः प्रभागाची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. त्यांना प्रभागातील मुजाहिद कुरेशी, सल्लाउद्दीन सुभेदार, समशेर अब्दुल्ला, मुश्ताक कुरेशी, लाला कुरेशी, रशीद कुरेशी, शेख अरबाज, शेख आबीद, हाजी असगर सय्यद आदी नागरिकांनी साथ देत स्वच्छता केली. यावेळी नज्जू पहिलवान बोलत होते.
असगर सय्यद म्हणाले की, दोन दिवसांपासून सफाई कर्मचार्‍यांनी स्वच्छता न करण्याचा निर्णय घेतल्याने प्रभागात मोठी अस्वच्छता झाली. स्थानिक नगरसेवक नज्जू पहिलवान यांनी पुढाकार घेत स्वच्छता करण्याचा उपक्रम हाती घेतला. आम्ही सर्वजण त्यांना या कामी साथ देऊ. साथीचे रोग पसरले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दूर व्हावा, यासाठी स्वयंप्रेरणेने नगरसेवक नज्जू पहिलवान यांनी स्वच्छता करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नागरिकांच्या वतीने धन्यवाद देतो.

प्रभागातील नाल्या तुंबल्याने नागरिकांना मैलामिश्रित पाणी येत होते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी स्वखर्चातून ड्रेनेज बांधून साफसफाई करण्यात आली. मनपा कर्मचार्‍यांनी आमच्या प्रभागातील स्वच्छता करण्याचे बंद केलेले काम सुरू करण्यासाठी मनपातील सत्ताधार्‍यांनी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, पक्षीय राजकारण करीत त्यांनी हे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. यामागील काळात विविध प्रभागांत मारहाणीचे प्रकार घडले. यावेळीच असे काय घडले की सफाई कर्मचार्‍यांनी टोकाची भूमिका घेतली, असे नज्जू पहिलवान म्हणाले.

LEAVE A REPLY

*