अहमदनगर : चांगल्या पुस्तकांचे वाचन करून संस्कारित पिढी निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची : न्यायाधीश प्रकाश माळी

0
अहमदनगर : दररोज खून, दरोडे, बलात्कार यांसारख्या बातम्या वाचून मनाला दुःख होते. समाज हिंसेकडे चालला आहे. याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. येणार्‍या पिढीला सामाजिक मूल्ये देण्याची गरज आहे. त्यामुळे समाजामध्ये शांतता निर्माण होईल. टीव्ही प्रसारमाध्यमांकडून अतिरंजित बातम्या दाखविल्या जातात. त्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहे. टीव्हीमध्ये जे बघायला मिळते, ते संस्कार लहानांवर बिंबतात. त्यामुळे भविष्यात समाजात वाईट घटना घडतात. यासाठी चांगल्या पुस्तकांचे वाचन करून चांगली संस्कारित पिढी निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. एकट्या स्त्री किंवा तरुणीने घराबाहेर पडू नये. अज्ञात ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी केले.
नगर तालुक्यातील कामरगाव येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार व शहर वकील संघाच्या वतीने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिराचे दीपप्रज्ज्वलनाने उद्घाटन न्या. माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश-1 सुवर्णा केवले, विधी सेवाचे सचिव न्या. पद्माकर केस्तीकर, जिल्हा न्या. एस. आर. नावंदर, न्या. केस्तीकर-नलगे, न्या. नावंदर, न्या. मोहिते, विधिज्ञ आर. एस. बेंद्रे, बार असो.चे अध्यक्ष सुरेश ठोकळ, सरपंच सीमा साठे, तुकाराम कातोरे, वसंत ठोकळ, अ‍ॅड. अनुराधा आठरे, सुरेश झरेकर, कृष्णा झावरे, मंगेश सोले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*