अहमदनगर : जेसीबीवाले पावेना! मंदिरांवरील कारवाईसाठी मनपाचा कलेक्टरांकडेे धावा

0

अहमदनगर : वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या धार्मिक स्थळांवर महापालिकेने कारवाई सुरू केलीय. मात्र, ही कारवाई वेगळ्याच कारणाने थंडावली आहे. देवाचा कोप होईल या भीतीने जेसीबीचालकांनी असहकार पुकारला आहे. थेट जिल्ह्याबाहेरील जेसीबीमालकांना मनपाने साकडे घातले आहे. तरीही त्यांनीही नकारघंटा वाजवली. त्यामुळे आता जेसीबी मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मनपाने धावा केलाय.

महापालिकेने दुसर्‍या टप्प्यातील कारवाईमध्ये कल्याण रोड, मनमाड रोड, भिस्तबाग, प्रोफेसर कॉलनी, केडगांव, अकोळनेर रोड, स्टेशन रोड, शिवनेरी चौक, स्वस्तिक चौक, सांगळे गल्ली आदी ठिकाणची 17 मंदिरे पाडण्यात आली. शहराबाहेरील सर्व छोटी धार्मिक स्थळे महापालिकेने पाडली आहे. त्यामुळे शहराबाहेरील मंदिरे पाडतांना मोठा विरोध झाला नाही. मात्र महापालिकेचा कस मध्यवर्ती भागातील अनाधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यासाठी लागणार आहे.
सदर 17 धार्मिक स्थळामध्ये फक्त हिंदू धर्मियांची धार्मिक स्थळे पाडली आहे. इतर धार्मिक स्थळाचे काय असे अनेक आक्षेप हिंदूत्ववादी संघटनांनी महापालिकेवर घेतले होते. त्यामुळे महापालिकेला रोषाला समोरे जावे लागले होते. त्यामुळे शहरातील वातावरण मोर्चा, आंदोलनामुळे ढवळून निघाले होते. त्यामुळे सदर आरोप पुसण्यासाठी महापालिका प्रशासनाने काही दिवसापूर्वी तातडीने 31 धार्मिक स्थळे हटविण्यासाठी सदर यादी राज्यस्तरीय समितीकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आहे. उद्यापर्यंत सदर यादी मंजुरीबाबत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्यामुळे पुढील अनाधिकृत धार्मिक स्थळावर कारवाईला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महापालिकेला जेसीबी मिळविण्यासाठी 17 मंदिरे पाडण्यासाठी भिंगार परिसरातून जेसीबी मिळविला होता. मात्र पुढील कारवाईला मशिन देण्याचे चालकाने नकार दिला आहे. तसेच शहरातील अनेक चालकांनी जेसीबी यंत्राना देणार नाही, असा निर्धार केला आहे. तसेच जिल्हाबाहेरील लोकांकडे महापालिकेने संपर्क केला असला तरी अनेक लोकांनी नकार दिला आहे. उर्वरित धार्मिक स्थळे पाडण्यासाठी जेसीबी मिळविण्यासाठी गृह विभागाला महापालिनकेने पत्र दिले आहे. तसेच जिल्हा दंडाधिकार्‍यांनी परिवहन विभागाला पत्र देऊन जेसीबी अधिग्रहित करण्याचे आदेश करावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाने केली आहे. जोपर्यंत जेसीबी उपलब्ध होणार नाही. तोपर्यंत कारवाई होणार नसल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले.

  • 31 धार्मिक स्थळांच्या यादीवर अडले
    महापालिका प्रशासनाने राज्यस्तरीय समितीकडे 31 अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा प्रस्ताव राज्य समितीकडे पाठविला आहे. या यादीमध्ये इतर धर्माची स्थळे असल्यामुळे शहरात निर्माण झालेले जातीय भेदाचे वातावरण शांत होईल. त्यामुळे जोपर्यंत 31 अनधिकृत स्थळांच्या यादीला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत कारवाई करू नये, असे तोंडी आदेश महापालिका प्रशासनला दिले असल्याचे समजते.
  • मध्यवस्तीत लागणार कसोटी
    शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक मोठी धार्मिक स्थळे आहेत. तर काही धार्मिक स्थळे या कारवाईतून वगळ्यात यावी, यासाठी उपोषण, मोर्चे, रस्ता रोको तसेच विविध संघटनांनी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलने केली. मात्र, प्रशासनाची खरी कसोटी मध्यवर्ती भागातील धार्मिक स्थळे पाडताना लागणार असल्याचे दिसून येते. कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहणार आहे.
  • मूर्ती हलवली…
    अनाधिकृत मंदिराचा समावेश असलेल्या साठे चौक, सिव्हील हॉस्पिटलसह काही ठिकाणच्या नागरिकांनी स्वतःहून मंदिरातील मूर्ती काढून घेतली असून मंदिरे मोकळी केली आहेत. तर काही परिसरातील नागरिकांनी स्वतःहून मंदिरे पाडून टाकली आहेत.

LEAVE A REPLY

*