अहमदनगर : भिस्तबाग महल दरोडेखोरांचा अड्डा

पोलिसांच्या छाप्यात सात अटकेत

0

अहमदनगर : सावेडी उपनगरात चोरी करण्यासाठी दरोडेखोर भिस्तबाग महालात जमा होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. बुधवारी रात्री एलसीबी पोलिसांनी याच महलातून सात दरोडेखोरांना पकडले. पकडलेल्या दरोडेखोरांनी रिपाइचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

सागर गोरख मांजरे (मातापूर, श्रीरामपूर), शंकर संजय गायकवाड (उक्कलगाव, श्रीरामपूर), योगेश सावळेराम मांजरे (मातापूर, श्रीरामपूर), अनिल सुरेश गायकवाड (रा. मातापूर, श्रीरामपूर),सतीश गोरख गायकवाड (रा. उक्कलगाव, श्रीरामपूर), करण रामदास गायकवाड (रा. पानेगाव, ता.नेवासा) आणि नाना बाळू गुंजाळ (रा. उक्कलगाव, श्रीरामपूर) असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
सलग दुसर्‍या दिवशी एलसीबी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांची टोळी पकडली. मंगळवारी पांढरीपुल घाटात टोळी पकल्यानंतर भिस्तबाग महलात बुधवारी दुसरी टोळी पकडली. सावेडीत चोरी करण्याच्या उद्देशाने दरोडेखोर भिस्तबाग महलात जमा झाल्याची माहिती खबर्‍याने एलसीबीचे पीआय पवार यांना दिली. एसपी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांनी एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, शरद गोर्डे, हवालदार योगेश गोसावी, दत्तात्रय हिंगडे, उमेश खेडकर, रावसाहेब हुसळे, संदीप घोडके, भागीनाथ पंचमुख, शंकर चौधरी, सुनील अडबल, दिलीप शिंदे, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांची टीम पवार यांनी महलाकडे

पाठविली. पोलीस पोहचले त्यावेळी दरोडेखोर तोंडाला काळे फडके बांधून दरोडा टाकण्यासाठी निघण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी अचानक झडप घालत त्यांना पकडले. अचानक झालेल्या छापेमारीमुळे दरोडेखोरांनी पळ काढला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. लोखंडी कटावणी, सुरा, खिडकीची गज कापण्यासाठीचा पान्हा, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी पक्कड, मिरची पूड, दोन मोटारसायकली, 5 मोबाईल असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांनी हस्तगत केलेली एक मोटारसायकल ही सागर मांजरे व शंकर गायकवाड या दोघांनी सावेडीतून चोरली होती. तिचा वापर ते दरोडा टाकण्यासाठी करत असल्याची कबुली दिली. बिशप लॉईड कॉलनीत घरफोडी केल्याचे आरोपींनी सांगितल्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले. रिपाइचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या सावेडीतील घरात घरफोडी केल्याचे दरोडेखोरांनी कबुल केल्याचे पवार यांनी ‘नगर टाइम्स’शी बोलताना सांगितले. सागर मांजरे, करण गायकवाड,शंकर गायकवाड, नाना गुंजाळ हे तोफखाना व श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात फरार होते. योगेश मांजरे विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यात तो फरार आहे.

 

LEAVE A REPLY

*