अहमदनगर : मंत्र्यांकडून सिव्हीलचे पोस्टमार्टम

डेप्युटी डायरेक्टरनेही सिव्हील सर्जनला झापले

0

अहमदनगर : आरोग्यमंत्री दीपक केसरकर यांनी नगरच्या सिव्हील हॉस्पिटलची अचानक पाहणी केली. त्या वेळी असुविधा आढळल्याने त्यांनी अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळीच आरोग्य उपसंचालक विजय कंधेवाढ यांनी सिव्हील हॉस्पिटलची पहाणी करून ‘पोस्टमार्टम’ केले. आरोग्य मंत्र्यांकडे रुग्णांनी केलेल्या तक्रारीचा जाब कंधेवाढ यांनी सिव्हीलच्या अधिकार्‍यांना विचारला. ठिकठिकाणी असलेले कचर्‍याचे ढिगारे व अंतर्गत अस्वच्छता पाहून कंधेवाढ यांनी सिव्हीलची खरडपट्टी केली.

आरोग्यमंत्री केसरकर हे खासगी दौर्‍यानिमित्त नगर येथे आले होते. सोमवारी रात्री अचानक त्यांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये पहाणी केली. पोलीस, सिव्हील हॉस्पिटल व जिल्हा माहिती कार्यालयांना कोणतीच खबर लागू न देता केसरकर अचानक सिव्हीलच्या आवारात आले. स्वीय सहाय्यकाला सोबत घेत त्यांनी ओपीडी व इतर कक्षाची पहाणी केली. अ‍ॅडमीट वार्डात जाऊन त्यांनी थेट रुग्णांशी संवाद साधला. औषधोपचार वेळेवर होतात की नाही याची विचारणा त्यांनी रुग्णांकडे केली. काही रुग्णांनी त्यांच्याकडे तक्रारीही केल्या. सिव्हील सर्जन डॉ. पांडूरंग बरूटे हे मात्र तेथे उपस्थित नव्हते. काही नर्स व डॉक्टर तेथे होते. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे काही रुग्णांनी सांगितले. त्यानंतर केसरकर यांनी हॉटेलचालकाकडे रुग्णालयात पदार्थ विक्रीचा परवाना आहे की नाही याची विचारणा केली. ही झाडाझाडती घेतल्यानंतर ते तेथून निघून गेले.

आज सकाळीच आरोग्य उपसंचालक कंधेवाढ नगरला पोहचले. रुग्णालयात असलेले कचर्‍याचे ढिगारे त्यांनाही दिसले. त्यांनी सिव्हील सर्जन व प्रमुख डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांचा समाचार घेत सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • ज्याचा वशीला…
    सिव्हील हॉस्पिटलमध्ये ज्याचा वशिला त्यालाच सुविधा मिळतात. सामान्य रुग्णांना सुविधा मिळत नाही अशा तक्रारी नेहमीच होत असतात. अ‍ॅडमीट वार्डातील अस्वच्छता पाहून रुग्णाच्या भेटीही नातेवाईक टाळतात हे वास्तव आहे. आर्थिक परिस्थितीमुळे खासगी दवाखाने परवडत नाही म्हणून रुग्ण सिव्हील हॉस्पिटलमध्ये येतात. मात्र त्यांना येथेही असुविधेचा सामना करावा लागतो.

LEAVE A REPLY

*