Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

दोन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार

Share

विक्रम आडसूळ आणि रविंद्र भापकर यांचा समावेश : 23 डिसेंबरला दिल्लीत वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या मानव संसाधन व विकास मंत्रालय व शिक्षण विभागच्यावतीने देण्यात येणारा आयसीटी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार यावर्षी कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगरवस्ती येथील शिक्षक विक्रम अडसूळ आणि जामखेड तालुक्यातील सरदवाडी येथील उपाध्यापक रवींद्र भापकर यांना जाहीर झाला आहे. देशातील 43 व राज्यातील 3 शिक्षकांना हा सन्मान दिला जाणार असून यात नगर जिल्ह्यातील दोघे तर बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा समावेश आहे.

या पुरस्काराचे वितरण 23 डिसेंबरला डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल भवन, नवी दिल्ली येथे होणार आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरील असल्यामुळे याला विशेष असे महत्त्व आहे. शिक्षक अडसूळ यांच्या या पुरस्काराच्या रूपाने पुन्हा एकदा नगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मागील वर्षी अडसूळ यांना राज्यातून एकमेव राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने भारत सरकारने गौरवले होते. अडसूळ हे कर्जत तालुक्यात दुर्गम भागातील झेडपीच्या शाळेत ज्ञानदानाचे कार्य करतात. त्यांनी आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांना संपूर्ण भारतभर उपक्रमशील, प्रयोगशील व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ओळखले जाते. सुरूवातीला अडसूळ यांनी छोट्या-छोट्या लघुपटांची निर्मिती केली. अध्यापन करताना ते फेसबुक, यु-ट्यूबवरील अभ्यासोपयोगी व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखवतात. त्यांच्या शाळेचे व स्वतःचे यु-ट्यूब चॅनेलही आहे.

व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे परदेशातील शाळांशी ते विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणतात. विशेष म्हणजे राज्यातील विद्यार्थी व शिक्षक प्रगल्भीकरणासाठी तसेच तंत्रज्ञानात शिक्षणाला गती देण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र हा समूह त्यांनी तयार केला आहे. यात 10,000 शिक्षक आहेत. राज्याच्या अभ्यासक्रम समितीचा सदस्य म्हणून काम करताना सहावी व सातवीच्या पाठयपुस्तकात क्यूआर कोडचा वापर करण्यासाठी व कंटेंट निवडण्यासाठी अडसूळ यांनी काम केले आहे. भारत सरकारच्या मंत्रालय देशातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या प्रगलभीकरणासाठी तयार केलेल्या प्रशिक्षण मोडुलमध्येही अडसूळ यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा कार्याचा उल्लेख प्रशिक्षण मोडुलमध्ये केला आहे.

दुसरे पुरस्कार विजेते शिक्षक रविंद्र भापकर हे जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत उपाध्यापक पदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण सोपे व्हावे, म्हणून त्यांनी विविध ‘ई’ सहित्याची निर्मिती केली आहे. त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी स्वतः शैक्षणिक वेबसाइट तयार केली आहे. या वेबच्या माध्यमातून शिक्षक कथा, कविता, पाठ्यपुस्तके, ऑनलाइन टेस्ट, ऑफलाइन टेस्ट, विविध मोफत डाउनलोड करू शकतो. राज्यातील लाखो शिक्षक व विद्यार्थी या वेबचा नियमित वापर करतात. आजपर्यंत त्यांच्या वेबला 30 लाख पेक्षा जास्त भेटी झाल्या असून इतक्या मोठ्या प्रमाणात वापर होत असलेली ही राज्यातील नंबर एकची शैक्षणिक वेब आहे.

भापकर यांच्या शाळेत 45 विद्यार्थी असून शाळेचे दोनही वर्ग डिजिटल आहेत. दोनही वर्गात इंटरएक्टिव बोर्ड बसवले असून विद्यार्थी अत्याधुनिक शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे त्यांना इंटरएक्टिव बोर्डसाठी अमेरिकेतून मदत मिळाली आहे. राज्य तसेच देश पातळीवर तंत्रस्नेही म्हणून मार्गदर्शन करतात. त्यांनी आतापर्यत भोपाळ (मध्यप्रदेश) अजमेर (राजस्थान), दिल्ली या ठिकाणी तंत्रज्ञान कार्यशाळेत सहभाग नोंदविलेला आहे. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी 100 ठिकाणी तंत्रस्नेही कार्यशाळा घेवून शिक्षकांना तंत्रज्ञानाची गोडी लावली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!