प्रशांत-रोहित यांनी काही शिजवलं?

0

गुप्त बैठकीची चर्चा । अधिकृत उमेदवारी जाहीर होत नसल्याने वाढला सस्पेन्स

अहमदनगर (प्रतिनिधी)- पॉवरबाज बारामतीकरांची नॅशनालिस्ट कन्फूज पार्टी अर्थात राष्ट्रवादीचा नगरच्या उमेदवारीबाबतचा घोळ कधी मिटणार आणि आ.अरूणकाका जगताप यांची संभाव्य उमेदवारी कधी जाहीर होणार, या प्रश्‍नाने आता पक्षातील कार्यकर्तेच गोंधळू लागले आहेत. या घडामोडी घडत असताना पवारांचे नातू आणि भविष्यातील नगर राष्ट्रवादीचे ‘नेते’ रोहित राजेंद्र पवार यांनी व्यस्त नगर दौर्‍यात वेळ काढून प्रशांत गडाख यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत दोघांनी राजकीय विचारांची देवाण-घेवाण केली की काही शिजवलं, याबद्दल कुजबुज सुरू आहे.

डॉ.सुजय विखे प्रकरणानंतर नगरचे राजकारण राज्याच्या केंद्रस्थानी आले आहे. येथील पवार-विखे वादाचे पडघम रोज आघाडीतील बिघाडी जगजाहीर करत आहे. नगरच्या उमेदवारीसाठी आ.अरूणकाका जगताप यांचे नाव अंतिम केल्याचे पक्षातील सूत्र छातीठोकपणे सांगतात. दोन दिवसांपासून खुद्द आ.अरूणकाकांचा वावरही तसाच आहे. राष्ट्रवादीने दोन उमेदवारी याद्या अधिकृतपणे जाहीर केल्या. त्यात मात्र आ.जगताप यांचे नाव न झळकल्याने कार्यकर्त्यांचाच गोंधळ वाढला आहे. ही चालढकल का, याचे कोडे त्यांना पडले आहे.

शुक्रवारी छावणी, शेतकरी आणि लढा अशा कारणांसाठी शरद पवारांचे आवडते नातू पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार नगरमध्ये होते. त्यांनी आपल्या दौर्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाचे सोपस्कार आटोपल्यानंतर आ.जगताप यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या विजयाचा दावाही केला. मात्र त्यानंतर काहीच वेळाने प्रदेश राष्ट्रवादीचे जाहीर केलेल्या यादीतून आ.जगताप यांचे नाव मिसींग होते.

याच काळात रोहित यांनी आपल्यासोबत असलेल्या समर्थकांना टाळून नगरमध्ये एक ‘खासगी भेट’ घेतली. पवार अचानक एकटे कोणाच्या भेटीला गेले, याची सोबतच्या कार्यकर्त्यांनाही उत्सुकता आहे. त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीत त्यांनी नगर दक्षिण मतदारसंघातील राजकीय स्थितीवर चर्चा केली, असा कार्यकर्त्यांचा कयास आहे. मात्र त्याशिवाय काही अधिक शिजल तर नाही, या प्रश्‍नानेही त्यांच्या मनात घर केले आहे.

प्रशांत यांनी आधीच आपण लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेत आहोत, हे जाहीर केले आहे. मात्र त्यानंतरही थोरल्या पवारांनी ज्येष्ठ गडाखांशी संपर्क साधल्यामुळे आणि वारंवार 1991चा संदर्भ दिला जात असल्याने कार्यकर्त्यांच्या मनातही खल सुरू आहे. रोहित यांच्याकडे थोरल्या पवारांनी राज्यातील राजकीय कुटुंबांशी संपर्क आणि बोलणी, अशी जबाबदारी सोपविल्याचे म्हटले जाते. त्यामुळे गडाखांची त्यांनी भेट घेतली असेल तर नक्की कोणती बोलणी केली असेल, यावरून चर्चा सुरू होती.

रोहितच का नको?
दरम्यान, पक्ष नगर दक्षिणेच्या रिंगणात तोडीसतोड उमेदवार उतरवणार, असा दावा राष्ट्रवादीचे नेते वारंवार करत आहेत. आणि चर्चेतील नाव आ.अरूणकाकांचे आहे. त्यामुळे ‘तोडीसतोड’ या शब्दाचा अर्थ राष्ट्रवादीच्या शब्दकोशात काही वेगळाच आहे का, असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. काहींकडून ‘पॉलिटिकल फिक्सींग’चीही अफवा उडवून देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिकच गोंधळले आहे. या स्थितीत रोहित पवार पर्याय का ठरू शकत नाही, असा प्रश्‍न पक्षातील काही निष्ठावंत आता एकमेकांना विचारू लागले आहे. पक्षाच्या उमेदवारीवरून जबर किरकिरी झाली आहे. आ.जगतापांची उमेदवारी रेटण्यात जे ‘हात’ सरसावले आहेत, त्यांचे ‘कौशल्य’ पक्षातील अनेक चांगलेच जाणून आहेत. त्यामुळे खरंच राष्ट्रवादी मैदानात तुल्यबळ लढत देईल का, याबाबत काही कार्यकर्ते खासगीत प्रश्‍न उपस्थित करू लागले आहे. म्हणूनच त्यांना रोहित या नावाचे आकर्षण वाटू लागले आहे. मात्र थोरले पवार आपल्या घरातून उमेदवारांची संख्या वाढविण्याच्या विरोधात आहेत, याकडे काही जाणकार लक्ष वेधतात. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात असले तरी ही शक्यता यावेळी तरी धूसरच असल्याचे मत एकाने नोंदविले.

LEAVE A REPLY

*