खा.गांधी व समर्थकांना अद्यापही आशा

0
डॉ. विखे यांच्यापासून जाणीवपूर्वक चार हात दूर

अहमदनगर (प्रतिनिधी) – सध्यातरी डॉ. सुजय विखे यांच्यापासून दूर असलेले खा. दिलीप गांधी व त्यांच्या समर्थकांना अद्यापही आशेचे किरण दिसत आहेत. राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागतात, असे सूचक वक्तव्य त्यांनी ‘सार्वमत’शी बोलताना केले.

गेल्या काही वर्षांपासून नगरच्या भाजपमध्ये सुसाट वेगाने निघालेल्या खा. गांधी यांच्या गाडीला डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर करकचून ब्रेक लागला. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत खा. गांधी यांची उमेदवारी कापण्यासाठी जिल्ह्यातील गांधी विरोधी गटाने देव पाण्यात ठेवले होते. मात्र खा. गांधी यांनी त्यांना ओव्हरटेक करत उमेदवारी पदरात पाडून घेतली.

मागील निवडणुकीत भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी शेवटपर्यंत जोर लावला. मात्र त्यांच्या नशिबी अपयश आले. खा. गांधी यांना उमेदवारी जाहीर होताच अ‍ॅड. ढाकणे यांनी भाजपला जय श्रीराम करत राष्ट्रवादीला जवळ केले. यावेळी देखील ते राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत.

खा. गांधी व त्यांच्या समर्थकांना अजूनही उमेदवारीची शंभर टक्के खात्री आहे. यावेळीही भाजपचेच जिल्हाध्यक्ष असलेले भानुदास बेरड उमेदवारीच्या स्पर्धेत होते. मात्र त्यांना ओव्हरटेक करू, याची खात्री खा. गांधी यांना होती. अचानक वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली आणि गेली दोन वर्षे भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडणारे डॉ. सुजय विखे थेट भाजपमध्ये आले. त्यांच्या प्रवेश सोहळ्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. विखे यांची नगर लोकसभा मतदारसंघातून अप्रत्यक्षपणे उमेदवारीही जाहीर केली. तेव्हापासून खा. गांधी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

तीन वेळच्या खासदारकीच्या माध्यमातून दिल्लीत बसविलेला जम आणि वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध या जोरावर खा. गांधी यांचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत. शिवाय जैन समाजाचा दबाव राहील, याचीही काळजी त्यांनी घेतली आहे.
डॉ. सुजय विखे यांच्यापासून चार हात दूर राहण्याचे त्यामुळेच त्यांनी ठरविले आहे. काल विखे नगरमध्ये आले असतानाही त्यांची भेट टाळण्यात ते यशस्वी ठरले. विशेष म्हणजे त्यांनी डॉ. विखे यांच्या प्रवेशावर अद्याप टीका केलेली नाही.

योग्य तो युक्तिवाद करू – लोकसभा उमेदवारीबाबत खा. दिलीप गांधी यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले, राजकारणात शेवटपर्यंत काहीही निश्‍चित नसते. आपणही प्रयत्न सोडायचे नसतात. अद्याप काहीच घडलेले नाही. उमेदवारीचा निर्णय घेणारे वेगळे लोक आहेत. त्यावेळी त्यांच्यापुढे योग्य तो युक्तिवाद करण्यात येईल, असे सांगत आपण अजूनही स्पर्धेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

LEAVE A REPLY

*