रोख- ठोक मुलाखत : दीप चव्हाण, शहर काँग्रेसवर विखे-थोरातांचा ‘डोळा’

0

सत्यजीत तांबेच अहमदनगरचा चेहरा : दीप चव्हाण यांची कबुली

अहमदनगर (प्रतिनिधी)– सव्वाशे वर्षाचा विचार आणि पंरपरा असलेल्या काँग्रेस पक्षात व्यक्तीपेक्षा संघटनेला महत्व आहे. शहराच्या राजकारणात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असले तरी विधानसभा निवडणूक आणि पक्ष संघटनेत युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजीत तांबे हेच शहर काँग्रेसचा चेहरा असल्याची कबुली नगर शहर काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष नगरसेवक दीप चव्हाण यांनी ‘नगर टाइम्स’शी बोलताना दिली.

शहराच्या राजकारणात कोणासोबत साटेलोटे नूसन भाजपा हाच नंबरवन शत्रू आहे. महापालिकेच्या राजकारणात चुकीच्या गोष्टीवर काँग्रेस आवाज उठविण्यासंदर्भात आघाडीवर असल्याचे सांगत शहर काँग्रेसवर विखे, थोरात लक्ष ठेवून असल्याचे चव्हाण यांनी मान्य केले.

 • विखे-थोरात गटबाजीत नगर शहरात काँग्रेसची वाताहत झाली का?
  – शहराच्या राजकारणात काँग्रेस पक्षाची कोणतीही वाताहत झालेली नाही. शहरात काँग्रेस आहे तशीच आहे. पक्षाने शहरातून ब्रिजलाल सारडा, सुवालाल गुंदेचा, सत्यजित तांबे यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली. हे तिघेही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले. पक्षाला 25 ते 30 हजार मते मिळाली. राष्ट्रवादीच्या निर्मिती पूर्वी काँग्रेस हा एकच पक्ष होता. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र असून दोघांच्या मतांची बेरीज केल्यास शहरावर आजही आघाडीचे वर्चस्व राहिल अशी परिस्थिती आहे.
 • नगर शहरात काँग्रेसचे नेतृत्व नेमके कोणाकडे आहे ?
  – वास्तवत: शहराच्या पक्षीय राजकारणावर विखे आणि थोरात यांची पकड आहे. पण काँग्रेस पक्षात परंपरेनुसार स्थानिक आमदार अथवा आमदारकी लढविलेल्या व्यक्तीवर त्या मतदारसंघाची जबाबदारी असते. त्यामुळे नगर शहराची जबाबदारी सध्या सत्यजीत तांबे यांच्याच खांद्यावर आहे. याशिवाय विखे आणि थोरात शहराच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत.
 • महापालिकेत काँग्रेस पक्षाचे अस्तित्व काय?
  – महापालिकेत काँग्रेस पूर्वीप्रमाणे आहे. संदीप कोतकर यांच्या नगरसेवक पदाबाबत कायद्याच्या दृष्टीकोनातून तांत्रिक प्रश्‍न निर्माण झालेला आहे. बाकी आमचे 10 नगरसेवक जागेवर आहोत. 2008 ते 2013 या काळात पक्षाचे 9 नगरसेवक होते, आता 11 आहेत. त्यांना मिळालेली मते आणि विधानसभा निवडणुकीत तांबे यांना मिळालेली मते समान आहेत. उलट माझ्याकडे शहरजिल्हाध्यक्षपदाचा पदभार असतांना शहरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झालेली आहे. बाकी नगर शहरातील राजकारण सर्वांना ज्ञात आहे.
 • शहराचे राजकारण,आंदोलनात काँग्रेस आग्रभागी का नाही?
  – महापालिका असो अथवा शहरातील समस्या. प्रत्येक प्रश्‍नावर सर्वाधिक आवाज काँग्रेस पक्षाने उठविला आहे. शहरजिल्हाध्यक्ष नात्याने मी देखील यात मागे नाही.
 • आगामी मनपा निवडणुकीत काँग्रेसची रणनिती काय?
  -सव्वाशे वर्षाची परंपरा असलेला पक्ष काही नवीन नाही. मनपा निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरून सुचना पाठवल्यानंतर त्यावर प्रदेश पातळीवरून निर्णय घेण्यात येईल. नवीन कार्यकर्ते पक्षाला जोडण्याची कार्यवाही सुरू आहे.
 • शहरात पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे का?
  – शहरातील कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली नाही. काँग्रेसमध्ये गट-तट नाहीत. अखिल भारतीय काँग्रेसच्या निर्देशानुसार नोटबंदी, गोहत्या, दलित अत्याचार विरोधात शहरात सर्वाधिक आंदोलने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहेत. प्रदेश समितीच्या आदेशानंतर शहर काँग्रेस आंदोलन करत असते.
 • डॉ. सुजय विखे, सत्यजित तांबे दोघांपैंकी कोणाचे नेतृत्व स्वीकाराल?
  – शहरात सध्या तांबे यांचे नेतृत्व आहे. मात्र, काँग्रेसला विचारांची आणि नेत्यांची परंपरा आहे. यामुळे पक्षश्रेष्ठी ठरवतील त्यांचे नेतृत्व आम्ही शहरात स्वीकारू. काँग्रेस पक्षात व्यक्तीला नव्हे तर संघटनेला महत्व आहे.
 • महापौर पदाच्या निवडणुकीत नगरसेवकांत फाटाफुट कशामुळे झाली?
  – पक्षातून अद्याप कोणीही बाहेर गेलेले नाही. महापालिका निवडणुकीत पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आलेले आहेत. यात संदीप कोतकर यांची तांत्रिक अडचण सोडल्यास पक्षाचे 10 नगरसेवक जागेवर आहेत. अधिकृतपणे कोणीही पक्ष सोडलेला नाही.
 • काँग्रेसचा खरा विरोधक कोण?
  – शहराच्या राजकारणात काँग्रेसचा मुख्य विरोधक भाजप आहे. काँग्रेसने नेहमी जातीय राजकारण बाजूला सारून सर्वांना सोबत घेवून विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यातही राहिल. यामुळे जातीयवादी भाजपच आमचा विरोधक आहे.
 • आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याची वेळ आल्यास काय करणार?
  – गेल्या विधानसभा निवडणुकीत नगर शहराची जागा काँग्रसेने लढवलेली आहे. पक्षाचा विस्तार करण्याची प्रत्येकाची धडपड असते. तीच भूमिका पक्षाची आहे. आघाडीचा निर्णय प्रदेशपातळीवर होईल. दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित निर्णय घेतील. शहरात आमचे काम सुरू आहे. निवडणूक लढण्यासाठी कधीही सज्ज आहे.

LEAVE A REPLY

*