कावेरी विसावली आई-वडिलांच्या कुशीत!

0
लोणी काळभोर येथे अल्पवयीन मुलगी कावेरीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देताना पो. नि. क्रांतीकुमार पाटील. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले.

निघाली होती राहात्यातील लोणीला, पोहचली पुण्याच्या लोणीला, पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलगी सुखरूप

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी गावाला निघालेली एक अल्पवयीन मुलगी चुकून पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ पोहचली. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का परिसरात या अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर पोलिसांच्या कार्य तत्परतेमुळे आई-वडिलांचे मायेचे छत्र पुन्हा मिळाले आहे.पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

कावेरी राजू पवार (वय-13,रा. लोणी, ता. राहाता जि. नगर) ही अल्पवयीन मुलगी तिच्याच शाळेतील कार्यक्रम पाहण्यासाठी गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर घऱी निघाली. रस्त्यात तिने एका वाहनाला हात करून लोणीत सोडण्याची विनंती केली. मात्र संबंधित वाहनचालकाने तिला अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी गावात सोडण्याऐवजी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ आणुन सोडले होते.

नवीन गाव, नवीन परिसर त्यामुळे कावेरी प्रचंड घाबरली व घाबरून रडू लागली. यावेळी रेल्वे स्थानकाजवळील मालधक्का परिसरात मनोज कल्याण काळभोर यांनी तिला पहिले. मनोज काळभोर यांनी प्रथम तिला जेवू घातले. त्यानंतर तिची विचारपूस करून माहिती घेतली. कावेरी ही चुकून नगर जिल्ह्यातील लोणीच्या ऐवजी पुणे जिल्हातील लोणी पोहचल्याची मनोज काळभोर यांना खात्री पटली. यावर मनोज काळभोर यांनी ही बाब तात़डीने लोणी काळभोर पोलिसांना कळवली.

दरम्यान, लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, ठाणे अंमलदार संतोष शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी कावेरीला पोलिस ठाण्यात तिच्याकडे पुन्हा एकदा घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करुन तिच्याकडुन वडिलांचा मोबाईल क्रमांक घेतला. तसेच मोबाईलवर फोन करून तिच्या वडिलांना कावेरी बद्दल माहिती दिली. यावर कावेरीच्या नातेवाईकांनी शनिवारी सकाळी पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांच्याकडेही अधिक चौकशी करुन कावेरीला आई-वडिलांच्या ताब्यात दिले.

मालधक्क्यात सुपरवायझर असणारे मनोज काळभोर व पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या समयसुचकतेमुळे एका अल्पवयीन मुलीला आई-वडिलांचे मायेचे छत्र पुन्हा मिळाले. या कामगिरीबद्दल क्रांतीकुमार पाटील व मनोज काळभोर यांचा नातेवाईकांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*