Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

टोलवाटोलवीत अडकली ‘सहल’

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- यंदा शिक्षणाधिकार्‍यांची परवानगी न घेता शैक्षणिक सहली काढल्यास सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक-प्राचार्यांवर कडक कारवाई करण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढल्याने शैक्षणिक सहलींकडे शाळांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे. या फतव्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राचार्य हतबल तर विद्यार्थ्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र शाळांमधून दिसून येत आहे. यासंदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक यांनी शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता टोलवाटोलवी सुरू आहे.

प्राथमिक माध्यमिक शाळा-महाविद्यालयांनी नियमानुसार सहलींचे आयोजन करावे. सहलीत अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक-प्राचार्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना शाळा-कॉलेजांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, यंदा निसर्गरम्य, पर्यटन, मनोरंजनात्मक व अपघातस्थळी यापुढे शैक्षणिक सहली काढता येणार नसल्याने या वर्षात किती शाळा-कॉलेजांमधून सहली निघतील, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. शाळा, ज्युनिअर कॉलेजांकडून दरवर्षी शैक्षणिक सहली काढण्यात येतात.गेल्या एक-दोन वर्षांपूर्वी सागर किनारी भागात व इतर काही निसर्गरम्य, पर्यटन, मनोरंजनात्मकस्थळी सहली काढण्यात आल्यानंतर त्याठिकाणी अपघात घडले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राणदेखील गमवावे लागले होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने सहलींसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे शाळा-कॉलेजने नियमानुसारच शैक्षणिक सहली काढाव्यात, अशी सूचना देण्यात आली आहे. स्थानिक शिक्षणाधिकार्‍यांकडून परवानगी न घेता सहली काढल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

यापूर्वी शैक्षणिक सहलीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याच्या घटना घडल्यानंतर शाळा प्रशासन, पालक, शिक्षण विभाग यांच्यात आपापसात वादही झाल्याचे प्रकार घडले आहेत. शिक्षण आयुक्तालय व शिक्षण संचालनालयाकडून सहलीला परवानगी दिलेल्या स्थानिक शिक्षण विभागाच्या कार्यालयांना दंडात्मक कारवाईसही सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर सरकारच्या शिक्षण विभागाकडून शैक्षणिक सहली काढण्याबाबत नियमावली तयार करण्यात आली होती. आता चालू शैक्षणिक वर्षात सहली काढताना सरकारच्या शाळा व ज्युनिअर कॉलेजांना नियमावलीची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक ज्ञानात व विकासात भर पडेल. अशा शैक्षणिक, अभ्यासात्मक, संशोधनात्मक ठिकाणीच सहली काढाव्या लागणार आहेत. या सहली काढण्यापूर्वी त्याचे प्रस्ताव शिक्षणाधिकार्‍यांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणार्‍या प्रस्तावांना मान्यता मिळणार आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हे आदेश आहेत. सहलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांनाच जबाबदार धरण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शैक्षणिक सहल काढण्यास परवानगी नाकराण्यात येत असून काही ठिकाणी गटशिक्षणाधिकारी हे वरिष्ठ कार्यालयाकडे हा विषय टोलावत आहेत.

राज्य सरकारच्या शिक्षणाच्या उपक्रमात शैक्षणिक सहल हा उपक्रम निश्‍चित करून दिलेला आहे. धार्मिक, ऐतिहासीक धार्मिक ठिकाणी सहल काढण्यासाठी शिक्षण विभाग परवानगी नाकारत असले तर ते चुकीचे आहे. शैक्षणिक सहलीला परवानगी नाकारल्यास विद्यार्थी आनंदाला मुकणार आहेत. शिक्षण विभागाने सहलीच्या निर्णयासंदर्भात टोलवा-टोलवी करू नयेत. नियमांची अंमलबजावणी करणार्‍या शाळांना शैक्षणिक सहलीची परवानगी मिळावी.
– बापूसाहेब तांबे, मुख्याध्यापक, वाकोडी शाळा
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!