Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरचे सहाही आमदार शरद पवारांसोबतच !

Share

मुंबई येथील बैठकीत हजेरी : जिल्हाध्यक्ष फाळके यांची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्याच्या राजकारणात भूकंप घडला असतानाही नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्वच म्हणजेच सहाही आमदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे. हे सर्वच आमदार मुंबईमधील वायबीसी सेंटरमध्ये उपस्थित असल्याचे फाळके यांनी ‘सार्वमत’शी बोलताना सांगितले.

शनिवारी सकाळी अचानक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. या निर्णयाची कल्पना मतदारांना जशी कल्पना नव्हती तशी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील अनेक आमदारांना देखील नव्हती. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. यापैकी सर्व आमदार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असल्याचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी सांगितले.

राज्यातील सत्तेच्या शपथविधी कार्यक्रमाचे हादरे जिल्ह्यातील राष्ट्रवादीलाही बसले. अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मी तातडीने मुंबईकडे निघालो असल्याचे सकाळी स्पष्ट केले. तर कोपरगावचे आशुतोष काळे आणि राहुरीचे प्राजक्त तनपुरे हे देखील मुंबईत दाखल झाले असून कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे मुंबईत असल्याने त्यांचीशी संपर्क झाला नाही.

पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नेमके काय झाले हे मला अधिकृत पक्षाकडून सांगण्यात आलेले नाही. मला माध्यमातून माहिती मिळाली असून मी मुंबईकडे निघालो आहे. मी नवीन आमदार असल्याने या परिस्थितीबाबत भाष्य करू शकत नाही. मात्र, राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहणार असल्याचे सांगत त्यांनी पक्षासोबत राहण्याचे संकेत दिले आहेत.

शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करतो. त्यांनी राज्याची राजकीय अस्थिरता संपवली. राज्यपालांनी लोकशाहीतील सर्व संकेत व परंपरा यांचे पालन केले आहे. महिनाभर सरकार स्थापण्यासंदर्भात पोर खेळ सुरू होता. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे, आशा परिस्थितीत युतीस जनादेश असताना सुध्दा शिवसेनेची भूमिका अनाकलनीय होती. म्हणून स्थिर सरकार निर्माण करण्याचे शिवधनुष्य फडणवीस यांनी स्वीकारले आहे व राज्याला स्थिर सरकार देण्याचा देण्याचा संकल्प केला आहे.
– भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष, भाजप.

राज्यात सरकार स्थापनेवरून सुरू असणारा खेळ हा घटनेला धरून आहे की हा घटनेची पायमल्ली करणारा आहे, हे राज्यातील जनता पाहत आहे. सरकार स्थापन होत नसल्याने राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. अशा परिस्थिती राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यापूर्वी 145 आमदारांचा पाठिंबा आहे की नाही, हे तपासणे आवश्यक होते. मात्र, तसे न होता सत्तेचा गैरवापर करून घाईघाईने सकाळी सत्ता स्थापनेचा शपथविधी कशासाठी पारपडला. यावरून भाजपचा हेतू स्पष्ट होत आहे.
– शशिकांत गाडे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!