Type to search

Featured सार्वमत

नगरच्या आमदारकीवर भाजपचा दावा

Share

महापौरांच्या दालनातील बैठकीत मैत्रीपूर्णची तयारी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेतील भाजप आणि शिवसेनेतील द्वंद्व कायम चिथावत ठेवण्याचा भाजपमधील एका गटाचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याच्या जोरावर नगरची विधानसभेची जागा भाजपला मिळविण्याचा मुद्दा काढण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर प्रसंगी मैत्रीपूर्ण लढत करण्याचीही तयारी दर्शविण्यात आली आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले. त्यावेळी त्यांनी एकमेकांवर जहरी टीका केली. निवडणुकीनंतर सर्वाधिक जागा जिंकून शिवसेना मोठा पक्ष ठरला. मात्र शिवसेनेला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले. राष्ट्रवादीचा बिनशर्त पाठिंबा मिळाल्यामुळे तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या भाजपला महापालिकेत महापौर, उपमहापौर यासारखी महत्त्वाची पदे मिळून सत्ता हस्तगत करता आली. मात्र नंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात शिवसेना-भाजप युती करण्याचा निर्णय झाल्याने त्याचे परिणाम येथेही होतील, असे बोलले जात होते.

भाजपमधील माजी खासदार दिलीप गांधी यांना मानणारा गट आणि शिवसेना यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत गांधी यांची उमेदवारी कापल्याचा सर्वाधिक आनंद शिवसेनेला झाला होता. डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारात शिवसेना सक्रीय होती. आगामी काळात महापालिकेत सत्तेत वाटा मिळावा यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. खा. सुजय विखे यांच्या मदतीने या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद संपुष्टात येऊन विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला याचा फायदा होईल.

हेच हेरून महापालिकेतील द्वंद्व कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजपचा एक गट करत आहे. माजी खासदार गांधी यांना मानणार्‍या काही नगरसेवकांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या दालनात त्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीत नगरच्या जागेसाठी दावा करण्याच्या हालचाली झाल्या. त्यावर चर्चाही झाली. मागील निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत भाजपचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्या आधारावर या जागेवर हक्क सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एवढे करूनही जागा सोडली नाही, तर शिवसेनेसोबत मैत्रीपूर्ण लढत करण्याची तयारीही काही नगरसेवकांनी दर्शविली. विशेष म्हणजे यासाठी महापौर वाकळे यांना पुढे केले जात असल्याचेही समजते. वाकळे यांचे नाव आल्यास शिवसेना महापालिकेत आणखी आक्रमक होऊन संबंध दुरावतील, असाही एक प्रयत्न आहे.

बैठक नाही, फक्त गप्पा!
या बैठकीबाबत महापौर बाबासाहेब वाकळे यांना विचारणा केली असता, त्यांनी अशी बैठक झाली नसल्याचे सांगितले. मात्र या गप्पा झाल्याचे मान्य केले. वास्तविक तसे काही नाही, सहज गप्पा चालल्या होत्या, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!