Friday, May 3, 2024
Homeराजकीयनगर : शिवसेनेच्या दोन्ही गटाची उद्या बैठक

नगर : शिवसेनेच्या दोन्ही गटाची उद्या बैठक

अहमदनगर l प्रतिनिधी l Ahmednagar

शिवसेनेतंर्गत गटबाजीचे ग्रहण सोडविण्यासाठी उद्या गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली असून जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसे निरोप दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

नगर शहर शिवसेना गटबाजीत विखुरली गेली आहे. दोन पावलं माघारी जाण्याची कोणत्याच गटाची तयारी नाही. त्यामुळे गटबाजीचा वाद विकोपाला पोहचला आहे. नगरसेवक गणेश कवडे आणि युवा सेनेचे प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी थेट मातोश्रीवर पत्र पाठवित गटबाजी थांबविण्याची मागणी केली. त्यानंतर प्रा. गाडे यांनी पुढाकार घेत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक उद्या गुरूवारी बोलविली आहे. बैठकीचे निरोप देताना ‘मनोमिलन’ असा स्पष्ट निरोप देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई येथील निवासस्थानी मनोमिलनाची पहिली बैठक झाली. त्यात यश मिळाले नाही, पण त्याचवेळी आता संपर्कप्रमुख व जिल्हा प्रमुखांनी बैठक घ्यावी असे ठरले होते. त्याला आता कुठे मुहूर्त लागला असल्याचे दिसते आहे. बैठकीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. पण बैठकीचे निरोप आल्याचे दोन्ही गटातील प्रमुखांकडून सांगण्यात आले.

शहरप्रमुख बदलाचे पडसाद

नगरसेवक गणेश कवडे यांनी थेट शहर प्रमुखांवर आरोप करत बदलाची मागणी केली आहे. शहर प्रमुख दिलीप सातपुते हे गटबाजीवर कोणतेच भाष्य करत नाहीत. कोणाला आवरही घालत नाहीत. तेच गटबाजीला खतपाणी घालत असल्याची शंका व्यक्त करतानाच कवडे यांनी सातपुते यांच्या बदलाची मागणी केली आहे. सावेडी विभागप्रमुख काका शेळके यांनी तर थेट संपर्कप्रमुखाच्या बदलाची मागणी केली आहे. शेळके-कवडे यांच्यातील पत्रकबाजी चांगलीच रंगल्याने गटबाजी चव्हाट्यावर आली. उद्याच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नेर्लेकर यांच्याशी गटबाजीसदंर्भात चर्चा झाली. शिवसेनेतंर्गत वाद, आरोप-प्रत्यारोप त्यांना सांगितले. त्यानंतर बैठक आयोजित करण्याचा निर्णय झाला. मनोमिलन हा एकमेव विषय बैठकीत आहे. सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

प्रा. शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

- Advertisment -

ताज्या बातम्या