Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरचे महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव

Share
थकीत करधारकांची नावे झळकली फ्लेक्सवर, Latest News Taxpayer Name Flex Amc Action Ahmednagar

शेंडगे, चव्हाण, पारगे महापौरपदाच्या शर्यतीत ?

अहमदनगर (प्रतिनिधी)-  राज्याच्या राजकारणात भले एकत्र येण्यासाठी हालचाली असल्या तरी आगामी अडीच वर्षांच्या महापौरपदासाठी अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येच रस्सीखेच होणार आहे.  महापालिकेत सर्वाधिक मोठा पक्ष शिवसेना असून, त्यांच्या 24 जागा आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी (18), भाजप (14), काँग्रेस (5), बसप (4), समाजवादी पक्ष (1) असे बलाबल आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून सर्वसाधारण, सर्वसाधारण (महिला) आणि इतर मागासवर्ग प्रवर्ग असे आरक्षण झालेले आहे.

मात्र इतर मागासवर्ग प्रवर्ग (महिला), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यापैकी एकही आरक्षण पडलेले नव्हते. आगामी अडीच वर्षांसाठी राज्यातील महापालिकांच्या महापौर पदासाठीच्या आरक्षण सोडती बुधवार दि. 13 रोजी मुंबईत मंत्रालयात झाल्या. त्यामध्ये अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी येथील महापालिकेत महापौरपदासाठी सोडत निघाली आहे.

महापालिकेत रोहिणी शेंडगे, रीता भाकरे, शांताबाई शिंदे (शिवसेना), रूपाली पारगे (राष्ट्रवादी) आणि शीला दीप चव्हाण (काँग्रेस) या प्रवर्गातील नगरसेविका आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभवाला समोरे जावे लागले. त्यानंतर शिवसेनेत एकमेकांबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी महापौरपद मिळविण्यासाठी शिवसेना कंबर कसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे व उपनेते अनिल राठोड यांचे कट्टर समर्थक असलेले संजय शेंडगे यांच्या पत्नी रोहिणी शेंडगे नगरसेविका आहेत.

संजय शेंडगे अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येत आहेत. रोहिणी शेंडगे यांची ही दुसरी वेळ आहे. शिवसेनेकडून ते प्रमुख प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता अधिक आहे. रीता भाकरे आणि शांताबाई शिंदे या ऐनवेळी किती स्पर्धेत येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
नगरपालिका असल्यापासून नगरसेवक असलेले काँग्रेसचे शहरातील नेते दीप चव्हाण यांच्या पत्नी शीला चव्हाण यावेळी आघाडीकडून संधी मिळावी, यासाठ प्रयत्नशील असतील. चव्हाण यांनीही यापूर्वी युतीच्या पाठिंब्यावर महापौरपदाची निवडणूक लढविली होती. एकाचवेळी दोन दोन महापौर होण्याचा विक्रम त्याच काळात झाला होता.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रूपसिंग कदम यांच्या कन्या रूपाली पारगे यावेळी राष्ट्रवादीकडून नगरसेविका आहेत. काँग्रेसमध्ये रूपसिंग कदम यांचे मोठे नाव आहे. ते आणि त्यांचे चिरंजीव विनोद कदम अनेकदा नगरसेवक राहिलेले आहेत. सर्व बाजू भक्कम असल्याने ते देखील रिंगणात उतरू शकतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!