नगर बाजार समिती : कडबा मार्केट हलविण्यास स्थगिती

0

 आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या मध्यस्थीनंतर निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील कृषिउत्पन्न बाजार समितीच्यावतीने कडबा मार्केट चालविले जाते. मार्केट यार्डमधील गाळेधारक व्यापार्‍यांनी या कडबा मार्केटमुळे होणार्‍या त्रासाची तक्रार जिल्हाधिकारी, सहकार खाते, मनपा प्रशासन, आरोग्य विभाग व वाहतूक पोलीस यांच्याकडे केली होती.
त्यानंतर सहकार खात्याने बाजार समितीला सूचना करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बाजार समितीने हे कडबा मार्केट हलविण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार बाजार समिती प्रशासनाने कडबा मार्केट हलवण्याचे आदेश काढले. मात्र, कडबा, ऊस उत्पादक शेतकरी व विक्रेते यांनी बाजार समितीच्या आदेशाला विरोध करत आंदोलन केले. तसेच आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेतली. आ. कर्डिले यांनी ऊस उत्पादक शेतकरी व कडबा विक्रेते यांचे म्हणणे ऐकून घेतले.
तसेच सविस्तर चर्चा करून सर्वांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून कडबा मार्केट हलवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला दिले. बाजार समितीमधील गाळेधारकांनी त्यांची दुकाने उघड्यापूर्वीच पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंतच हे मार्केट भरवण्याचे त्यांनी सांगितले. सकाळी लवकर बाजार भरविला जाणार असल्याने वाहतूक समस्या सुटेल व लगेचच कचराही उचलला जाणार आहे.
यावेळी बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, संचालक हरिभाऊ कर्डिले, संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, बहिरू कोतकर, बन्सी कराळे, सचिव अभय भिसे, रमेश इनामकर आदींसह कडबा विक्रेते व शेतकरी उपस्थित होते.

आमदार शिवाजीराव कर्डिले यांची कडबा ऊसउत्पादक शेतकरी व विक्रेते यांनी भेट घेतली. यावेळी बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, संचालक हरिभाऊ कर्डिले, संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, बहिरू कोतकर, बन्सी कराळे, सचिव अभय भिसे, रमेश इनामकर आदींसह कडबा विक्रेते व शेतकरी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*