नगर जिल्ह्यात 13 हजार बगळे तर 5 हजार 889 कावळ्यांची नोंद  

सार्वमत

जिल्हास्तरीय वार्षिक पक्षीगणना 2020 ; जिल्ह्यात 167 पेक्षाही अधिक  प्रजातींचे पक्षी 
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय वार्षिक पक्षीगणनेत 167 पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी आढळून आले आहेत. यासह जिल्हा निसर्गप्रेमी संघटना तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र तसेच विविध पर्यावरणमित्र संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात 13 हजार 136 बगळे, 10 हजार 272 सोळुंकी, 8188 पारवे आणि 5 हजार 889 कावळे आढळून आलेले आहेत. यासह जिल्ह्यात अन्य सर्व पक्षी यांची संख्या 1 लाख 78 हजार 631 आहे.
जिल्हा निसर्गप्रेमी संघटने तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राचे जिल्हाध्यक्ष जयराम श्रीरंग सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हास्तरीय पक्षीगणना-2020 नुकतीच सलग अकराव्यावर्षी जिल्हाभरात फेब्रुवारी ते मार्च महिण्याअखेर यशस्वीरीत्या झाली. या पक्षीगणनेमध्ये 14 तालुक्यांतील 262 प्रौढ निरीक्षकांसह सुमारे 2 हजार 400 विद्यार्थ्यांनी जिल्हाभरातील 810 ठिकाणी ही पक्षीगणना करून 167 प्रजातींच्या सुमारे 1 लाख 78 हजार पक्षांची नोंद घेतली. पाथर्डी तालुक्यातुन 40 प्रौढ निरीक्षकांसह 501 विद्यार्थ्यांनी 159 ठिकाणी गणना करून जिल्ह्यात यावर्षीही सर्वाधिक सहभाग नोंदवला. तर शेवगाव तालुक्यामध्ये पक्षांच्या प्रजातींमध्ये सर्वाधिक जैवविविधता आढळुन आली.
यावर्षीच्या पक्षीगणना उपक्रमामध्ये योगदान देणार्‍यांमध्ये शिवकुमार वाघुंबरे, संदिप राठोड, सचिन चव्हाण, प्रतिम ढगे, भैरवनाथ वाकळे, डॉ.नरेंद्र पायघन, डॉ.अतुल चौरपगार, संतोष टकले, शैलजा नरवडे, विजय शेंगाळ, विक्रांत मते, सुधिर दरेकर, बाळासाहेब डोंगरे, नारायण मंगलारम, राजेंद्र बोकंद, आजीनाथ राऊत, विद्याताई उदावंत, संजय बोकंद, अनिता सासणे, शशी त्रिभुवन, अनमोल होन, डॉ.वसुदेव साळुंके, फौझिया पठाण, मिलींद जामदार संदिप भालेराव, संपदा ससे
…………..
फ्लेमिंगो, पट्टकदंब अनेक वर्षांनी शहराजवळ
यावर्षी जिल्ह्यातील मोठ्या तलावांमध्ये पाण्याची पातळी जास्त राहिल्यामुळे परदेशी पक्षांचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घटलेलेले आढळुन आले असले तरी फ्लेमिंगो, पट्टकदंब या आकर्षक व शांतताप्रिय परदेशी पक्षांनी अनेक वर्षानंतर शहरांनजीकच्या छोट्या तलावांवर हजेरी लावल्याचेही निदर्शनास आले ही पक्षीनिरीक्षकांसाठी आनंदाची बाब ठरली.
……………..
पाच नवीन प्रजातींच्या पक्षांची भर
या उपक्रमात यावर्षीही सहभागी झाले वाढताच राहिल्याने जिल्ह्याच्या पक्षी यादीत आणखी 5 नवीन प्रजातींच्या पक्षांची भर पडली. यामध्ये पितकंठी चिमणी, शृंगी घुबड, भांडखोर पाणलावा, पाणटिवळा, मानमोडी अशा आगळ्यावेगळ्या दुर्मिळ प्रजातींच्या पक्षांची छायाचिञांसह नोंद घेण्यातही निरीक्षकांना यश आले.
……………
पाच पक्षी रेड लिस्टमध्ये
पुर्वी जिल्ह्यात उत्तम संख्येत नोंद होत असलेले पण गेल्या तीन वर्षात नगण्य प्रमाणात नोंद होत असलेल्या 5 पक्षांची नावेही या संस्थेने जिल्ह्याच्या रेडलिस्टमध्ये जाहीर केली असुन यात टकाचोर, शामा, दयाळ, गव्हाणी घुबड व जांभळा बगळा आदींचा समावेश केला आहे.ज्या ठिकाणी तुरळक प्रमाणात हे पक्षी आढळले तेथे त्यांच्या संवर्धनासाठी विशेष उपक्रम व जनजागृतीही केली जाणार असल्याचे निसर्ग अभ्यासक जयराम सातपुत यांनी सांगितले.
………………..
सर्वेक्षणात आढळलेले पक्षी
13 हजार 136 बगळे, 10 हजार 272 सोळुंकी, 8188 पारवे, 5 हजार 889 कावळे,8 हजार 250 सातभाई, 1 हजार 162 होला, 1 हजार 342 पोपट, 791 कोकीळा, भारद्वाज 662, 3 हजार 12 वेडा राघू, टिटवी 981, कोतवाल 1 हजार 363, खंड्या 577, बुलबुल 7 हजार 260 आणि मोर 1 हजार 807 यांचा समावेश आहे.